मुंबई : (IT Dindi Global Wari Pune) पुण्यातील माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील तरुणांना संतांच्या वारी परंपरेशी जोडण्याच्या उद्देशाने पुण्यातील काही आयटी क्षेत्रातील तंत्रज्ञांनी सुरू केलेल्या 'आयटी दिंडी' या उपक्रमाने आता जागतिक स्तरावरही एक नवे पाऊल टाकले आहे. इंग्लंडमधील मराठी बांधवांनी सुरू केलेल्या ग्लोबल वारीच्या वारकऱ्यांचे पुण्यात आयटी दिंडीच्या वतीने उत्साहात स्वागत करण्यात आले.
आयटी, बीपीओ तसेच इतर विविध क्षेत्रांत कार्यरत असलेल्या तरुण-तरुणी, महिला-पुरुष अशा सर्वांसाठी खुल्या असलेल्या आयटी दिंडीचा उपक्रम दरवर्षी आळंदी ते पुणे आणि पुढे पंढरपूरपर्यंतच्या वारीत सहभागी होतो. आधुनिक तंत्रज्ञानाच्या युगात हा उपक्रम अधिक सर्वसमावेशक व्हावा या उद्देशाने एआय दिंडी हे नावही स्वीकारण्यात आले आहे. या माध्यमातून तंत्रज्ञान क्षेत्रातील नव्या पिढीला संत साहित्य, वारीची परंपरा आणि सामाजिक मूल्यांशी जोडण्याचा प्रयत्न केला जात आहे.
यावेळी इंग्लंडमधील मराठी मंडळींनी सुरू केलेल्या 'ग्लोबल वारी' या अभिनव उपक्रमाची माहिती देण्यात आली. या उपक्रमांतर्गत 'लंडन ते पंढरपूर' अशी वारी यंदा प्रथमच आयोजित करण्यात आली आहे. इंग्लंडमधून प्रारंभ झालेली ही वारी युरोपमधील विविध देशांमधून प्रवास करत भारतात दाखल झाली असून मुंबई आणि पुणे मार्गे ती पंढरपूरकडे रवाना झाली आहे. पांडुरंगाचे दर्शन घेतल्यानंतर ही परतवारी पुन्हा लंडनला जाणार आहे. याचबरोबर इंग्लंडमध्ये विठ्ठल मंदिर उभारण्याचाही संकल्प या उपक्रमातून व्यक्त करण्यात आला आहे. (IT Dindi Global Wari Pune)
याप्रसंगी ग्लोबल वारीचे प्रमुख अनिल खेडकर म्हणाले, "आपल्या पंढरपूर वारीचा वारसा युरोपमध्येही अनुभवायला मिळावा या उद्देशाने आम्ही 'ग्लोबल वारी' सुरू करत आहोत. आमच्यासोबत इंग्लंड आणि युरोपमधील अनेक भागवत भक्त सहभागी झाले आहेत. ही सुरुवात असल्यामुळे वारकऱ्यांची संख्या मर्यादित ठेवली आहे; मात्र पुढील काळात हा सहभाग टप्प्याटप्प्याने वाढवत नेण्याचा आमचा प्रयत्न राहील." (IT Dindi Global Wari Pune)
आयटी दिंडीचे समन्वयक श्री. राजेश पाटील यांनी या उपक्रमाचे स्वागत करताना सांगितले, "ज्ञानेश्वर माउलींनी 'विश्वात्मके देवे' या पसायदानातून संपूर्ण मानवजातीसाठी विश्वबंधुत्वाचा संदेश दिला आहे. हिंसा, द्वेष आणि दहशतवादाने ग्रस्त असलेल्या जगाला संतांच्या शिकवणीतून वैश्विक ऐक्याचा मार्ग मिळू शकतो. 'ग्लोबल वारी'सारख्या उपक्रमांमुळे संतपरंपरेचा हा संदेश जगभर पोहोचेल आणि जागतिक शांततेसाठीही त्याचा सकारात्मक परिणाम होईल. या अभिनव उपक्रमातील सर्व वारकऱ्यांचे मनःपूर्वक अभिनंदन." (IT Dindi Global Wari Pune)
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या पर्यावरण गतिविधीचे ऋत श्रीवास्तव यांनीही उपस्थितांना संबोधित करताना वारीदरम्यान स्वच्छता, आरोग्य आणि पर्यावरण संवर्धनाचे महत्त्व अधोरेखित केले. "वारी करताना स्वच्छतेचे, आरोग्याचे तसेच पर्यावरणाचे भान प्रत्येक वारकऱ्याने जपले पाहिजे. संतांच्या विचारांप्रमाणेच निसर्गाशी सुसंवाद साधत वारीचा अनुभव अधिक समृद्ध करावा," असे आवाहन त्यांनी केले. (IT Dindi Global Wari Pune)
आधुनिक तंत्रज्ञान क्षेत्रातील युवा पिढीला संतपरंपरेशी जोडणारी आयटी दिंडी आणि संतांच्या विश्वबंधुत्वाच्या संदेशाला जागतिक व्यासपीठ उपलब्ध करून देणारी ग्लोबल वारी हे दोन्ही उपक्रम भारतीय संस्कृती, अध्यात्म आणि मानवतेचा संदेश सीमापार नेणारे महत्त्वपूर्ण प्रयत्न म्हणून पाहिले जात आहेत.(IT Dindi Global Wari Pune)