पावसामुळे एसटी महामंडळाची सेवाही प्रभावित; ४,२१९ फेऱ्या रद्द

Mumbai Pune ST
 
मुंबई : (Mumbai Pune ST) राज्यभर सुरू असलेल्या मुसळधार पावसाचा फटका महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन (एसटी) महामंडळालाही बसला आहे. अनेक ठिकाणी रस्ते पाण्याखाली जाणे, दरडी कोसळणे आणि वाहतुकीत अडथळे निर्माण झाल्याने ६ जुलै रोजी राज्यभरातील ४,२१९ एसटी फेऱ्या रद्द करण्यात आल्या.
 
महामंडळाच्या प्राथमिक माहितीनुसार, फेऱ्या रद्द झाल्यामुळे सुमारे ३.७० कोटी रुपयांचे उत्पन्न बुडाले, तर इंधन व अन्य बाबींमधील नुकसानही वाढून सुमारे १.६० कोटी रुपयांपर्यंत पोहोचले आहे. याआधी ५ जुलै रोजी ३,६०४ फेऱ्या रद्द झाल्या होत्या आणि सुमारे १.७४ कोटी रुपयांचे उत्पन्नाचे नुकसान झाले होते. प्रवाशांच्या सुरक्षिततेला प्राधान्य देत हवामान आणि रस्त्यांची परिस्थिती लक्षात घेऊन आवश्यक तेथे एसटी सेवा तात्पुरती स्थगित किंवा वळविण्यात येत असल्याचे महामंडळाने स्पष्ट केले आहे.(Mumbai Pune ST)
 
मुंबई -पुणे एसटी सेवाही काही काळ बंद
 
सोमवार, दि.६ जुलै रोजी सकाळी पुण्याहून मुंबईसाठी निघालेल्या ४ एसटी बसेस ‘उर्से टोल नाका’ परिसरात अडकल्या होत्या, त्यांना सुरक्षितपणे पुन्हा पुण्यात माघारी बोलावण्यात आले. हेच पाहता पुणे-मुंबई मार्गावर दरड कोसळल्यामुळे प्रवाशांच्या सुरक्षेचा उपाय म्हणून या मार्गावरील सर्व एसटी बस वाहतूक पुढील आदेश येईपर्यंत पूर्णपणे बंद करण्यात आली आहे. पावसाचा जोर आणि मार्गावरील धोका लक्षात घेऊन प्रशासनाने हा अत्यंत महत्त्वाचा निर्णय घेतला आहे.(Mumbai Pune ST)
 
 




गायत्री श्रीगोंदेकर

मूळची अहिल्यानगर येथील. 'राज्यशास्त्र' विषयातील पदवी. रानडे इन्स्टिट्यूट मधून (सा.फु.पुणे विद्यापीठ) 'एमजेएमसी' विषयात पदव्युत्तर शिक्षण. २०१९मध्ये मुंबई तरुण भारतमध्ये 'मंत्रालय प्रतिनिधी' या पदावर रुजू. सद्यस्थितीत 'इन्फ्रास्ट्रक्चर आणि डेव्हलपमेंट' विशेष प्रतिनिधी म्हणून कार्यरत. राज्यातील पायाभूत सुविधांविषयी फिल्ड रिपोर्ट आणि लेखनात रस.
संबंधित मजकूर