पूरस्थितीमुळे माऊलींचा प्रस्थान सोहळा मर्यादित; मोजक्या दिंड्या व मानकऱ्यांच्या उपस्थितीतच होणार पालखी प्रस्थान

    07-Jul-2026   
 
Dnyaneshwar Maharaj Palkhi, Alandi Palkhi, Ashadhi Wari 2026, Alandi Flood, Indrayani River, Palkhi Prasthan, Warkari, Mauli Palkhi, Maharashtra Rain, Pandharpur Wari
 
मुंबई : (Dnyaneshwar Maharaj Palkhi) तीर्थक्षेत्र आळंदीत सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे इंद्रायणी नदीला आलेल्या पुराने गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. नदीने धोक्याची पातळी ओलांडल्याने नदीवरील पूल पाण्याखाली गेले असून शहरातील वाहतूक पूर्णपणे विस्कळीत झाली आहे. या पार्श्वभूमीवर श्री ज्ञानेश्वर महाराज संस्थान समितीने आषाढीवारी पालखी प्रस्थान सोहळा अत्यंत मर्यादित स्वरूपात पार पाडण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. बुधवार, दि. ८ जुलै रोजी दुपारी ३ वाजता श्री संत ज्ञानेश्वर महाराज संजीवन समाधी मंदिरातून निघणारा पालखी प्रस्थान सोहळा यंदा मोजक्या दिंड्या, मानकरी आणि मर्यादित वारकऱ्यांच्या उपस्थितीत पार पडणार आहे.
 
समितीच्या निर्णयानुसार, रथापुढील दिंडी क्रमांक १ ते २७ आणि रथामागील दिंडी क्रमांक १ ते २० या प्रत्येक दिंडीतून केवळ १० वारकऱ्यांना सहभागी होण्याची परवानगी देण्यात आली आहे. त्यामुळे एकूण ५६० वारकरी या सोहळ्यात सहभागी होणार आहेत. त्याचबरोबर परंपरेनुसार दिंडीप्रमुख, मानकरी, सहकारी, प्रतिष्ठित यांना नारळ प्रसादासाठी एकूण ५०० व्यक्तींना प्रवेश दिला जाईल. त्याचबरोबर मानाचे खांदेकरी, कर्मचारी, आरोग्य, स्वच्छता सेवक, पोलीस असे मिळून एकूण १६६० व्यक्तींच्या मर्यादित स्वरूपात प्रस्थान सोहळा पार पाडण्यात येणार आहे. (Dnyaneshwar Maharaj Palkhi)
 
आळंदीतील पूरस्थितीमुळे भाविकांसाठी उभारण्यात आलेल्या सुविधांचेही मोठ्याप्रमाणात नुकसान झाल्याचे दिसते. आषाढीवारी पालखी सोहळ्यासाठी उभारलेली दर्शनबारी तसेच अनेक मोबाइल स्वच्छतागृहे पुराच्या पाण्यात वाहून गेली. संपूर्ण परिसरातील वीजपुरवठा खंडित झाला असून, तंबू आणि राहुट्यांच्या परिसरात मोठ्या प्रमाणावर चिखल साचला आहे. त्यामुळे हजारो भाविकांच्या निवारा, स्वच्छता आणि मूलभूत सुविधांची व्यवस्था करणे प्रशासनापुढे मोठे आव्हान निर्माण झाले आहे.
 
पूरस्थिती लक्षात घेऊन प्रशासन, आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा आणि संस्थान समिती परिस्थितीवर सातत्याने लक्ष ठेवून आहेत. भाविकांनी प्रशासनाच्या सूचनांचे पालन करावे, अनावश्यक गर्दी टाळावी आणि सुरक्षिततेला प्राधान्य द्यावे, असे आवाहन करण्यात आले आहे. आषाढीवारीच्या पारंपरिक उत्साहावर यंदा नैसर्गिक आपत्तीचे सावट आले असले, तरी संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी प्रस्थानाचा धार्मिक विधी परंपरेनुसार पार पडणार असून, सुरक्षेच्या दृष्टीने आवश्यक त्या सर्व उपाययोजना करण्यात येत आहेत. (Dnyaneshwar Maharaj Palkhi)




ओंकार मुळ्ये

'मास मीडिया' या विषयातून पदवीपर्यंतचे शिक्षण पूर्ण.'कम्युनिकेशन ॲण्ड जर्नालिझम' विषयातून पदव्युत्तरपर्यंतचे शिक्षण पूर्ण. सध्या दै.'मुंबई तरुण भारत'मध्ये वेब उपसंपादक म्हणून कार्यरत. लिखाण, संगीत, वाचन, फोटोग्राफी, इ.ची आवड.लिवोग्राफी भाषाशैलीत विशेष प्रावीण्य.बालपणापासून रा.स्व.संघाचा स्वयंसेवक
संबंधित मजकूर