मुंबई : (Sant Tukaram Maharaj Palkhi) श्रीक्षेत्र देहू येथील जगदगुरु संत तुकाराम महाराज पालखी प्रस्थान सोहळ्यात वारकऱ्यांचा उत्साह शिगेला पोहोचलेला पाहायला मिळाला. ' ज्ञानोबा माऊली तुकाराम' , ' राम कृष्ण हरी ', हरी विठ्ठल ' या गजरात भर पावसातसुद्धा मंगळवार दि.७ रोजी वारकरी आणि भाविकांनी विठू नामाचा गजर धरला होता. पावसामुळे वारकऱ्यांची संख्या कमी असली तरी उत्साह मात्र तेवढाच होता. तरुण ,तरुणी,महिला आणि लहान मुलेसुद्धा पालखी सोहळ्यात सहभागी झाले होते.
पोलिसांनासुद्धा फुगडी खेळायचा मोह आवरला नाही. महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यातून तसेच काही वारकरी अगदी कर्नाटकातून सुद्धा आले होते. श्री क्षेत्र देहू येथे मोफत अन्नछत्र देखील भाविकांसाठी ठेवण्यात आले होते.
बुधवार दि.८ रोजी संत तुकाराम महाराज पालखी आकुर्डी येथे प्रस्थान करेल.
श्री क्षेत्र देहू येथे उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, भाजप आमदार महेश लांडगे, राष्ट्रवादीचे आमदार सुनिल शेळके, आणि शिवसेनेचे खासदार श्रीरंग बारणे,माजी खासदार छत्रपती संभाजीराजे यांनी भेट दिली. (Sant Tukaram Maharaj Palkhi)
" हिंदू धर्मातील वारीची ही परंपरा फार मोठी असून अवघ्या जगभरातून भाविक विठुरायाच्या ओढीने येत असतात.यावेळी अतिवृष्टीमुळे अनेकांना येणे शक्य नसले तरी उत्साह तोच आहे. प्रशासन म्हणून सर्व यंत्रणा सज्ज आहे." अशी प्रतिक्रिया भाजपा आमदार महेश लांडगे यांनी दैनिक मुंबई तरुण भारत शी बोलताना दिली.
" मी स्वतः वारकरी असून गेली २८ वर्षे या परंपरेशी जोडलेला आहे.यातून मिळणारे आत्मिक समाधान न सांगण्यासारखे आहे. एक तरी वारी अनुभवावी ही गोष्ट खरीच आहे." अशी प्रतिक्रिया शिवसेनेचे खासदार श्रीरंग बारणे यांनी दैनिक मुंबई तरुण भारतशी बोलताना दिली. (Sant Tukaram Maharaj Palkhi)