किशोरवयीन मनाचा कपकेक : पालकत्वाची गोड रेसिपी

    07-Jul-2026

अमूक एक प्रकारचे पालकत्व म्हणजेच परिपूर्ण पालकत्व, हा सर्वस्वी गैरसमजच. कारण, प्रत्येक पालक हे आपापल्या परीने, त्यांच्या अनुभवांतून, संस्कारांच्या शिदोरीतून तितक्याच कष्टाने मुलांचे संगोपन करतात. परंतु, हल्लीच्या काळात पालक आणि मुलांमधील संवाद कुठे तरी हरवलेला दिसतो. तेव्हा हा हरवलेला संवाद कसा प्रस्थापित करता येईल, या अनुषंगाने सुजाण पालकत्वाची ही गोड रेसिपी...

एका आईने अगदी हसत हसत सांगितले, “लहानपणी त्याला चालायला शिकवत होते; आता त्याच्या भावनांसोबत चालायला शिकत आहे.” तिचे हे वाक्य ऐकून जाणवले की, किशोरवयीन मुलांचे संगोपन म्हणजे केवळ त्यांना वाढवणे नाही, तर त्यांच्या बदलत्या जगाला समजून घेण्याचा एक सुंदर आणि आव्हानात्मक प्रवास आहे.

पालकत्वाची एकही परिपूर्ण किंवा ठरावीक पद्धत नसते, हे सर्वप्रथम स्वीकारणे गरजेचे आहे. प्रत्येक पालक आपल्या परीने सर्वोत्तम प्रयत्न करत असतो. त्यामुळे आपल्या मुलासाठी आपण जे काही शक्य आहे, ते देत आहोत, यासाठी स्वतःची पाठ थोपटून घ्या. कारण जसे तुमचे मूल वाढत आहे, तसेच तुम्हीदेखील पालक म्हणून शिकत आणि घडत आहात. हा प्रवास परिपूर्णतेचा नसून समज, संयम आणि सततच्या शिकण्याचा आहे.

किशोरवय हा मुलांच्या आयुष्यातील अत्यंत महत्त्वाचा आणि संवेदनशील टप्पा. या काळात त्यांच्या गरजा, ध्येय, इच्छा, स्वप्ने आणि विचार करण्याची पद्धत बदलत जाते. शाळा, महाविद्यालय, मित्रपरिवार, सामाजिक माध्यमे, घरातील वातावरण आणि पालकांशी असलेले नाते या सर्वांचा त्यांच्या मानसिक आरोग्यावर खोलवर परिणाम होत असतो. त्याचबरोबर शारीरिक, हार्मोनल आणि लैंगिक बदलही घडत असतात. त्यामुळे या टप्प्यावर पालकांची भूमिका केवळ मार्गदर्शकाची नसून समजून घेणाऱ्या साथीदाराची असते.

जर किशोरवयीन मुलांच्या मानसिक आरोग्याची एखादी रेसिपी असती, तर तिचे घटक काहीसे असे असते, एक भरगच्च मूठ संयम, एक चमचा सहानुभूती, एक कप लक्षपूर्वक ऐकणे आणि त्यावर सजगतेचा मनसोक्त शिडकावा!

या सगळ्या घटकांना प्रेम, समज आणि स्वीकार यांच्या ओव्हनमध्ये हळूवारपणे भाजले, तर त्यांच्या आयुष्याचे सुंदर, मजबूत आणि संतुलित कपकेक तयार होतील.

किशोरवयात मुलांशी संवाद हा अत्यंत महत्त्वाचा असतो. शारीरिक आणि लैंगिक बदलांविषयी घरच्या घरी खुलेपणाने आणि आरोग्यदायी पद्धतीने बोलणे आवश्यक आहे. हा संवाद जितका लवकर सुरू होईल, तितके मुलं मानसिकदृष्ट्या या बदलांसाठी तयार होतील. मुलांना हे जाणवले पाहिजे की, हा टप्पा प्रत्येकजण अनुभवतो. पालकांनी स्वतःच्या अनुभवांची उदाहरणे सांगितली, तर मुलांना खात्री वाटते की ते एकटे नाहीत.

हा संवाद अनौपचारिक, मैत्रीपूर्ण आणि माहितीपूर्ण असावा. सल्ले देण्यापेक्षा मुलांचे विचार ऐकून घेण्यावर अधिक भर द्यावा. कारण, जेव्हा घरात संवादाचे दार उघडे असते, तेव्हा मुलांना चुकीच्या स्रोतांकडून माहिती किंवा मार्गदर्शन घेण्याची गरज कमी भासते.

या टप्प्यावर पालक आपल्या मुलांना एक ‌‘न्यू नॉर्मल‌’ किट देऊ शकतात. यात मुलींसाठी सॅनिटरी पॅड्स, मुलांसाठी शेव्हिंग किट, मी सक्षम आहे, मी बदल स्वीकारू शकतो, मी लवचिक आणि ताकदवान आहे, अशा सकारात्मक विधानांची कार्ड्स आणि पालकांनी लिहिलेले एक प्रेमळ पत्र असू शकते. हा केवळ वस्तूंचा संच नसून, “या प्रवासात आम्ही तुझ्यासोबत आहोत,” हा संदेश देण्याचा एक सुंदर मार्ग आहे.

किशोरवयीन मुलांशी वागताना सतत ‌‘नाही‌’ म्हणण्यापेक्षा एखाद्या गोष्टीचे फायदे-तोटे समजावून सांगणे अधिक परिणामकारक ठरते. निर्णय घेण्याची मोकळीक दिली, तर मुलांना त्यांच्या कृतींचे परिणाम समजतात आणि त्यातून शिकण्याची संधी मिळते. अर्थात, जिथे सुरक्षिततेचा प्रश्न असेल किंवा परिस्थिती धोकादायक असेल, तिथे पालकांनी ठाम हस्तक्षेप करणे गरजेचे आहे.

मुलांना वारंवार नकार मिळाला, तर ते बंडखोर होण्याची शक्यता वाढते. यासाठी गुलाबी हत्तीची गोष्ट लक्षात ठेवण्यासारखी आहे. एका मुलाला सांगितले, “गुलाबी हत्ती शोधायचा नाही.” ते ऐकताच तो गुलाबी हत्ती शोधू लागला. प्रत्यक्षात हत्ती गुलाबी नसतो, हेही त्याच्या लक्षात आले नाही. मानवी मनाची रचना अशी आहे की, ज्या गोष्टींना आपण वारंवार बंदी घालतो, त्यांच्याबद्दल उत्सुकता अधिक वाढते. त्यामुळे मुलांच्या नैसर्गिक कुतूहलाला दाबण्यापेक्षा त्याला योग्य दिशा देणे अधिक महत्त्वाचे आहे.

या संपूर्ण प्रवासात ‌‘सजगता‌’ म्हणजेच ‌‘माईंडफुलनेस‌’ हा एक प्रभावी आधार ठरू शकतो. ‌‘सजगता‌’ म्हणजे वर्तमान क्षणात पूर्णपणे उपस्थित राहणे, भूतकाळाच्या पश्चात्तापात किंवा भविष्याच्या चिंतेत अडकून न पडता, आताच्या क्षणाचा जागरूकपणे अनुभव घेणे.

पालकांनी मुलांना रोजच्या छोट्या छोट्या कृतींमधून सजगतेचा अनुभव घ्यायला प्रोत्साहित केले पाहिजे. चालताना पावलांची जाणीव ठेवणे, खाताना चवीचा अनुभव घेणे, अभ्यास करताना पूर्ण लक्ष देणे किंवा काही मिनिटे शांत बसून श्वासावर लक्ष केंद्रित करणे, ही सजगतेची सोपी रूपे आहेत.

मुलांसाठी एक छोटी सजग श्वसनक्रिया उपयुक्त ठरू शकते. शांतपणे बसा. डोळे बंद करा. हळूहळू श्वास आत घ्या आणि श्वास सोडा. पुढील दोन मिनिटे फक्त आपल्या श्वासावर लक्ष केंद्रित करा. मनात विचार आले, तर त्यांना येऊ द्या. ते आकाशात तरंगणाऱ्या ढगांसारखे पुढे निघून जातील. कोणताही विचार अडवायचा नाही, फक्त पुन्हा लक्ष श्वासाकडे आणायचे. श्वास आत घ्या, श्वास सोडा.

अशा छोट्या-छोट्या सजग क्षणांमधून किशोरवयीन मुलांना स्वतःशी जोडले जाण्याची, भावनांना समजून घेण्याची आणि मानसिक संतुलन राखण्याची ताकद मिळते.

पालकत्व म्हणजे मुलांना सतत नियंत्रित करणे नव्हे, तर त्यांच्यासोबत वाढणे. किशोरवयात तुमची भूमिका केवळ आई-वडिलांची नसून विश्वासू मित्र, संयमी श्रोते आणि सुरक्षित आधारस्तंभाची असते.

म्हणूनच, स्वतःला या टप्प्यात मुक्तपणे पोहू द्या. चुका होतील, शिकाल, पुन्हा प्रयत्न कराल. आणि लक्षात ठेवा, तुमच्या घराच्या बागेत मैत्रीची कळी उमलू द्या. मुलांना तुमची ही बाजू अनुभवू द्या. संवाद, समज आणि साथ हीच किशोरवयीन मानसिक आरोग्याची खरी किल्ली आहे.

- सोहा पाटणे
(लेखिक समुपदेशक मानसशास्त्रज्ञ, किशोरवयीन व तरुणांसाठी माईंडफुलनेस प्रशिक्षक, प्ले-थेरपिस्ट व शाळा समुपदेशक आहेत.)
(लेख ‌‘आरोग्य भारती‌’द्वारे प्रकाशित)






संबंधित मजकूर