मुंबई (अक्षय मांडवकर) - महाराष्ट्रातून १२५ वर्षांनंतर पिनालिया म्हैसूरएन्सिस म्हणजेच म्हैसूर इरिया या ऑर्किड प्रजातीचा पुनर्शोध लागला आहे (Pinalia mysorensis - Mysore Eria orchid). महाबळेश्वर तालुक्यातील वाडा-कुंभरोशी परिसरात ही वनस्पती आढळून आली असून यामुळे महाराष्ट्रातून नामशेष झाल्याचा कयास असणाऱ्या ऑर्किडचे अस्तित्व आजही कायम असल्याचे सिद्ध झाले आहे (Pinalia mysorensis - Mysore Eria orchid). ऑर्किडची ही प्रजात पश्चिम घाटासाठी प्रदेशनिष्ठ (एन्डेमिक) असून महाराष्ट्र, कर्नाटक, केरळ आणि तामिळनाडू या राज्यात ती आढळते. (Pinalia mysorensis - Mysore Eria orchid)
पावसाळ्याच्या आगमनानंतर राज्यात यक्षपुष्पांनी म्हणजेच आॅर्किडच्या प्रजातींना बहरण्यास सुरुवात केली आहे. यामधीलच म्हैसूर इरिया या प्रजातीचा महाराष्ट्रातून १२५ वर्षानंतर पुनर्शोध लागला आहे. या ऑर्किडची महाबळेश्वर परिसरातील शेवटची नोंद १८८३ मध्ये जे. एम. वुड्रो आणि १९०० मध्ये जेम्स यांनी केली होती. त्यानंतर पश्चिम घाटात अनेक वनस्पती सर्वेक्षणे झाली, मात्र महाराष्ट्रात ही प्रजाती पुन्हा कधीच आढळली नव्हती. त्यामुळे राज्यातून ती नामशेष झाल्याची शक्यता व्यक्त करण्यात आली होती. आता १२५ वर्षांनंतर झालेला हा पुनर्शोध अत्यंत महत्त्वाचा मानला जात आहे. या पुनर्शोधासंबंधीचा संशोधन अहवाल इंटरनॅशनल जर्नल आॅफ बाॅटनी स्टडिज या आंतरराष्ट्रीय नियतकालिकात ४ जुलै २०२६ रोजी प्रकाशित झाला आहे. या संशोधनाचे नेतृत्व जीवन सिंग जलाल यांनी केले असून त्यांच्यासह सागर कुलकर्णी, यशस्विनी राऊत, आकाश राऊत, मयुरेश कुलकर्णी आणि शार्विल बिडकर यांनी केले आहे.
महाबळेश्वर परिसरात निसर्ग अभ्यासादरम्यान एका आंब्याच्या झाडावर वाढणारी एक अपुष्प अवस्थेतील ऑर्किड संशोधकांना दिसली. त्यानंतर त्याच ठिकाणी पुन्हा भेट दिल्यावर वनस्पतीला फुले आली होती. नमुने गोळा करून सखोल अभ्यास आणि जुन्या वनस्पतिशास्त्रीय नोंदींची पडताळणी केल्यानंतर ती पिनालिया म्हैसूरएन्सिस असल्याचे निश्चित करण्यात आले. ही एक उपजीवी (Epiphytic) ऑर्किड असून अर्ध-सदाहरित जंगलातील आंब्याच्या झाडांवर वाढते. तिची पांढरट-क्रीमी, सुगंधी फुले असून ओठाच्या (Labellum) भागावर जांभळे ठिपके आणि टोकाकडे पिवळसर रंग दिसतो. ऑगस्ट ते सप्टेंबर हा तिचा फुलोरा आणि फळधारणेचा काळ आहे.
संकटग्रस्त नाही; मात्र अधिवास संवर्धन गरजेचे
संशोधकांनी आययूसीएनच्या निकषांनुसार या प्रजातीचे मूल्यांकन केले. पश्चिम घाटात किमान २२ ठिकाणी तिची नोंद असून चार संरक्षित क्षेत्रांमध्येही ती आढळते. महाराष्ट्रातील सर्वेक्षणात ५० हून अधिक प्रौढ वनस्पती आणि चांगले फळधारणेचे प्रमाण दिसून आले आहे. त्यामुळे सध्या या प्रजातीचा समावेश "Least Concern (LC)" अर्थात कमी चिंतेच्या श्रेणीत करण्यात आला आहे. मात्र नागरीकरण, जंगलांचे विखंडीकरण आणि विकासकामांमुळे या प्रजातीच्या अधिवासावर होणारा परिणाम लक्षात घेऊन संवर्धन आवश्यक असल्याचे संशोधकांनी नमूद केले आहे.