प्रियंका गांधी वाड्रा, अरविंद केजरीवाल यांची चौकशी करा; राम मंदिरातील कथित देणगी अपहार प्रकरणात विश्व हिंदू परिषदेची मागणी

    06-Jul-2026   
Ram Temple Donation Misappropriation Case
 
मुंबई : (Ram Temple Donation Misappropriation Case) अयोध्येतील श्रीराम मंदिर जन्मभूमी मंदिराच्या कथित देणगी अपहार प्रकरणात सार्वजनिकरीत्या आरोप करणाऱ्या विविध राजकीय नेत्यांची चौकशी करण्यात यावी, अशी मागणी विश्व हिंदू परिषदेचे आंतरराष्ट्रीय अध्यक्ष अॅड. आलोक कुमार यांनी अयोध्या पोलिसांकडे केली आहे. विशेषतः प्रियंका गांधी वाड्रा, अरविंद केजरीवाल आणि राम गोपाल यादव यांनी केलेल्या दाव्यांची सत्यता पडताळून पाहण्याची त्यांनी मागणी केली आहे.
 
विश्व हिंदू परिषदेने नुकत्याच प्रसिद्ध केलेल्या निवेदनात म्हटले की, वरिष्ठ विधिज्ञ असलेले आलोक कुमार यांनी राम जन्मभूमी देणगी अपहार प्रकरणाचा तपास करणाऱ्या तपास अधिकाऱ्यांना पत्र लिहून या नेत्यांची चौकशी करण्याची विनंती केली आहे. त्यांच्या मते, संबंधित नेत्यांनी विशिष्ट आकडेवारीचा उल्लेख करून आरोप केले असून, त्यामुळे त्यांना या प्रकरणातील वस्तुस्थितीची माहिती असण्याची शक्यता नाकारता येत नाही.
 
विश्व हिंदू परिषदेने समाज माध्यमांवरील आपल्या पोस्टमध्ये म्हटले की, आलोक कुमार यांनी अरविंद केजरीवाल, प्रियंका गांधी वाड्रा, संजय सिंह आणि राम गोपाल यादव यांनी राम जन्मभूमी मंदिरातील कथित देणगी अपहारासंदर्भात केलेल्या सार्वजनिक विधानांबाबत त्यांची चौकशी करण्याची मागणी केली आहे. या नेत्यांनी आपल्या आरोपांबाबत पुरावे सादर करण्यात अपयश आल्यास त्यांच्यावरही कायद्यानुसार कारवाई करण्याचा विचार केला जाऊ शकतो, असे त्यांनी नमूद केले आहे.(Ram Temple Donation Misappropriation Case)
 
तपास अधिकाऱ्यांना लिहिलेल्या पत्रात आलोक कुमार म्हणाले, "जर चौकशीत असे आढळले की एखाद्या व्यक्तीने कोणताही तथ्याधारित आधार किंवा पुरावा नसताना इतके गंभीर सार्वजनिक आरोप केले, तर तो तपासाच्या दृष्टीनेही महत्त्वाचा मुद्दा ठरेल." दरम्यान, राम जन्मभूमी मंदिरातील कथित देणगी अपहार प्रकरणाचा तपास सुरूच आहे. ३ जुलै रोजी विशेष तपास पथकाने (एसआयटी) राम मंदिर परिसराला भेट देऊन तपास पुढे नेला. यापूर्वी १ जुलै रोजी उत्तर प्रदेश सरकारने या प्रकरणाचा व्यापक तपास करण्यासाठी एसआयटीला आणखी १५ दिवसांची मुदतवाढ दिली होती.(Ram Temple Donation Misappropriation Case)
 
श्री राम जन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टचे सदस्य महंत दिनेंद्र दास महाराज यांनी प्रशासनाच्या कारवाईचे स्वागत करत दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली. त्यांनी सांगितले की, प्रशासनाने केलेली कारवाई योग्य आहे. जो काही निर्णय होईल तो योग्यच असेल. मुख्यमंत्रीांनी तत्परतेने कारवाई केली नसती तर दोषी कदाचित कधीच सापडले नसते. प्रशासन अशा प्रकारे कारवाई करत राहिले तर भविष्यात अशा प्रकारच्या चोरीच्या घटना थांबतील. राम मंदिरातून चोरी करणे हा अत्यंत गंभीर गुन्हा असून दोषींना तुरुंगात पाठविणे योग्यच आहे.(Ram Temple Donation Misappropriation Case)
 
या प्रकरणात २३ जून रोजी एसआयटीने प्राथमिक अहवाल सादर केल्यानंतर २५ जून रोजी एफआयआर दाखल करण्यात आला होता. त्यानंतर आठ आरोपींना अटक करण्यात आली. कथित अपहाराची नैतिक जबाबदारी स्वीकारत माजी विश्वस्त अनिल मिश्रा आणि ट्रस्टचे महासचिव चंपत राय यांनी आपल्या पदांचा राजीनामा दिला. तपास पुढे जात असताना अयोध्या पोलीस अटक केलेल्या आरोपींची सखोल चौकशी करणार आहेत.(Ram Temple Donation Misappropriation Case)
 
 
 
 




ओंकार मुळ्ये

'मास मीडिया' या विषयातून पदवीपर्यंतचे शिक्षण पूर्ण.'कम्युनिकेशन ॲण्ड जर्नालिझम' विषयातून पदव्युत्तरपर्यंतचे शिक्षण पूर्ण. सध्या दै.'मुंबई तरुण भारत'मध्ये वेब उपसंपादक म्हणून कार्यरत. लिखाण, संगीत, वाचन, फोटोग्राफी, इ.ची आवड.लिवोग्राफी भाषाशैलीत विशेष प्रावीण्य.बालपणापासून रा.स्व.संघाचा स्वयंसेवक
संबंधित मजकूर