राम मंदिराच्या सीईओ नियुक्तीसाठी त्रिसदस्यीय निवड समितीची स्थापना; प्रमोद कोहली, विष्णुकांत चतुर्वेदी आणि डॉ. सुरेश हावरे यांचा समावेश

    07-Jul-2026   
Ram Mandir CEO
 
मुंबई : (Ram Mandir CEO) श्रीराम मंदिरातील दानाच्या कथित अपहार प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर श्रीराम जन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टने आपल्या प्रशासकीय व्यवस्थेत महत्त्वपूर्ण बदल करण्याचा निर्णय घेतला आहे. मंदिराचे व्यवस्थापन अधिक व्यावसायिक, कार्यक्षम आणि पारदर्शक करण्यासाठी मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) नियुक्त करण्याचा निर्णय ट्रस्टने घेतला असून त्यासाठी त्रिसदस्यीय निवड समिती स्थापन करण्यात आली आहे.
 
ट्रस्टच्या बैठकीनंतर कोषाध्यक्ष गोविंद देव गिरी यांनी सांगितले की, मुख्य कार्यकारी अधिकाऱ्याच्या निवडीसाठी स्थापन करण्यात आलेल्या समितीत निवृत्त न्यायमूर्ती प्रमोद कोहली, निवृत्त लेफ्टनंट जनरल विष्णुकांत चतुर्वेदी आणि विश्वस्त सुरेश हावरे (अध्यक्ष, हावरे बिल्डर्स) यांचा समावेश करण्यात आला आहे. ही समिती पात्र उमेदवाराची निवड करून ट्रस्टकडे आपल्या शिफारसी सादर करणार आहे.(Ram Mandir CEO)
 
 
शोध समिती इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेऊन अंतिम निवडीसाठी तीन नावांची शिफारस ट्रस्टकडे करणार आहे. विश्व हिंदू परिषदेनेही राम मंदिराचे प्रशासन अधिक सक्षम करण्यासाठी मुख्य कार्यकारी अधिकारी नियुक्त करण्याच्या निर्णयाचे स्वागत केले आहे.(Ram Mandir CEO)
 
कोण आहेत सुरेश हावरे?
 
बांधकाम क्षेत्रातील एक यशस्वी उद्योजक, श्री शिर्डी साई संस्थानचे माजी अध्यक्ष म्हणून डॉ. सुरेश हावरे सुपरिचित आहेत. प्रतिष्ठित भाभा अणुसंशोधन संस्थेत (बीएआरसी) उणीपुरी तीन दशके ते अणुशास्त्रज्ञ म्हणून कार्यरत होते. आण्विक पाणबुड्यांशी संबंधित त्यांनी केलेले संशोधन आणि त्यातून विकसित केलेली ‘ओपन हायपरलुप थर्मो सिम्फन’ प्रणाली; त्या प्रणालीचा पुढे २०१६ मध्ये भारताच्या ‘आयएनएस अरिहंत’ या आण्विक पाणबुडीत झालेला अंतर्भाव किंवा भारताच्या अणुशक्ती कार्यक्रमासाठी स्वदेशी तंत्रज्ञानाचा वापर करण्याचे १९७५ मध्ये आलेले धोरण; अणुभट्यांतील संभाव्य अपघातांच्या सर्व शयता हाताळणार्‍या ‘काँट्रान’ या ‘कम्प्युटर कोड’चा केलेला विकास अशा विविध गोष्टींमागे त्यांचे भरीव योगदान आहे. २०१८ मध्ये महाराष्ट्र राज्य सरकारने त्यांना राज्यमंत्रीपदाचा दर्जा दिला. शिर्डीच्या साईबाबा संस्थानचे अध्यक्ष म्हणून काम करण्यापूर्वी त्यांनी जवाहरलाल नेहरू पोर्ट ट्रस्टचे विश्वस्त म्हणूनही काम केले आहे. 'परवडणारी घरे', 'नॅनो हाऊसिंग' याविषयी संशोधन करून त्यांनी मुंबई विद्यापीठाची डॉक्टरेट देखील मिळवली आहे.(Ram Mandir CEO)
 
 
 
 




ओंकार मुळ्ये

'मास मीडिया' या विषयातून पदवीपर्यंतचे शिक्षण पूर्ण.'कम्युनिकेशन ॲण्ड जर्नालिझम' विषयातून पदव्युत्तरपर्यंतचे शिक्षण पूर्ण. सध्या दै.'मुंबई तरुण भारत'मध्ये वेब उपसंपादक म्हणून कार्यरत. लिखाण, संगीत, वाचन, फोटोग्राफी, इ.ची आवड.लिवोग्राफी भाषाशैलीत विशेष प्रावीण्य.बालपणापासून रा.स्व.संघाचा स्वयंसेवक
संबंधित मजकूर