आपल्या कौटुंबिक, सामाजिक आणि व्यावसायिक जबाबदाऱ्या समर्थपणे पार पाडत, कोणतीही प्रसिद्धी न शोधता आयुष्यभर शाखा, स्वयंसेवक आणि समाजकार्याशी एकनिष्ठ राहणाऱ्या असंख्य स्वयंसेवकांच्या निःशब्द तपश्चर्येवर संघकार्य उभे आहे. अशाच निस्पृह, ध्येयनिष्ठ आणि मितभाषी स्वयंसेवकांपैकी एक म्हणजे कै. विश्वनाथ विष्णु उपाख्य बाळासाहेब खरे.
कै. विश्वनाथ विष्णु उपाख्य बाळासाहेब खरे यांचा दि. ०२ एप्रिल १९३० रोजी मुंबई येथे जन्म झाला. बाळासाहेबांचे शालेय शिक्षण मुंबईतील शीव (पूर्व) येथील धर्मप्रकाश श्रीनिवासाय्या शाळेत झाले. त्यानंतर त्यांनी रुईया महाविद्यालय आणि खालसा महाविद्यालयात पदवीपर्यंतचे शिक्षण पूर्ण केले. लहानपणापासूनच त्यांच्यावर संघ संस्कार झाले. युवक अवस्थेतच त्यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यात स्वतःला झोकून दिले. १९४८ मध्ये संघबंदीच्या काळात त्यांनी आंदोलनात सक्रिय सहभाग घेतला आणि त्यासाठी कारावासही भोगला. हा प्रसंग त्यांच्या संघनिष्ठेचा आणि राष्ट्रनिष्ठेचा ठळक पुरावा होता.
तथापि, त्यानंतर त्यांनी आयुष्याकडे अत्यंत संतुलित दृष्टीने पाहिले. कौटुंबिक जबाबदाऱ्या स्वीकारल्या, मुंबई महानगरपालिकेच्या सेवेत प्रामाणिकपणे कार्य केले; परंतु शाखेशी असलेली त्यांची नाळ कधीही तुटली नाही. ते आयुष्यभर दैनंदिन शाखेचे नियमित स्वयंसेवक राहिले. बाळासाहेबांच्या व्यक्तिमत्त्वाचा सर्वात मोठा गुण म्हणजे त्यांचा मितभाषी स्वभाव. "आपण बरे, आपले काम बरे" हा त्यांचा जीवनमंत्र होता. प्रसिद्धीची अपेक्षा नाही, पदाची इच्छा नाही, भाषणांची हौस नाही; पण प्रत्येक काम अत्यंत जबाबदारीने आणि शांतपणे पूर्ण करण्याची त्यांची वृत्ती होती. त्यांच्या सहवासात आलेल्या प्रत्येकाला त्यांच्या बोलण्यापेक्षा त्यांच्या कृतीतून प्रेरणा मिळत असे.
१९६५ साली त्यांनी डोंबिवली येथे स्थायिक होण्याचा निर्णय घेतला. ते रामदास प्रभात शाखेचे नियमित स्वयंसेवक झाले. त्या काळात रामदास प्रभात शाखा ही केवळ शाखा नव्हती, तर एका मोठ्या कुटुंबाचे रूप होते. बापूराव खाडे, बाबुजी पराडकर, गणपुले, मनोहरपंत जोशी, अप्पा जोशी, लक्ष्मण प्रभुदेसाई, अण्णा बापट मास्तर, रमेशभाई दांडेकर, महेंद्रजी ठक्कर अशा अनेक ज्येष्ठ स्वयंसेवकांबरोबर बाळासाहेबांचे अतूट स्नेहबंध निर्माण झाले. ही स्वयंसेवक मंडळी एकमेकांशी केवळ जोडलेली नव्हती तर प्रत्येकजण इतरांच्या कुटुंबीयांशी जोडलेला होता.
आज 'कुटुंब प्रबोधन' ही संकल्पना सर्वपरिचित आहे; परंतु त्याआधीच रामदास प्रभातच्या स्वयंसेवकांनी कुटुंबांना एकत्र आणण्याचे कार्य सुरू केले होते. सुमारे १९८५ च्या सुमारास धनुर्मासातील भोगी (धुंदुरमास) निमित्त कुटुंबीयांचे स्नेहसंमेलन सुरू करण्यात आले. सुरुवातीला शास्त्री हॉलमध्ये आणि नंतर वाढत्या प्रतिसादामुळे बोडस मंगल कार्यालयात हा कार्यक्रम भरू लागला. २५० ते ३०० स्वयंसेवक आणि त्यांच्या कुटुंबीयांची उपस्थिती असलेला हा कार्यक्रम केवळ भोजनाचा नव्हता. त्यात प्रख्यात वक्त्यांचे मार्गदर्शन, परस्पर परिचय, आपुलकीची विचारपूस, अनुभवांचे आदानप्रदान आणि संघपरिवारातील स्नेह अधिक दृढ करण्याचे कार्य घडत असे. प्रत्येक वर्षी पुढील भेटीचा संकल्प करून सर्वजण आनंदाने परतत.
१९८५ साली बाळासाहेबांनी स्वेच्छानिवृत्ती स्वीकारली. अनेक जण निवृत्तीनंतर विश्रांतीचा विचार करतात; पण बाळासाहेबांनी निवृत्तीच्या पहिल्याच दिवसापासून संघवृद्धीचे व्रत स्वीकारले. डोंबिवलीजवळील नांदिवली, भोपर आणि परिसरातील त्या काळच्या छोट्या गावांमध्ये त्यांनी युवकांसाठी शाखा सुरू केल्या. त्या काळी या गावात जाण्यासाठी रस्ते जेमतेमच होते. रस्त्यांवर मिणमिणते दिवे होते. पावसाळ्यात रस्त्यात डबकी की डबक्यात रस्ता अशी परिस्थिती. त्या खेड्यांमध्ये गुन्हेगारी प्रवृत्ती प्रबळ होती.
अशा सर्व विपरीत परिस्थितीत, गावोगावी जाऊन बाळासाहेबांनी लोकांशी संवाद साधला. त्यांच्या सातत्यपूर्ण प्रयत्नांमुळे अनेक कुटुंबे संघाशी जोडली गेली, संघाबद्दल विश्वास निर्माण केला.
बाळासाहेबांनी समाजात निर्माण केलेल्या विश्वासाचे एक अत्यंत बोलके उदाहरण नांदिवली गावातील आहे. १९९० च्या सुमारास नांदिवली येथे संघ शिक्षा वर्ग भरला होता. रात्री अचानक खुर्च्यांची आवश्यकता निर्माण झाली. स्वयंसेवक राधाकृष्णन यांनी गावातील पांडुरंग तुकाराम म्हात्रे यांच्याकडे जाऊन खुर्च्या मागितल्या. त्या अंधाऱ्या गावात, नाव, गाव किंवा ओळख न विचारता त्यांनी तत्काळ खुर्च्या दिल्या. राधाकृष्णन रात्रभर विचार करत होता की, त्या अंधाऱ्या रस्त्यावर म्हात्रे यांना मीच नीटपणे पाहू शकलो नाही. त्यामुळे माझाही चेहरा त्यांना पाहता आला नसेल. तरी त्यांनी आपले नावही न विचारता खुर्च्या दिल्या कशा?
दुसऱ्या दिवशी कारण विचारल्यावर त्यांनी दिलेले उत्तर, बाळासाहेबांच्या कार्याचे सार सांगणारे होते. "खुर्च्या तुला दिल्या नाहीत; तू आमच्या गुरुजींसारखी खाकी हाफ पँट घातली होतीस आणि रात्रीच्या अंधारात मी ती पाहिली होती. म्हणूनच तुला खुर्च्या दिल्या."
त्या परिसरात बाळासाहेबांना सर्वजण प्रेमाने 'गुरुजी' म्हणत. त्यांच्या चारित्र्याने आणि निस्वार्थ सेवेमुळे लोकांचा विश्वास इतका दृढ झाला होता की संघाचा गणवेश पाहूनही लोक मदतीला धावून येत. याच कार्यातून पुढे १९९४ मध्ये मिलिंद मढवी यांच्यासारखा पूर्णवेळ प्रचारक संघाला लाभला.
दि. १ एप्रिल १९९४ रोजी बाळासाहेब पुण्यात स्थायिक झाले. मात्र त्यांचा पुण्याशी परिचय यापूर्वीच झाला होता. १९८७ पासून ते वर्षातून दोन-तीन वेळा पुण्यात येत आणि कोथरूड येथील रघुवीर प्रभात शाखेत उपस्थित राहत. या शाखेशी त्यांचा परिचयही अत्यंत प्रेरणादायी आहे. पहिल्याच पुणे मुक्कामात त्यांनी सकाळी सहा वाजता पूर्ण गणवेशात कर्वे रस्त्यावर उभे राहण्याचा निर्णय घेतला. त्यांचा विश्वास होता की, पूर्ण गणवेश पाहून एखादा स्वयंसेवक नक्की भेटेल. काही मिनिटांतच एक स्वयंसेवक त्यांच्याजवळ आले. त्यांनी विचारले, "आज कोणताही उत्सव नाही, मग पूर्ण गणवेशात का?" त्यावर बाळासाहेब शांतपणे म्हणाले, "मी पुण्यात नवीन आहे. शाखा कुठे आहे हे मला माहीत नाही. पण पूर्ण गणवेशात उभा राहिलो तर एखादा स्वयंसेवक नक्की भेटेल, याची खात्री होती."
बाळासाहेबांची कार्यपद्धती अत्यंत शिस्तबद्ध होती. त्यांनी एक मोठी वही जपली होती. त्यामध्ये विविध सोसायट्यांतील संघकार्यप्रेमी, ते नियमित देत असलेली गंगाजळी आणि त्याची माहिती त्यांनी व्यवस्थित नोंदवून ठेवली होती. आजच्या भाषेत सांगायचे तर तो पुढील पिढीसाठी तयार केलेला संघकार्याचा एक अभ्यासपूर्ण 'डेटाबेस' होता. त्यांच्या दूरदृष्टीची आणि व्यवस्थापनक्षमतेची ही साक्ष आहे.
दि. २९ जुलै २००२ रोजी पुणे येथे त्यांचे निधन झाले. त्यांच्या आयुष्याचा विचार केला तर त्यामध्ये संघकार्य, कर्तव्यनिष्ठा, साधेपणा, शिस्त आणि माणसे जोडण्याची विलक्षण क्षमता यांचा सुंदर संगम दिसून येतो. कै. विश्वनाथ विष्णु उपाख्य बाळासाहेब खरे यांचे जीवन हे स्वयंसेवकत्वाचा आदर्श मानदंड आहे. संघाचे कार्य आज देशभर विस्तारले आहे, त्यामागे अशा हजारो निःशब्द स्वयंसेवकांची तपश्चर्या आहे. कै. बाळासाहेब खरे हे त्यापैकी एक तेजस्वी उदाहरण होते. त्यांच्या जीवनातून हे स्पष्ट होते की, मोठेपणा हा प्रसिद्धीत नसतो; तो आपल्या निष्ठेत, सातत्यात, साधेपणात आणि समाजासाठी निःस्वार्थपणे जगण्यात असतो. त्यांची ही निष्ठा आणि नि:स्वार्थपणा पुढील पिढ्यांना प्रेरणादायक असाच आहे..