मुंबई : (Pigeon Health Hazard) कबुतरांमुळे फुफ्फूसांचा धोकादायक आजार होत असून त्यावर जगात कोणतेही उपचार नाहीत. त्यामुळे याबाबत तज्ञांची एक समिती नेमून सकारात्मक भूमिका घ्यावी, अशी मागणी भाजप आमदार राम कदम यांनी मंगळवारी विधानसभेत केली.
राम कदम आपल्या आईच्या निधनाचा संदर्भ देत म्हणाले की, "दि. १२ जून रोजी माझी आई धोंडुबाई कदम यांचा मृत्यू झाला. २ वर्षे तिला मरणासन्न यातना भोगाव्या लागल्या. हे कुणाच्याही आईच्या बाबतीत घडू नये. माझ्या आईला फुफ्फुसांचा आजार झाला होता, ज्याला वैद्यकीय शास्त्रात आयएलडी असे म्हणतात. या आजारावर जगात कुठेही औषध नाही. या आजाराने ग्रस्त असलेल्या रुग्णाला २४ तास ऑक्सीजनवर ठेवावे लागते. जसजसा हा आजार वाढत जातो तसतशा वेदना वाढत जातात. माझी आई १५-१५ मिनिटे खोकायची आणि बेशुद्ध व्हायची. देशभरात दरवर्षी असे ९ लाख रुग्ण आढळतात."
"ज्या कबुतरांना आपण दाणे टाकतो त्यांच्या विष्ठेमुळे वातावरणात विषाणू पसरतात आणि त्यामुळे हा आजार बळावतो. याची संपूर्ण माहिती घेतली असता कबुतरांच्या विष्ठेमुळे पाच प्रकारचे आजार होत असून यातील कोणत्याही आजारांवर उपचार नाहीत. कबुतरांना दाणे टाकू नये या मताचा मी नाही. माणसाप्रमाणे जनावरांनाही जगण्याचा अधिकार आहे. पण सिंगापूर, ऑस्ट्रेलिया, लंडन, जर्मनी, जपान, स्वित्झर्लंड, अमेरिका, न्युयॉर्क आणि शिकागोमधील कबुतरांच्या बाबतीत असलेल्या कायद्यांचा मी अभ्यास केला. कबुतरांना दाणे देणे रातोरात बंद करा असे माझे म्हणणे नाही. परंतू, परदेशात कबुतरांचे स्थलांतर, जन्म नियंत्रण किंवा सापळा असे तीन प्रकार करतात. जेणेकरून लोकवस्तीतील लोकांना आयएलडीचा त्रास होऊ नये. मुंबईत ५० हजार एकरच्या जागेवर राष्ट्रीय उद्यान आहे. आपण कबुतरांना तिकडे स्थलांतरित का करत नाही?" असा सवाल त्यांनी केला.(Pigeon Health Hazard)
तज्ञांची समिती नेमून तोडगा काढावा
ते पुढे म्हणाले की, "प्रत्येकाचा संवेदनशीलपणे विचार करणारे हे देवाभाऊंचे सरकार आहे. या सरकारने कबुतरांसोबतच आमच्या माय माऊलींचाही विचार करावा. त्यामुळे तज्ञांची एक समिती नेमून याबाबतीत काय सकारात्मक भूमिका घेता येईल आणि इथून पुढे होणारे मृत्यू कसे टाळता येतील, हे बघावे," अशी मागणी राम कदम यांनी केली.(Pigeon Health Hazard)
यावर उत्तर देताना विधानसभा अध्यक्ष अॅड. राहुल नार्वेकर म्हणाले की, "राम कदम यांनी महत्वाची माहिती सभागृहासमोर मांडली आहे. शासनाने या माहितीचा नीट विचार करून आवश्यकता असल्यास तज्ञांची समिती स्थापन करून योग्य उपाययोजना करण्यासंदर्भात कारवाई करावी."(Pigeon Health Hazard)
विज्ञान शाखेतील पदवीनंतर भारतीय जनसंचार संस्थान (IIMC) अमरावतीतून पत्रकारितेचे पदव्युत्तर शिक्षण. 'दै. मुंबई तरुण भारत'मध्ये वेब उपसंपादक या पदावर कार्यरत. शेती, साहित्य, राजकारण या विषयात विशेष रस. हस्तकला, संगीत आणि कविता लेखनाचा छंद....