कायद्याच्या चौकटीत राहूनही माणुसकी जपण्याचा प्रयत्न करणाऱ्या अधिवक्ता विद्या सुजित लुबल यांचा प्रवास संवेदनशील वकिलीचा आहे. जाणून घेऊया त्यांच्याविषयी...
कायदा हा केवळ कलमे, न्यायालयीन प्रक्रिया किंवा युक्तिवादापुरता मर्यादित नसून तो माणसांच्या आयुष्याशी, त्यांच्या संघर्षाशी, वेदनांशी आणि न्यायाच्या अपेक्षांशी जोडलेला असतो. त्यामुळे वकिली म्हणजे केवळ खटले जिंकण्याची स्पर्धा नसून, अन्यायग्रस्तांच्या बाजूने खंबीरपणे उभे राहण्याची सामाजिक जबाबदारी आहे. ही जबाबदारी जाणीवपूर्वक स्वीकारत ॲड. विद्या लुबल यांनी आपल्या कार्यातून संवेदनशील वकिलीची वेगळी ओळख निर्माण केली आहे. न्यायालयातील लढाईसोबतच संवादातून तुटलेली नाती जोडणे, कुटुंबांना पुन्हा एकत्र आणण्याचा प्रयत्न करणे आणि कायद्याबरोबर माणुसकीलाही समान स्थान देणे, ही त्यांच्या कार्याची खरी ओळख ठरते.
सोलापूर जिल्ह्यातील माळशिरस तालुक्यातील पिलीव या गावातील शेतकरी कुटुंबात त्यांचा जन्म झाला. ग्रामीण भागातील संघर्षमय वातावरणात त्यांची जडणघडण झाली. त्यांच्या आयुष्यात निर्णायक वळण आणले, ते काका बाळकृष्ण पांडुरंग लेंगरे यांनी. शिक्षणासाठी त्यांनी त्यांना नालासोपारा येथे आणले आणि केवळ शिक्षणाचीच नव्हे; तर स्वाभिमान, सामाजिक जबाबदारी, संकटांशी दोन हात करण्याची तयारी आणि स्वतःच्या कर्तृत्वावर उभे राहण्याची शिकवण दिली. आजही त्या आपल्या आयुष्यातील सर्वांत मोठी प्रेरणा म्हणून काकांचा उल्लेख करतात.
बारावीनंतर त्यांना फॅशन डिझायनिंग आणि अध्यापन क्षेत्रात करिअर करायचे होते. मात्र, काकांचे एक वाक्य त्यांच्या आयुष्याचा मार्ग बदलून गेले- ‘अन्याय सहन करणाऱ्यांसाठी लढणारी वकील हो.’ कुटुंबाकडून लवकर विवाहाचा आग्रह असतानाही काका-काकींनी शिक्षण पूर्ण करण्यासाठी त्यांना भक्कम पाठबळ दिले. त्यातून त्यांनी ‘विधी’ शिक्षण पूर्ण केले. 2014 मध्ये वकिलीची ‘सनद’ मिळवली आणि 2016 पासून न्यायालयीन व्यवसायाला सुरुवात केली.
सुरुवातीची काही वर्षे अत्यंत संघर्षाची होती. महिन्याला अवघे एक हजार रुपये मानधन मिळत असतानाही त्यांनी काम थांबवले नाही. आर्थिक मोबदल्यापेक्षा एखाद्या गरजू व्यक्तीला न्याय मिळवून देण्याचे समाधान त्यांच्यासाठी अधिक महत्त्वाचे होते. 2016 ते 2020 याकाळात आर्थिकदृष्ट्या दुर्बल, विनाकारण गुन्ह्यांत अडकलेल्या आणि सक्षम कायदेशीर मदतीपासून वंचित असलेल्या अनेकांना त्यांनी न्याय मिळवून दिला. यानंतर स्वतंत्र वकिली सुरू करत त्यांनी फौजदारी, दिवाणी आणि कौटुंबिक स्वरूपाच्या विविध प्रकरणांत स्वतःची विश्वासार्ह ओळख निर्माण केली.
त्यांच्या कारकिदत अनेक संवेदनशील प्रकरणे आली. कौटुंबिक विरोधामुळे गंभीर गुन्ह्यांत अडकलेल्या तरुणांना कायद्याच्या चौकटीत राहून योग्य न्याय मिळावा, त्यांच्या आयुष्यावर कायमचा डाग लागू नये, यासाठी त्यांनी अभ्यासपूर्ण बाजू न्यायालयात मांडली. त्यांच्या मते, प्रत्येक प्रकरणाचा मानवी आणि कायदेशीर दोन्ही बाजूंनी सखोल अभ्यास होणे आवश्यक आहे.
त्यांच्या व्यावसायिक आयुष्यातील एक कठीण अनुभव म्हणजे, चार भावांमधील कौटुंबिक वादाचे प्रकरण. त्या प्रकरणात त्यांच्या वैयक्तिक आयुष्यावरही आरोप करण्यात आले. व्यावसायिक सचोटी कायम ठेवत त्यांनी दीर्घकाळ लढा दिला. मात्र, परिस्थितीमुळे अखेर त्यांनी स्वतःहून ती केस सोडली.
त्यांच्या कारकिदत एका न्यायाधीशांनी दिलेला सल्ला आजही त्या जपून ठेवतात-‘पक्षकाराची बाजू अभ्यासपूर्वक, ठामपणे आणि सातत्याने मांडली, तर न्यायव्यवस्थेवरील विश्वास अधिक दृढ होतो.’ हा विचारच त्यांच्या स्वतंत्र वकिलीचा आधार बनला.
कौटुंबिक न्यायालयातील त्यांचे कार्य विशेष उल्लेखनीय. त्यांच्या मते, प्रत्येक वादाचा शेवट न्यायालयीन निकालातच व्हावा असे नाही. संवादाची दारे उघडली, तर अनेक संसार वाचू शकतात. त्यामुळे त्या समेट आणि संवादाला प्राधान्य देतात. अनेक दाम्पत्यांमध्ये पुन्हा संवाद घडवून आणत त्यांनी संसार टिकविण्याचा प्रयत्न केला आहे आणि जिथे एकत्र राहणे शक्य नसते, तिथे परस्पर सन्मान राखत योग्य कायदेशीर मार्ग निवडण्याचे मार्गदर्शनही केले आहे.
आज त्या ठाणे, बेलापूर, पनवेल, तसेच विविध कनिष्ठ आणि सत्र न्यायालयांमध्ये नियमितपणे वकिली करीत आहेत. विविध प्रकारच्या फौजदारी, दिवाणी आणि कौटुंबिक प्रकरणांमध्ये त्यांनी प्रभावी कामगिरी केली असून, पक्षकारांचा विश्वास हेच आपल्या कार्याचे सर्वांत मोठे यश असल्याचे त्या मानतात.
शेतकरी कुटुंबातील एका मुलीपासून संवेदनशील आणि अभ्यासू अधिवक्त्यापर्यंतचा त्यांचा प्रवास हा जिद्द, शिक्षण, संस्कार आणि सामाजिक बांधिलकीचा प्रेरणादायी प्रवास आहे. न्यायालयात खटले जिंकणे ही यशाची एक बाजू असली, तरी न्यायव्यवस्थेवरील विश्वास टिकवून ठेवणे, तुटलेली नाती जोडणे आणि कायद्याच्या माध्यमातून समाजात सकारात्मक बदल घडवणे, हेच त्यांच्या कार्याचे खरे यश आहे. दै. ‘मुंबई तरुण भारत’तर्फे अधिवक्ता विद्या सुजित लुबल यांच्या पुढील वाटचालीस मनःपूर्वक शुभेच्छा!
9967020364