इंडोनेशियाच्या भात्यात आता भारताचे ‘ब्रह्मास्त्र’- पंतप्रधानांच्या दौर्‍यातील महत्त्वपूर्ण निर्णय

- नरेंद्र मोदींचा इंडोनेशियाच्या सर्वोच्च सन्मानाने गौरव

    07-Jul-2026
India Indonesia BrahMos Deal
 
जकार्ता : (India Indonesia BrahMos Deal) भारत आणि इंडोनेशिया दरम्यान संरक्षण सहकार्याला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या इंडोनेशिया दौर्‍यामध्ये विशेष उंची प्राप्त झाली असून, इंडोनेशियाने भारताकडून ‘ब्रह्मोस’ क्षेपणास्त्र खरेदीचा निर्णय घेतला आहे. याबरोबरच भारतीय बनावटीच्या ‘अस्त्र’ या क्षेपणास्त्रांची खरेदीही इंडोनेशिया करणार आहे. यामुळे भारताच्या संरक्षण निर्यातीला गती मिळण्याची शक्यता आहे.
 
तसेच यावेळी इंडोनेशियाच्या राष्ट्राध्यक्षांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना ‘बिंतांग आदिपूर्णा ऑफ द रिपब्लिक ऑफ इंडोनेशिया’ या सर्वोच्च सन्मानानेही गौरवले. पंतप्रधान मोदी यांनी राष्ट्राध्यक्ष प्राबोवो, इंडोनेशियाचे सरकार आणि जनतेचे आभार मानले आहेत. इंडोनेशियाच्या सर्वोच्च नागरी पुरस्काराने पंतप्रधान मोदी यांच्या जागतिक सन्मानांची संख्या 35 वर पोहोचली आहे.
 
पंतप्रधान नरेंद्र मोदी सध्या दोन दिवसीय इंडोनेशिया दौर्‍यावर असून, या दौर्‍यादरम्यान इंडोनेशियाने ‘ब्रह्मोस’ प्रणालीच्या खरेदीचा निर्णय जाहीर केला आहे. भारताची ‘ब्रह्मोस’ प्रणाली जगातील सर्वाधिक प्रभावी सुपरसॉनिक क्रूझ क्षेपणास्त्रांपैकी एक असून, ‘ऑपरेशन सिंदूर’मध्ये ‘ब्रह्मोस’च्या शक्तीचे दर्शन जगाला झाले होते. जमीन, समुद्र आणि हवा अशा तिन्ही क्षेत्रातील प्रभावामुळे, इंडो- पॅसिफिक क्षेत्रातील चीनच्या वाढत्या वर्चस्वाला रोखण्यासाठी ‘ब्रह्मोस’ची उपयुक्तता अधिक आहे.
 
‘ब्रह्मोस’बरोबरच भारताच्या स्वदेशी ‘अस्त्र’ या हवेतून हवेत मारा करणार्‍या क्षेपणास्त्रांच्या खरेदीलाही इंडोनेशियाने तात्विक मान्यता दिली. इंडोनेशियाच्या लढाऊ विमानांसाठी ही प्रणाली खरेदी करणार असून, त्यासोबतच प्रशिक्षण, तांत्रिक सहाय्य आणि देखभाल व्यवस्थेचाही करार होणार आहे.
 
भारताने गेल्या काही वर्षांत संरक्षण निर्यात वाढविण्याचे धोरण स्वीकारले आहे. त्याअंतर्गत विविध संरक्षण प्रणालींचा विकास भारताने केला असून, जागतिक बाजारपेठेतही त्यांची मागणी सातत्याने वाढती आहे. व्हिएतनाम आणि फिलिपिन्सनंतर इंडोनेशियानेही ‘ब्रह्मोस’ खरेदीचा निर्णय घेतल्याने, भारताच्या संरक्षण भागीदारीला अधिक बळकटी प्राप्त झाली आहे. या करारामुळे भारताच्या ‘मेक इन इंडिया’ आणि संरक्षण निर्यातीला आणखी बळ मिळणार आहे.
 
संरक्षण सहकार्याव्यतिरिक्त पंतप्रधान मोदी आणि इंडोनेशियाचे अध्यक्ष प्रबोवो सुबियांतो यांच्यात सागरी सुरक्षा, महत्त्वपूर्ण खनिजांचा पुरवठा, कृषी, अन्नसुरक्षा आणि पुरवठा साखळी बळकट करण्याबाबतही चर्चा झाली. दरम्यान, पंतप्रधान मोदी यांनी इंडोनेशियाच्या संसदेतही संबोधन केले. पंतप्रधान मोदी यांच्या दोन दिवसीय इंडोनेशिया दौर्‍यामध्ये मंगळवारी संध्याकाळी त्यांनी भारतीय समुदायाला संबोधित केले. तर बुधवार दि. 8 जुलै रोजी ते इंडोनेशियातील सर्वात मोठ्या हिंदू मंदिर प्रंबननला भेट देणार आहेत.(India Indonesia BrahMos Deal)
 
भारत इंडोनेशिया द्विपक्षीय बैठकीतील ठळक मुद्दे
 
- भारत इंडोनेशियाला इव्हीएम विकसित करण्यासाठी मदत करणार
- भारताची इंडोनेशियाच्या पोलाद, निकेल आणि दुर्मीळ खनिजे क्षेत्रात गुंतवणूक
- सबांग बंदरांचा विकास भारत आणि इंडोनेशिया संयुक्तपणे करणार
पंतप्रधान मोदींच्या इंडोनेशियातील संबोधनातील ठळक मुद्दे
- अस्थिरतेच्या काळात संवाद आणि मुत्सद्देगिरीचे महत्त्व अधिक.
- भारत आणि इंडोनेशियाचा इतिहासात साम्य.
- दोन्ही राष्ट्रे इंडोनेशिया एमास आणि विकसित भारताचे स्वप्न साकारणार लोकशाही मूल्ये आणि विविधतेतील एकता हीच दोन्ही राष्ट्रांची बलस्थाने
- इंडो-पॅसिफिक क्षेत्राबाबतचे दोन्ही देशांचे दृष्टिकोन एकसमान
- भारताने नेहमीच आसियानच्या मध्यवर्ती भूमिकेला विशेष महत्त्व दिले
 
 




संबंधित मजकूर