रोहित पवारांच्या आरोपांना गोपीचंद पडळकरांचा जोरदार प्रतिहल्ला

"देवेंद्र फडणवीसांनी विदर्भाच्या विकासाचा बॅकलॉग भरून काढला"

Gopichand Padalkar on Rohit Pawar
 
मुंबई : (Gopichand Padalkar on Rohit Pawar) 'मिसिंग लिंक' प्रकल्पाच्या बांधकामावरून राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी केलेल्या टीकेला भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी विधानसभेत जोरदार प्रत्युत्तर दिले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली राज्यात मोठ्या प्रमाणावर विकासकामे सुरू असून, राष्ट्रवादी काँग्रेसला त्यावर टीका करण्याचा नैतिक अधिकार नसल्याचा घणाघात त्यांनी केला.
 
रोहित पवार यांच्यावर टीका करताना पडळकर म्हणाले, "ज्यांना विदर्भातील प्रश्नांची जाण नाही, ज्यांनी स्वतः कोणतेही विकासकाम केले नाही, ते आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर बोलत आहेत. हे त्यांचे अज्ञान आहे. ज्या विदर्भातून मुख्यमंत्री येतात, त्या विदर्भाचा गेल्या साठ वर्षांचा विकासाचा बॅकलॉग देवेंद्र फडणवीस यांनी भरून काढला आहे."
शरद पवार यांच्यावर निशाणा साधताना त्यांनी, "यांच्या आजोबांनी विकासाची एक वीटही रचली नाही. त्यामुळे इतरांनी जास्त शहाणपणा शिकवू नये. मुख्यमंत्री फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली सुरू असलेली विकासकामे उघड्या डोळ्यांनी पाहावे," असे म्हटले.
 
'मिसिंग लिंक' प्रकल्पाबाबत बोलताना पडळकर यांनी हा प्रकल्प आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून उभारण्यात आल्याचे सांगितले. "आमच्या सरकारच्या काळात कनेक्टिंग लिंक प्रकल्पाला गती मिळाली. जगातील अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा या प्रकल्पात वापर करण्यात आला आहे. पहिल्याच पावसात काही अडचणी निर्माण होणे ही असामान्य बाब नाही. परदेशातही अशा घटना घडतात. त्यामुळे वस्तुस्थिती जाणून घेतल्याशिवाय राजकारण करू नये," असे त्यांनी स्पष्ट केले. (Gopichand Padalkar on Rohit Pawar)
 
कर्नाटकात वाहून जाणारे पाणी दुष्काळग्रस्त जिल्ह्यांकडे वळवावे
 
यावेळी पडळकर यांनी राज्यातील असमान पावसाच्या परिस्थितीकडेही सरकारचे लक्ष वेधले. ठाणे, कोकण, पुणे आणि महाबळेश्वर परिसरात मुसळधार पाऊस पडत असताना जत, सांगोला, मंगळवेढा, कवठेमहांकाळ, आटपाडी आणि खानापूर या दुष्काळी भागात अद्याप समाधानकारक पाऊस झाला नसल्याचे त्यांनी सांगितले. (Gopichand Padalkar on Rohit Pawar)
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्याकडे मागणी करताना त्यांनी, कोयना, वारणा आदी धरणांमधील अतिरिक्त पाणी कर्नाटकात वाहून जाण्यापूर्वी ते दुष्काळग्रस्त तालुक्यांकडे वळविण्याच्या सूचना अधिकाऱ्यांना द्याव्यात, अशी मागणी केली. त्यामुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान टाळण्यास मदत होईल, असेही त्यांनी नमूद केले. (Gopichand Padalkar on Rohit Pawar)
 
 




गायत्री श्रीगोंदेकर

मूळची अहिल्यानगर येथील. 'राज्यशास्त्र' विषयातील पदवी. रानडे इन्स्टिट्यूट मधून (सा.फु.पुणे विद्यापीठ) 'एमजेएमसी' विषयात पदव्युत्तर शिक्षण. २०१९मध्ये मुंबई तरुण भारतमध्ये 'मंत्रालय प्रतिनिधी' या पदावर रुजू. सद्यस्थितीत 'इन्फ्रास्ट्रक्चर आणि डेव्हलपमेंट' विशेष प्रतिनिधी म्हणून कार्यरत. राज्यातील पायाभूत सुविधांविषयी फिल्ड रिपोर्ट आणि लेखनात रस.
संबंधित मजकूर