मुंबई : (Ramraksha Andolan) "रामरक्षा आंदोलन करणाऱ्या उद्धव ठाकरे यांना काल पुस्तक वाचूनही रामरक्षेचे श्लोक म्हणता आले नाहीत. संजय राऊत, तुम्हालाही रामरक्षा म्हणता आली नाही. पक्ष आणि मते वाचवण्यासाठी तुम्ही रामरक्षा आंदोलनाच्या नावाखाली पक्षरक्षा, आमदाररक्षा, नगरसेवकरक्षा आंदोलन करत असलात तरी लक्षात घ्या, तुम्हाला रामरक्षा म्हणता येत नाही कारण तुम्हाला प्रभू रामचंद्रांचे विचार आणि हिंदुत्ववाद मान्य नाही. कितीही नाटकीपणा केलात तरी तुमचा धूर्तपणा, कावेबाजपणा ओळखून असलेली राज्यातील जनता येत्या काळातही तुमच्या अहंकाराची राख निश्चितपणे करेल." असा प्रहार भाजपा प्रदेश मुख्य प्रवक्ते नवनाथ बन यांनी सोमवार दि.६ रोजी केला.
"ठेकेदारी, कमिशनखोरी, वसुली हा जनाब संजय राऊत आणि उबाठा गटाचा धंदा आहे. गेली २५ वर्षे मुंबई महापालिका लुटणाऱ्या उबाठा गटाने भाजपाला शिकवू नये. आम्ही रस्त्यावर उतरतो, लोकांची सेवा करतो, मेवा खात नाही, हे संजय राऊत यांनी लक्षात ठेवावे. सहा महिन्यांपासून सत्तेत आल्यावर आम्ही चांगले काम करण्याचा प्रयत्न करतो आहोत. चुका झाल्या तर त्या सुधारून पुन्हा पुढे जात आहोत आणि मुंबईकरांची सेवा करण्यासाठी आम्ही तत्पर आहोत. संजय राऊत, तुमच्यासारखे आणि तुमच्या पक्षप्रमुखांसारखे घरात बसून राहणारे आम्ही नव्हेत." असे बन यांनी सुनावले.(Ramraksha Andolan)
बन पुढे म्हणाले, " लोणावळा परिसरात मुसळधार पावसामुळे मिसिंग लिंकवर दरड कोसळल्याने तेथे तातडीने दुरुस्तीचे काम सुरू आहे. एका तासात ६०० मिलिमीटर पाऊस झाल्याने दरड कोसळण्याची घटना घडली आहे. दरड कोसळणे हे सरकारच्या हातात नसते. परंतु ते दुरुस्त करण्याचे काम सरकार युद्धपातळीवर करत आहे. कुठल्याही प्रकारे नागरिकांची गैरसोय होऊ नये यासाठी सरकार आणि प्रशासन पूर्णपणे प्रयत्न करत आहे. मुळात पत्राचाळ घोटाळ्यात हजारो कोटी रुपये लुटले त्यांनी भाजपा आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना शहाणपणाचे धडे देण्याचे काम नाही."(Ramraksha Andolan)
"मानखुर्दमध्ये तीनमजली घर कोसळून सहा जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला. आम्ही तुमच्यासारखे घरात बसलेलो नाही. मी स्वतः आणि राज्याचे आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन तातडीने घटनास्थळी पोहोचत मदतकार्य सुरु केले. महापौर रितूताई तावडे यांनी स्वतः हॉस्पिटलमध्ये जाऊन जखमींची विचारपूस केली. मुख्यमंत्री फडणवीस यांनी पाच लाखांची मदत दुर्घटनेतील नातेवाईकांना दिलेली आहे. संजय राऊत, घटना घडल्यानंतर तातडीने तिथे पोहोचून लोकांना मदत करणारे, रस्त्यावर उतरून लोकांना साथ देणारे आम्ही आहोत." असेही बन यांनी सांगितले. (Ramraksha Andolan)
"महाभारताच्या इतिहासानुसार ज्यांच्यासोबत संजय असतो तो दुर्योधन, दुष्ट आणि कौरव असतो. तुम्ही कौरवांप्रमाणे मुंबई लुटली, कौरवांप्रमाणे मुंबईकरांवर अत्याचार केलेत. अडीच वर्षे महाविकास आघाडीचे सरकार असताना दुष्टांप्रमाणे तुम्ही महिलांवर अत्याचार केल्याने दुर्योधनाचे राज्य तुमचे होते. आता पांडवांचे राज्य आहे, जे जनतेची सेवा करतात, तातडीने मदत करतात आणि पायाभूत सुविधांची कामे उभी करत लोकांना दिलासा देण्याचा प्रयत्न करतात. तुमच्यासारखी लुटणारी, खंडणी मागणारी टोळी आता सत्तेत नाही."अशा शब्दात बन यांनी फटकारले.(Ramraksha Andolan)