दापोली ते पोलादपूरमार्गे महाबळेश्वर राष्ट्रीय महामार्गाची निर्मिती होणार? ; आमदार प्रवीण दरेकर यांनी केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरींची घेतली भेट
नवी दिल्ली : (Dapoli Mahabaleshwar Highway) दापोली ते पोलादपूरमार्गे महाबळेश्वर या राष्ट्रीय महामार्गाला मंजुरी देण्याबाबत भाजपा गटनेते आमदार प्रवीण दरेकर यांनी नवी दिल्ली येथे केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांची सोमवारी त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली. यावेळी आ. दरेकरांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना आपल्या मागणीचे निवेदनही दिले. आ. प्रवीण दरेकर यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, दापोली ते पोलादपूरमार्गे महाबळेश्वर हा महामार्ग कोकण आणि पश्चिम महाराष्ट्राला जोडणारा अत्यंत महत्त्वाचा दुवा आहे.
सध्याच्या दापोली महाबळेश्वर मार्गावर असलेला आंबेनळी घाट हा अतिशय वळणाचा आणि संवेदनशील आहे. या घाटात दरडी कोसळणे आणि रस्ता खचणे यासारख्या समस्यांना सातत्याने तोंड द्यावे लागते. राज्य शासनाकडून रस्ता रुंदीकरण, कडेचे बांधकाम, धोकादायक वळणांवर भिंती बसविणे ही कामे केली जातात. परंतु महाबळेश्वर आणि पोलादपूर पट्ट्यात मुसळधार पाऊस पडत असल्याने, दरड कोसळण्याच्या धोक्यामुळे सध्याचा रस्ता काही वेळा बंदही करावा लागतो. महाबळेश्वर देशातील महत्त्वाचे पर्यटन स्थळ आहे.
तर दापोली आणि कोकण किनारपट्टीवर अतिशय स्वच्छ आणि सुंदर असे बीचेस, तीर्थक्षेत्र आहेत. पश्चिम महाराष्ट्रातील विशेषतः सातारा, सांगली, कोल्हापूर या परिसरातून कोकणात येण्यासाठी आणि कोकणातील लोकांना पश्चिम महाराष्ट्रात जाण्यासाठी अधिक सुरक्षित व वेगवान महामार्गाची नितांत गरज असून दापोली ते पोलादपूरमार्गे महाबळेश्वर या राष्ट्रीय महामार्गाची उभारणी करावी, अशी मागणी सातत्याने केली जात आहे.(Dapoli Mahabaleshwar Highway)
विकासाच्या दिशेने एक महत्त्वपूर्ण पाऊल…
आज नवी दिल्ली येथे केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री मा. श्री. @nitin_gadkari जी यांची त्यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट घेऊन दापोली – पोलादपूर – महाबळेश्वर राष्ट्रीय महामार्गाला मंजुरी देण्याबाबतचे निवेदन सादर केले.
— Pravin Darekar - प्रविण दरेकर (@mipravindarekar) July 6, 2026
हा महामार्ग झाल्यास पर्यटनाला चालना मिळेल, प्रवास सुरक्षित व वेगवान होईल, कोकणातील आंबा, काजू इत्यादी उत्पादनांच्या वाहतुकीलाही मोठी गती मिळणार आहे. त्यामुळे दापोली ते पोलादपूरमार्गे महाबळेश्वर या राष्ट्रीय महामार्गाला आपण मंजुरी द्यावी व त्यासाठी आवश्यक ती आर्थिक तरतूद करावी, अशी विनंतीही दरेकरांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना निवेदनाद्वारे केली. त्याला केंद्रीय मंत्री गडकरी यांनीही सकारात्मक प्रतिसाद दिल्याची माहितीही दरेकर यांनी दिली आहे.(Dapoli Mahabaleshwar Highway)