एक वर्तुळ अपूर्ण राहिले...

    08-Jul-2026   

Cristiano Ronaldo World Cup
 
पेले... मॅराडोना... एम्बाप्पे... आणि मेस्सी
फुटबॉलच्या इतिहासात ही चार नावे केवळ महान खेळाडू म्हणूनच अमर नाहीत, तर त्यांनी आपल्या देशाला विश्वविजेतेपद मिळवून देत स्वतःच्या महानतेवर अखेरचा सुवर्णमुकुटही चढवला. वैयक्तिक कौशल्यापासून संघाच्या सर्वोच्च यशापर्यंतचा प्रवास त्यांनी पूर्ण केला.
 
या अमर पंक्तीत स्थान मिळवण्याचा जीवापाड प्रयत्न पोर्तुगालच्या क्रिस्टियानो रोनाल्डोने तब्बल दोन दशके केला. विक्रमामागून विक्रम रचले. आंतरराष्ट्रीय फुटबॉलमध्ये सर्वाधिक गोल करणारा खेळाडू ठरला. लब फुटबॉलमध्ये जवळपास प्रत्येक मोठी ट्रॉफी जिंकली. वैयक्तिक पुरस्कारांची अक्षरशः रास उभी केली.
 
पण... विश्वचषकाची ट्रॉफी मात्र त्याच्या हातातून कायम निसटत राहिली.
 
डॅलसमध्ये स्पेनविरुद्ध अंतिम शिट्टी वाजली आणि त्या आवाजासोबत रोनाल्डोच्या विश्वचषक स्वप्नाचाही शेवट झाला. मैदानावर गुडघे टेकले नाहीत, पण डोळ्यांतून वाहणार्‍या अश्रूंनी एक सत्य स्वीकारले...
 
एक वर्तुळ अपूर्ण राहिले. २००६ मध्ये जर्मनीत सुरू झालेला त्याचा विश्वचषक प्रवास २०२६ मध्ये संपला. सहा विश्वचषक, असंख्य संस्मरणीय क्षण, हजारो मिनिटांचा संघर्ष... पण शेवटी हातात विश्वचषक नव्हता. हा पराभव केवळ पोर्तुगालचा नव्हता; तो फुटबॉलच्या सर्वांत मोठ्या स्वप्नाचा होता.
 
विडंबना अशी की, जगातील सर्वाधिक आंतरराष्ट्रीय गोल करणार्‍या खेळाडूला शेवटच्या सामन्यात रोखून धरले, स्पेनचा गोलरक्षक उनाय सिमोन याने! पहिल्या सत्रात रोनाल्डोचे दोन अप्रतिम प्रयत्न त्याने हाणून पाडले. विशेषतः हवेत झेपावत दोन्ही हातांनी वाचवलेला फटका हा त्या सामन्याचा ‘टर्निंग पॉईंट’ ठरला.
 
आणि मग, भरपाई वेळेत मिकेल मेरिनोने केलेल्या एका गोलने स्पेनला उपांत्यपूर्व फेरीचे तिकीट मिळवून दिले.
 
स्पेनने विजय मिळवला, पण त्याचबरोबर इतिहासही घडवला. सलग सहा विश्वचषक सामने एकही गोल न स्वीकारण्याचा नवा विश्वविक्रम त्यांच्या नावावर जमा झाला. इटली आणि स्वित्झर्लंडचा जुना विक्रम मागे पडला. उनाय सिमोननेही सलग ६०९ मिनिटे गोल न स्वीकारत इटलीच्या महान गोलरक्षक वाल्टर झेंगाचा विक्रम मोडला.
 
मात्र, त्या सर्व विक्रमांवर डॅलसच्या मैदानावर एकच दृश्य भारी पडले, अश्रूंनी भरलेले रोनाल्डोचे डोळे!
 
काही पराभव स्कोअरबोर्डवर दिसतात, काही इतिहासात नोंदले जातात आणि काही थेट चाहत्यांच्या हृदयावर कोरले जातात!
हा तिसर्‍या प्रकारचा पराभव होता.
 
रोनाल्डोला कदाचित फुटबॉलच्या सर्वोच्च ट्रॉफीला स्पर्श करता आला नाही. पण एका गोष्टीची नोंद इतिहास कायम ठेवेल, विश्वचषक जिंकणारे अनेक झाले; पण विश्वचषक न जिंकताही जगभरातील कोट्यवधी चाहत्यांच्या हृदयावर अधिराज्य गाजवणारे फारच थोडे झाले.
 
क्रिस्टियानो रोनाल्डो त्यांपैकीच एक. म्हणूनच, डॅलसमध्ये संपलेला तो सामना हा फक्त ‘राऊंड ऑफ १६’ नव्हता, तो फुटबॉलच्या एका महान पर्वाचा भावूक उपसंहार होता.




संबंधित मजकूर