मुंबई : (Uddhav Thackeray Hindutva) मुख्यमंत्रीपदाच्या खुर्चीसाठी विझलेल्या हिंदुत्वाच्या मशालीला उद्धव ठाकरे आता पुन्हा एकदा फुंकर घालत असल्याचे पाहायला मिळते. पक्षाची झालेली वाताहत पाहता ठाकरेंना विसरलेल्या हिंदुत्वाची आठवण झालेली दिसते. अचानक प्रभू श्री राम यांच्याबद्दल त्यांची उफाळून आलेली भक्ती आणि त्यानिमित्ताने केलेले आंदोलन हे त्याचेच द्योतक म्हणावे लागेल.
'गर्व से कहो हम हिंदू है' हा नारा देत शिवसेनाप्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांनी शिवसेनेची स्थापना केली. मराठी माणसासाठी लढता लढता हिंदुत्वाची कास धरणाऱ्या बाळासाहेबांना नंतर ‘हिंदुहृदयसम्राट’ असा बहुमानही मिळाला. १९९५ ला हिंदुत्वाच्या मुद्यावर भाजप-शिवसेना युतीला राज्यात सत्ता मिळाली. मात्र, आपल्या वडिलांनी पेटवलेली प्रखर हिंदुत्वाची मशाल उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्रीपदाच्या खुर्चीसाठी एका क्षणात विझवली.
पक्ष गळतीची झळ
२०१९ ला महाविकास आघाडीचा प्रयोग करून ठाकरेंनी लांगुलचालनाचे राजकारण सुरु केले. त्यावेळी त्यांच्यावर सत्तेसाठी हिंदुत्वाशी तडजोड केल्याचा आरोपही झाला. या भुमिकेमुळे उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्रीपदाची खुर्ची मिळाली खरी, पण तेव्हापासून सुरु झालेल्या पक्षाच्या गळतीची झळ त्यांना आजही सोसावी लागत आहे.
२०२२ मध्ये एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्त्वात झालेले ५० आमदारांचे बंड असो किंवा मग अलीकडेच उबाठा गटाच्या ६ खासदारांनी केलेले बंड असो हे त्या गळतीचेच उदाहरण. त्यातच सचिन अहिर यांच्यासारख्या दमदार नेत्याने सोडलेली साथही उबाठा गटाच्या चांगलीच जिव्हारी लागली. त्यामुळेच गेल्या काही वर्षांत उद्धव ठाकरेंच्या हिंदुत्वाची बोथट झालेली धार पुन्हा एकदा जागृत करण्याची धडपड सुरु आहे.(Uddhav Thackeray Hindutva)
बेगडी हिंदुत्वाची लक्तरे
रविवारी दादरमध्ये झालेले रामरक्षा आंदोलन हा त्याचाच परिपाक. अयोध्येतील राम मंदीर दान चोरी प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरेंच्या रपक्षाने आंदोलन केले.मात्र, या आंदोलनात त्यांची झालेली अवस्था अख्ख्या महाराष्ट्राने बघितली. हातात पुस्तक असतानाही ‘राम रक्षास्रोत्राच्या’ धड दोन ओळीही वाचता न येणाऱ्या ठाकरेंच्या बेगडी हिंदुत्वाची लक्तरे निघालीत आणि पुन्हा एकदा त्यांच्यावर टीका झाली. याच आंदोलनात भाषण करताना ‘हिंदुत्वाचा गैरफायदा घेतला जातोय’ असे ते म्हणाले. परंतू, हाच न्याय ठाकरेंना लावल्यास २०१९ ला महाविकास आघाडीची स्थापना करताना त्यांनी काय केले? हा प्रश्न उपस्थित होतोच.(Uddhav Thackeray Hindutva)
सगळे काही गमावून बसल्यानंतर आता उद्धव ठाकरेंना नव्याने झालेली हिंदुत्वाची आठवण आणखी किती काळ राहते, हे पाहणे निश्चितच औस्तुक्याचे असेल.(Uddhav Thackeray Hindutva)
विज्ञान शाखेतील पदवीनंतर भारतीय जनसंचार संस्थान (IIMC) अमरावतीतून पत्रकारितेचे पदव्युत्तर शिक्षण. 'दै. मुंबई तरुण भारत'मध्ये वेब उपसंपादक या पदावर कार्यरत. शेती, साहित्य, राजकारण या विषयात विशेष रस. हस्तकला, संगीत आणि कविता लेखनाचा छंद....