मुंबई : राम मंदिरातील देणगी गैरव्यवहार प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर श्रीराम जन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टचे महासचिव चंपत राय यांचा राजीनामा मंजूर करण्यात आला आहे. त्यांच्याजागी कृष्ण मोहन यांची महासचिवपदी नियुक्ती करण्यात आली आहे. या प्रकरणात चंपतराय आणि अनिल मिश्रा त्यांच्यावर सातत्याने प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात होते. त्यानंतर त्यांनी महासचिवपदाचा राजीनामा दिला होता. त्यांच्यासोबत ट्रस्टचे सदस्य अनिल मिश्रा यांनीही राजीनामा सादर केला होता. हे दोन्ही राजीनामे बैठकीत स्वीकारण्यात आले असून दोघांची जबाबदारी कृष्ण मोहन यांच्याजवळ सोपवण्यात आली आहे.
अशी माहिती आहे की, राजीनामा मंजूर झाल्यानंतर चंपत राय आता ट्रस्टचे महासचिव राहणार नाहीत. सोमवारी दुपारी तीन वाजता ट्रस्टचे अध्यक्ष महंत नृत्यगोपाल दास यांच्या अध्यक्षतेखाली बैठक सुरू झाली. बैठकीच्या प्रारंभी त्यांनी या संपूर्ण प्रकरणाबद्दल दुःख व्यक्त केले. या संपूर्ण घटनेशी आपण व्यतीथ असून हा हिंदू समाजाच्या श्रद्धेशी निगडित विषय असल्याने दोषींवर कठोर कारवाई झाली पाहिजे; अशी भूमिका त्यांनी मांडली.
यानंतर ट्रस्टचे कोषाध्यक्ष स्वामी गोविंद देव गिरीजी महाराज यांनी बैठकीचा अजेंडा मांडला. त्यांनी चंपत राय आणि अनिल मिश्रा यांच्या राजीनाम्यांवर विचार करण्याचा प्रस्ताव ठेवला. बैठकीत उपस्थित संत-महंतांनी या प्रकरणामुळे रामभक्तांच्या श्रद्धेला मोठा धक्का बसल्याची भावना व्यक्त केली. ट्रस्टचे सदस्य कृष्ण मोहन यांनी या प्रकरणात एफआयआर दाखल करण्यामागील कारण स्पष्ट केले. त्यांनी सांगितले की, प्राथमिक चौकशीत आर्थिक अनियमितता आढळून आल्यानंतर प्रथमदर्शनी उपलब्ध झालेल्या पुराव्यांच्या आधारे गुन्हा दाखल करण्याचा निर्णय घेण्यात आला.
ट्रस्टमध्ये सध्या ११ नियमित सदस्य
सध्या श्रीराम जन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टमध्ये ११ नियमित सदस्य आहेत. यामध्ये अध्यक्ष महंत नृत्यगोपाल दास, वासुदेवानंद सरस्वती, विश्वप्रसन्नतीर्थ, परमानंद गिरी, कोषाध्यक्ष गोविंद देव गिरी, कृष्ण मोहन, दिनेंद्र दास आणि के. परासरन यांचा समावेश आहे. चंपत राय आणि अनिल मिश्रा यांनी राजीनामे दिले असून, ट्रस्टी बिमलेंद्र मोहन प्रताप मिश्रा यांचे निधन झाले आहे. पदसिद्ध सदस्यांमध्ये केंद्र सरकारचे सचिव प्रशांत लेखंडे, उत्तर प्रदेश शासनाचे अपर मुख्य सचिव (गृह) संजय प्रसाद, अयोध्याचे जिल्हाधिकारी शशांक त्रिपाठी आणि पंतप्रधानांचे माजी प्रधान सचिव नृपेंद्र मिश्रा यांचा समावेश आहे. गोपाल राव हे ट्रस्टचे विशेष निमंत्रित सदस्य आहेत.
२,३७० कोटी रुपये मंदिराच्या बांधकामासाठी वापर
निधी समर्पण अभियान आणि कॉर्पस देणग्यांद्वारे प्राप्त झालेल्या एकूण ३,२६४ कोटी रुपयांपैकी २,३७० कोटी रुपये मंदिराच्या बांधकामासाठी आणि भांडवली खर्चासाठी वापरण्यात आले आहेत. स्थापनेपासून ३१ मार्च पर्यंत भक्तांकडून एकूण ५८२ कोटी रुपयांचा चढावा प्राप्त झाला असून, त्यापैकी ३९१ कोटी रुपये संचालन खर्चासाठी वापरण्यात आले आहेत. उर्वरित रक्कम बँक खात्यांमध्ये सुरक्षित आहे. या सर्व आर्थिक माहितीची वेळोवेळी प्रसारमाध्यमांसमोर मांडणी करण्यात आल्याचे पत्रकार परिषदेदरम्यान सांगण्यात आले.
दोषीविरोधात कठोर शिक्षा झाली पाहिजे
एसआयटीच्या प्राथमिक अहवालात आठ जणांची नावे समोर आली. ज्यांच्याविरुद्ध प्रथमदर्शनी पुरावे आढळले, त्यांच्याविरुद्ध न्यासाने गुन्हे दाखल केले असून काहींना अटकही करण्यात आली आहे. आता संपूर्ण प्रकरण कायद्यानुसार पुढे सुरू आहे. न्यासाचे स्पष्ट मत आहे की, जो कोणी दोषी असेल त्याच्याविरुद्ध कायदेशीर कारवाई करून त्याला कठोरात कठोर शिक्षा झाली पाहिजे, असे मत पत्रकार परिषदेत व्यक्त करण्यात आले.
व्यवस्थापनातील त्रुटी दूर करून अधिक सक्षम करण्याची गरज
पत्रकार परिषदेदरम्यान गोविंद देव गिरी महाराज यांनी न्यासाचे मत मांडताना सांगितले की, चौकशीची कायदेशीर प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतरच सत्य स्पष्ट होईल आणि तोपर्यंत कोणावरही दोषारोप करणे योग्य ठरणार नाही. न्यासाने व्यवस्थापन आणि प्रशासनातील त्रुटी दूर करून ती अधिक सक्षम करण्याची गरज अधोरेखित केली आहे. एसआयटीच्या अपेक्षित शिफारसींबरोबरच स्वतंत्र तज्ज्ञांचा सल्ला घेण्याचाही प्रस्ताव मांडण्यात आला, जेणेकरून मंदिर व्यवस्थापनाची आदर्श, कार्यक्षम आणि पारदर्शक प्रणाली विकसित होऊन ती या क्षेत्रासाठी अनुकरणीय ठरेल.
जनतेमध्ये संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न
काहीजण या दुर्दैवी घटनेचा उपयोग श्रीरामलल्ला मंदिर, श्रीराम जन्मभूमी, हिंदू समाज आणि व्यापक हिंदू श्रद्धेला कमकुवत करण्यासाठी करण्याचा प्रयत्न करत आहेत. सत्य समोर आणण्याऐवजी जनतेमध्ये संभ्रम निर्माण करण्याच्या उद्देशाने निराधार आरोप करण्यात येत असल्याचे न्यासाचे मत आहे.