मुंबई : (West Bengal 12-Year-Old Girl Death) पश्चिम बंगालच्या दक्षिण २४ परगणा जिल्ह्यातील बारुईपूर येथे १२ वर्षीय मुलीचा संशयास्पद परिस्थितीत मृत्यू झाल्यानंतर संपूर्ण परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. शनिवारी सायंकाळी घराबाहेर गेलेल्या या मुलीचा मृतदेह रविवारी सकाळी सूर्यपूर हाटजवळील एका तलावातून आढळून आला. मृत मुलीच्या कुटुंबीयांनी आरोप केला आहे की, चार जणांनी तिचे अपहरण करून तिच्यावर लैंगिक अत्याचार केला आणि त्यानंतर तिची हत्या करून मृतदेह तलावात फेकून दिला. या घटनेनंतर स्थानिक नागरिकांनी तीव्र आंदोलन केले. या प्रकरणात आतापर्यंत चार जणांना अटक करण्यात आली असून, इतर संशयितांचा शोध घेण्यासाठी पोलिसांकडून सातत्याने छापेमारी सुरू आहे.
घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन मुख्यमंत्री शुभेंदू अधिकारी यांनी पीडित मुलीच्या वडिलांशी दूरध्वनीवरून संवाद साधत दोषींवर कठोर कारवाई करण्याचे आश्वासन दिले. तसेच मंगळवार, दि. ७ जुलै रोजी पीडित कुटुंबाला भवानी भवन येथे बोलावण्यात आले आहे. अशी माहिती आहे की, या प्रकरणात स्वतः मुख्यमंत्री शुभेंदू अधिकारी यांनी लक्ष घातले असून तपासासाठी एसआयटी स्थापन करण्यात आली आहे. प्रशासन पीडित कुटुंबाच्या सतत संपर्कात असून दोषींना कोणतीही सवलत दिली जाणार नाही आणि शक्य तितक्या लवकर न्याय मिळवून दिला जाईल, असा विश्वास देण्यात आला आहे. (West Bengal 12-Year-Old Girl Death)
दरम्यान, प्रेसिडेन्सी रेंजचे पोलीस महानिरीक्षक कंकर प्रसाद बारुई यांनी सांगितले की, मुलीच्या मृतदेहाचे लवकरच शवविच्छेदन करण्यात येणार असून आवश्यक वाटल्यास संपूर्ण प्रक्रियेचे व्हिडिओ चित्रीकरणही केले जाईल. शवविच्छेदन अहवालातून मृत्यूचे नेमके कारण तसेच लैंगिक अत्याचार झाला होता का, याबाबत स्पष्टता येण्याची अपेक्षा आहे. फरार आरोपींना अटक करण्यासाठी पोलिसांची छापेमारी सुरू असल्याचेही त्यांनी सांगितले.
शनिवारी सायंकाळी संबंधित मुलगी घरातील सामान खरेदीसाठी बाहेर गेली होती. दुसऱ्या दिवशी सकाळी तिचा मृतदेह गोणीत भरलेल्या अवस्थेत आढळल्यानंतर संतप्त नागरिकांनी बारुईपूर-जयनगर मार्गावर टायर जाळून रस्ता रोको केला. पोलिसांच्या वाहनांची तोडफोड करण्यात आली. तसेच सूर्यपूर स्थानकावर आंदोलन करत सियालदह-नामखाना रेल्वेमार्गावरील वाहतूक सुमारे एक तास ठप्प करण्यात आली. (West Bengal 12-Year-Old Girl Death)
आंदोलनादरम्यान, या गुन्ह्यात सहभागी असल्याच्या संशयावरून संतप्त जमावाने एका युवकाला मारहाण करून ठार केल्याची घटना घडली. यावेळी पोलिसांवर दगडफेकही करण्यात आली असून काही पोलीस कर्मचारी जखमी झाले. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांना लाठीमार करावा लागला. जमावाकडून झालेल्या या हत्येप्रकरणीही पोलिसांनी स्वतंत्र तपास सुरू केला आहे. (West Bengal 12-Year-Old Girl Death)
'मास मीडिया' या विषयातून पदवीपर्यंतचे शिक्षण पूर्ण.'कम्युनिकेशन ॲण्ड जर्नालिझम' विषयातून पदव्युत्तरपर्यंतचे शिक्षण पूर्ण. सध्या दै.'मुंबई तरुण भारत'मध्ये वेब उपसंपादक म्हणून कार्यरत. लिखाण, संगीत, वाचन, फोटोग्राफी, इ.ची आवड.लिवोग्राफी भाषाशैलीत विशेष प्रावीण्य.बालपणापासून रा.स्व.संघाचा स्वयंसेवक