डान्सबार कायद्यात सुधारणा पुरेशी नाही; उल्लंघन करणाऱ्या पोलिसांनाही जबाबदार धरा – अमित साटम

 
Dance Bar Law Amendment
 
मुंबई (Dance Bar Law Amendment) : महाराष्ट्र पोलीस अधिनियम तसेच महाराष्ट्र हॉटेल, उपहारगृहे आणि मद्यपान कक्षांमधील अश्लील नृत्यांवर प्रतिबंध घालण्याबाबत व त्यामध्ये काम करणाऱ्या महिलांच्या प्रतिष्ठेचे संरक्षण करण्याबाबत अधिनियम, २०१६ मध्ये सुधारणा करण्यासाठी विधानसभेत मांडण्यात आलेल्या विधेयकावर चर्चा करताना भाजप आमदार अमित साटम यांनी केवळ कायद्यात सुधारणा करून उपयोग होणार नसून त्याच्या प्रभावी अंमलबजावणीवर भर देण्याची गरज असल्याचे मत व्यक्त केले.
 
साटम म्हणाले की, काही दिवसांपूर्वी अंधेरीतील मरोळ परिसरातील एका डान्सबारमध्ये एका व्यक्तीने लाखो रुपये उधळल्याची घटना राज्यभर चर्चेत होती. अशा घटनांच्या पार्श्वभूमीवर ऑर्केस्ट्रा आणि लाईव्ह परफॉर्मन्सनाही डान्सबार कायद्याच्या कक्षेत आणण्यासाठी सरकार सुधारणा करत असल्याचे दिसते. मात्र, २०१६ चा कायदा अस्तित्वात असूनही अनेक ठिकाणी त्याचे उघडपणे उल्लंघन होत असल्याचे वास्तव आहे. (Dance Bar Law Amendment)
 
पनवेलसह राज्यातील विविध भागांत कायद्याचे उल्लंघन सुरूच असल्याचा दावा करत त्यांनी, केवळ नवीन तरतुदी करण्याऐवजी विद्यमान कायद्याची कठोर अंमलबजावणी आवश्यक असल्याचे सांगितले. कायद्याचे उल्लंघन झाल्यास संबंधित पोलीस ठाणे आणि त्या ठिकाणच्या वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनाही जबाबदार धरण्याची तरतूद करण्यात यावी, अशी मागणी त्यांनी केली. (Dance Bar Law Amendment)
 
"ज्या परिसरात अशा प्रकारचे प्रकार घडतात, त्या पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांवरही जबाबदारी निश्चित करून त्यांना कारवाईच्या कक्षेत आणले नाही, तर कितीही नवीन कायदे केले तरी त्याचा अपेक्षित परिणाम होणार नाही," असे साटम यांनी सभागृहात स्पष्ट केले. (Dance Bar Law Amendment)
 
तसेच, कायद्याचे उल्लंघन करणाऱ्यांबरोबरच अशा उल्लंघनाला पाठीशी घालणाऱ्यांवरही कठोर शिक्षेची तरतूद करण्याची आवश्यकता असल्याचे त्यांनी नमूद केले. सरकारने आणलेल्या कायद्यांची प्रत्यक्ष अंमलबजावणी किती प्रभावीपणे होत आहे, याचे नियमित मूल्यमापन होणे गरजेचे असल्याचेही त्यांनी सांगितले. (Dance Bar Law Amendment)
 
या विधेयकात उपसूचना समाविष्ट करून सुधारित कायदा पुन्हा सभागृहासमोर आणावा, अशी मागणीही अमित साटम यांनी चर्चेदरम्यान केली. (Dance Bar Law Amendment)
 




गायत्री श्रीगोंदेकर

मूळची अहिल्यानगर येथील. 'राज्यशास्त्र' विषयातील पदवी. रानडे इन्स्टिट्यूट मधून (सा.फु.पुणे विद्यापीठ) 'एमजेएमसी' विषयात पदव्युत्तर शिक्षण. २०१९मध्ये मुंबई तरुण भारतमध्ये 'मंत्रालय प्रतिनिधी' या पदावर रुजू. सद्यस्थितीत 'इन्फ्रास्ट्रक्चर आणि डेव्हलपमेंट' विशेष प्रतिनिधी म्हणून कार्यरत. राज्यातील पायाभूत सुविधांविषयी फिल्ड रिपोर्ट आणि लेखनात रस.
संबंधित मजकूर