खोपोलीत ढगफुटीचा तडाखा; मुंबई-पुणे मार्ग ठप्प, रेल्वे वाहतूक विस्कळीत

    07-Jul-2026
Khopoli Rain Cloudburst Heavy Rain
 
खोपोली : (Khopoli Rain Cloudburst Heavy Rain) गेले तीन-चार दिवस सुरू असलेल्या मुसळधार पावसाने काल रात्रीपासून रौद्ररूप धारण केले होते. खोपोलीकरांवर जणू आभाळच फाटले आहे. ढगफुटी सदृश्य पाऊस पडत होता .आसमानी संकटामुळे खोपोलीच्या अनेक सखल भागात पाणी साचले होते.८० टक्के खोपोली रात्रभर जागी होती. बोर घाटात दोन ठिकाणी तसेच कनेक्टिंग लिंक येथे दरड कोसळल्यामुळे मुंबई पुणे द्रुतगती मार्ग आणि जुना राष्ट्रीय महामार्ग या दोन्ही ठिकाणची वाहतूक १० ते १२ तास बंद होती. पळसदरी दरम्यान रेल्वे ट्रॅक खालील खडी वाहून गेल्यामुळे खोपोली ते कर्जत दरम्यान रेल्वे सेवा बंद आहे. तसेच कर्जत लोणावळा रेल्वे मार्गावरही दरड कोसळल्यामुळे अनेक एक्सप्रेस गाड्या आज रद्द करण्यात आल्या होत्या. खोपोली - पाली, खोपोली - पेण रस्ता वरही पाणी साठल्यामुळे खोपोलीकरांची चहू बाजूने कोंडी झाली होती.
 
खोपोलीच्या काटरंग, विणानगर , शिळफाटा, पटेल नगर, डी.सी.नगर, बाजारपेठेतील नदीकाठचा भाग येथे बऱ्याच ठिकाणी पाणी साठले होते. नदीकाठच्या, नाल्यालगतच्या अनेक घरांमध्ये पाणी शिरले होते. शेकडो इमारतींच्या मीटर रूम पर्यंत पाणी गेल्यामुळे शहरातील वीजपुरवठा वीस तासाहून अधिक काळ बंद होता. विहारी कडे जाणाऱ्या पुलावरून पाणी वाहत होते. खोपोली पेण रस्त्यावर सारसन ते इसांबा फाटा दरम्यान रस्त्यावर प्रचंड पाणी असल्यामुळे त्या ठिकाणची वाहतूक ठप्प होती. खोपोली टेलिफोन एक्सचेंज जवळ, यूनी माउंट बिल्डिंग समोर राष्ट्रीय महामार्गावर पाणी साठल्यामुळे अनेक तास वाहतूक ठप्प होती. बोर घाटात गारमाळ जवळ मोठी दरड कोसळल्यामुळे गारमाळ कडे जाणारा रस्ता बंद झाला होता. आज दुपारनंतर मंकी हिल येथे दरड कोसळल्यामुळे बोर घाटातील वाहतूक विस्कळीत झाली होती. (Khopoli Rain Cloudburst Heavy Rain)
 
मुंबई पुणे द्रुतगती मार्गावर फूड मॉल जवळ मोठ्या प्रमाणात पाणी साठल्यामुळे अनेक वाहने अर्धी बुडाली होती.महामार्ग काही काळासाठी ठप्प झाला होता. ठाणे न्हावे येथील पूल पडल्यामुळे तेथील गावांचा खोपोलीशी संपर्क तुटला आहे. खोपोली नगरपरिषद प्रशासन, खोपोली पोलीस, हेल्प फाउंडेशनचे सदस्य दिवस-रात्र मुसळधार पावसामुळे उद्भवलेल्या संकटावर मात करण्यासाठी झटत आहेत. (Khopoli Rain Cloudburst Heavy Rain)
 
 




संबंधित मजकूर