सिंधुदुर्गचे व्याघ्रभविष्य

    06-Jul-2026   
Sindhudurg Tiger Corridor
 
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सह्याद्रीच्या डोंगररांगांमध्ये गेल्या काही वर्षांत अनेक मोठे पायाभूत विकास प्रकल्प प्रस्तावित किंवा विविध टप्प्यांत आहेत. यामध्ये सावंतवाडी दोडामार्ग गोवा परिसरातील राष्ट्रीय महामार्गांचे रुंदीकरण, घाटरस्त्यांचे आधुनिकीकरण, नवीन रेल्वे जोडण्या यांचा समावेश होतो. हे केवळ पायाभूत प्रकल्प नसून पश्चिम घाटातील महत्त्वाच्या व्याघ्र प्रजनन क्षेत्र आणि राष्ट्रीय व्याघ्र भ्रमणमार्गाशी निगडित संवर्धनाचा प्रश्न आहे. विकासाच्या या कामांमध्ये वैज्ञानिक नियोजन, पर्यायी मार्ग आणि वन्यजीवपूरक पायाभूत सुविधांच्या माध्यमातून विकास व पर्यावरण यांचा समतोल साधणे, हीच काळाची गरज असल्याचे दर्शवणारा हा लेख...
 
महाराष्ट्रातील सिंधुदुर्ग जिल्हा हा जैवविविधतेच्या दृष्टीने देशातील सर्वाधिक महत्त्वाच्या प्रदेशांपैकी एक मानला जातो. पश्चिम घाटातील सदाहरित अरण्ये, गोव्याला लागून असलेले वनक्षेत्र, राधानगरी अभयारण्याशी असलेली जोडणी आणि सह्याद्रीच्या डोंगररांगांमधून तयार झालेला अखंड वनपट्टा यामुळे हा परिसर वाघांचा महत्त्वाचा अधिवास बनत आहे. गेल्या काही वर्षांतील कॅमेरा ट्रॅप अभ्यास, जनुकीय विश्लेषण आणि वनविभागाच्या नोंदींमधून सिंधुदुर्ग हा केवळ वाघांचा संचारमार्ग नसून प्रजननक्षम अधिवास म्हणून विकसित होत असल्याचे स्पष्ट झाले आहे. अशा परिस्थितीत प्रस्तावित शक्तिपीठ द्रुतगती महामार्गाचा सुधारित मार्ग याच संवेदनशील वनपट्ट्यातून जात असल्याने विकास आणि वन्यजीव संवर्धन यांच्यातील समतोलाचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.
 
सिंधुदुर्ग : महाराष्ट्रातील उदयोन्मुख व्याघ्रक्षेत्र
 
एकेकाळी सह्याद्रीतील वाघांची संख्या अत्यल्प मानली जात होती. मात्र गेल्या दशकात परिस्थिती झपाट्याने बदलली आहे. कोल्हापूरमधील राधानगरी परिसर, गोव्यालगतची जंगले, दोडामार्ग, सावंतवाडी आणि आंबोली परिसरामध्ये वाघांची उपस्थिती सातत्याने नोंदवली जात आहे. विशेष म्हणजे, या भागात आता नर वाघांचा केवळ वावर नसून वाघिणी नियमितपणे पिल्लांना जन्म देत आहेत. कोणत्याही प्रदेशात वाघिणींचे यशस्वी प्रजनन हे त्या भागातील अधिवासाची गुणवत्ता, पुरेशी शिकार, सुरक्षितता आणि वनांची सलगता दर्शवणारे महत्त्वाचे जैविक निदर्शक मानले जाते. सध्याच्या अभ्यासानुसार प्रस्तावित महामार्गाच्या प्रभाव क्षेत्रात सात ते आठ वाघांचा वावर आहे. त्यामध्ये दोन प्रजननक्षम वाघिणींचा समावेश आहे. एका वाघिणीने २०२२ मध्ये दोन पिल्लांना जन्म दिला, तर दुसरी वाघीण २०२४ पासून सातत्याने पिल्ले वाढवत असून २०२६ पर्यंत तिच्या सहा पिल्लांची नोंद झाली आहे. याचा अर्थ, हा परिसर केवळ मार्ग नसून सक्रिय व्याघ्रप्रजनन क्षेत्र आहे.
 
सह्याद्री राधानगरी गोवा व्याघ्र भ्रमणमार्ग
 
भारतामध्ये वाघांचे दीर्घकालीन अस्तित्व केवळ संरक्षित क्षेत्रांवर अवलंबून नसते. वेगवेगळ्या व्याघ्रक्षेत्रांना जोडणारे नैसर्गिक वनपट्टे म्हणजेच ‘व्याघ्र भ्रमणमार्ग’ (Tiger Corridors) तितकेच महत्त्वाचे असतात. हे मार्ग वाघांना नवीन प्रदेशात स्थलांतर करण्यास, वेगवेगळ्या लोकसंख्यांमध्ये जनुकीय देवाणघेवाण होण्यास आणि नव्या अधिवासात स्थायिक होण्यास मदत करतात. एखादा भ्रमणमार्ग तुटला, तर त्या परिसरातील वाघांची लोकसंख्या हळूहळू विलगते आणि दीर्घकालीन संवर्धन धोक्यात येते. ‘राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरणा’ने प्रसिद्ध केलेल्या Tiger Corridor Atlas मध्ये सह्याद्री राधानगरी गोवा हा पश्चिम घाटातील अत्यंत महत्त्वाचा व्याघ्र भ्रमणमार्ग म्हणून नोंदवला आहे. ‘महाराष्ट्र राज्य वन्यजीव मंडळा’नेदेखील याच अधिकृत भ्रमणमार्गांना मान्यता दिली आहे. याच अधिकृत भ्रमणमार्गाला प्रस्तावित शक्तिपीठ महामार्ग छेदत असल्याने हा विषय केवळ स्थानिक न राहता, राष्ट्रीय संवर्धनाच्या दृष्टीने महत्त्वाचा ठरतो.
 
वन्यजीवपूरक रचना
 
जर पर्यायी मार्ग शक्य नसेल, तर वैज्ञानिक अभ्यासाच्या आधारे वन्यजीवांसाठी योग्य आकाराचे अंडरपास, ओव्हरपास आणि नैसर्गिक वनसंपर्क राखणार्‍या रचनांचे नियोजन करणे अत्यावश्यक ठरते. यासाठी वाघांच्या प्रत्यक्ष हालचालींचा अभ्यास, कॅमेरा ट्रॅप माहिती, शिकार प्राण्यांची हालचाल, जलप्रवाह आणि नैसर्गिक नाले, वनस्पतींची सलगता, प्रकाश आणि आवाजाचे नियंत्रण, कुंपणाद्वारे वन्यजीवांना सुरक्षित मार्गाकडे वळविणे अशा बाबी महत्त्वाच्या असतात. फक्त लहान पुलांना ‘वन्यजीव अंडरपास’ म्हणणे पुरेसे नसते. मोठ्या मांसाहारी प्राण्यांसाठी आवश्यक रुंदी, उंची आणि नैसर्गिक वातावरण असलेले अंडरपासच प्रभावी ठरतात.
 
देशात वन्यजीवपूरक पायाभूत सुविधांची अनेक यशस्वी उदाहरणे आहेत. पेंच व्याघ्र प्रकल्प (NH -४४) येथे भारतातील सर्वांत यशस्वी वन्यजीव अंडरपास विकसित करण्यात आले आहेत. या मार्गांचा वाघ, बिबटे, अस्वल, रानकुत्रे, सांबर आणि इतर अनेक प्रजाती नियमित वापर करतात. राष्ट्रीय महामार्ग ७, कान्हापेंच जोडणी, तसेच राजाजी कॉर्बेट परिसर येथेही वन्यजीव ओव्हरपास आणि अंडरपासचे सकारात्मक परिणाम नोंदवले गेले आहेत. ही उदाहरणे दर्शवितात की योग्य नियोजन केले, तर विकास आणि संवर्धन यांचा समतोल साधणे शक्य आहे.
 
संघर्षाची वाढती समस्या
 
जगभरातील संशोधनातून हे सिद्ध झाले आहे की, महामार्गांमुळे वनक्षेत्राचे तुकडे पडतात. मोठे सस्तन प्राणी, विशेषतः वाघ, हत्ती, अस्वल, सांबर, गवा यांना सुरक्षित स्थलांतर करता येत नाही. अधिवासाचे तुकडीकरण (Habitat Fragmentation) वाहनांच्या धडकेत वन्यजीवांचा मृत्यू, प्राण्यांच्या स्थलांतरात अडथळे, जनुकीय देवाण-घेवाण कमी होणे, मानव-वन्यजीव संघर्षात वाढ, भविष्यातील प्रजननावर परिणाम यांचे प्रमुख परिणाम आहेत. भारतातील अनेक महामार्गांवर बिबटे, वाघ, अस्वल, हरीण आणि इतर वन्यजीवांचे मृत्यू वाढत असल्याची नोंद आहे. त्यामुळे आज रस्ता नियोजनात वन्यजीव अभियांत्रिकी (Wildlife-friendly Infrastructure) हा स्वतंत्र विषय बनला आहे.

बण्डलिंग ऑफ इन्फ्रास्ट्रक्चर
 
जगभरात आता बण्डलिंग ऑफ इन्फ्रास्ट्रक्चर ही संकल्पना वेगाने स्वीकारली जात आहे. यामध्ये स्वतंत्र रस्ते, रेल्वे, वीजवाहिन्या, गॅस पाईपलाईन किंवा इतर प्रकल्प वेगवेगळ्या दिशेने नेण्याऐवजी शक्य तितक्या प्रमाणात एकाच वाहतूक पट्ट्यात (Infrastructure Corridor) एकत्र आणले जातात. यामुळे नव्या जंगलांची तोड कमी होते, वनांचे तुकडीकरण कमी होते, वन्यजीवांसाठी मोठे सलग अधिवास उपलब्ध राहतात, पर्यावरणीय परिणाम मर्यादित राहतात, भविष्यातील देखभाल आणि खर्च कमी होतो आणि वन्यजीवांसाठी आवश्यक अंडरपास आणि ओव्हरपास एकाच ठिकाणी नियोजनबद्ध उभारता येतात. युरोप, अमेरिका, कॅनडा आणि ऑस्ट्रेलियामध्ये ही पद्धत मोठ्या प्रमाणावर वापरली जात आहे. भारतातही राष्ट्रीय वन्यजीव कृती आराखडा आणि अनेक पर्यावरणीय अभ्यासांमध्ये या संकल्पनेवर भर दिला जात आहे.
 
सिंधुदुर्गात काय करणे आवश्यक?
  • सध्याची परिस्थिती लक्षात घेता, पुढील उपाय महत्त्वाचे ठरू शकतात.
  • प्रस्तावित मार्गाचा स्वतंत्र पर्यावरणीय पुनर्विचार.
  • व्याघ्रप्रजनन क्षेत्र टाळणारा पर्यायी मार्ग तपासणे.
  • संपूर्ण वन्यजीव हालचालींचा बहुऋतू अभ्यास.
  • वैज्ञानिक निकषांनुसार मोठ्या अंडरपास आणि ओव्हरपासची उभारणी.
  • रस्त्यालगत संरक्षक कुंपण आणि मार्गदर्शक संरचना.
  • वाहन वेग नियंत्रण.
  • सातत्यपूर्ण कॅमेरा ट्रॅप निरीक्षण.
  • प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर दीर्घकालीन पर्यावरणीय देखरेख.

विकास आणि संवर्धन यांचा समतोल
 
भारतासारख्या विकसनशील देशात महामार्ग, रेल्वे आणि इतर पायाभूत सुविधा आवश्यक आहेत. मात्र, त्याचवेळी पश्चिम घाटासारख्या जागतिक जैवविविधता हॉटस्पॉटमधील वन्यजीव अधिवासांचे संरक्षण करणे, तितकेच आवश्यक आहे. सिंधुदुर्गातील प्रस्तावित शक्तिपीठ महामार्गाचा प्रश्न हा ‘विकास विरुद्ध पर्यावरण’ असा नसून वैज्ञानिक नियोजनासह विकास असा आहे. जर योग्य वेळी पर्यावरणीय मूल्यांकन, पर्यायी मार्गांचा गंभीर विचार, Bundling of Infrastructure सारख्या संकल्पनांचा वापर आणि दर्जेदार वन्यजीव अंडरपास-ओव्हरपास उभारले गेले, तर विकास आणि संवर्धन यांचा समतोल साधणे शक्य आहे. कारण, आज ज्या जंगलात वाघिणी आपल्या पिल्लांना वाढवत आहेत, त्याच जंगलातून उद्याच्या पिढ्यांनाही वाघ मुक्तपणे फिरताना दिसावेत, हीच खरी शाश्वत विकासाची कसोटी ठरेल.




अक्षय मांडवकर

'दै. मुंबई तरुण भारत'मध्ये 'विशेष प्रतिनिधी' (पर्यावरण/ वन्यजीव) म्हणून कार्यरत. मुंबई विद्यापीठातून पत्रकारितेचे पदव्युत्तर शिक्षण. गेल्या तीन वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत. पर्यावरण आणि वन्यजीव क्षेत्राची आवड असल्याने त्यासंबंधीच्या वृत्तांकनामध्ये विशेष रस. महाराष्ट्रातील महत्वाच्या वन्यजीव संवर्धन आणि संशोधन कार्यात सहभाग. भारतीय शास्त्रीय नृत्यशैलीतील 'कथ्थक' नृत्यात विशेष प्राविण्य. देशातील महत्वाच्या शास्त्रीय नृत्य महोत्सव आणि नृत्यविषयक टेलिव्हिजन मालिकांमध्ये सादरीकरण.

संबंधित मजकूर