मुंबई : (Pahalgam Terror Attack) जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याच्या तपासात राष्ट्रीय तपास संस्थेने (एनआयए) महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. या प्रकरणातील पुरवणी आरोपपत्रात एनआयएने लष्कर-ए-तोयबाचा प्रमुख हाफिज सईद याला मुख्य आरोपी म्हणून नामनिर्देशित केले आहे. तपासादरम्यान मिळालेल्या पुराव्यांच्या आधारे हा हल्ला पाकिस्तानातून रचलेल्या कटाचा भाग असल्याचे स्पष्ट होत असून, त्याचे नियोजन आणि संचालन लष्कर-ए-तोयबा तसेच त्याची प्रॉक्सी संघटना द रेसिस्टन्स फ्रंट यांच्या माध्यमातून करण्यात आल्याचा एनआयएचा दावा आहे.
एनआयएच्या मते, नव्याने दाखल करण्यात आलेले पुरवणी आरोपपत्र हे यापूर्वी दाखल केलेल्या सविस्तर आरोपपत्राचा विस्तार असून, त्यामध्ये पाकिस्तानची भूमिका आणि हाफिज सईदच्या सहभागासंबंधी नव्या तथ्यांचा समावेश करण्यात आला आहे. वैज्ञानिक तपास, डिजिटल पुरावे, न्यायवैद्यक (फॉरेन्सिक) विश्लेषण आणि घटनास्थळावरून गोळा करण्यात आलेल्या पुराव्यांच्या आधारे हल्ल्याचे नियोजन, समन्वय आणि अंमलबजावणी ही सर्व प्रक्रिया पाकिस्तानातूनच नियंत्रित करण्यात आली होती, असा निष्कर्ष एनआयएने नोंदवला आहे.(Pahalgam Terror Attack)
पुरवणी आरोपपत्रात हाफिज सईदविरुद्ध भारतीय न्याय संहिता तसेच बेकायदेशीर कृती (प्रतिबंध) कायदा (यूएपीए) अंतर्गत विविध कलमांनुसार आरोप ठेवण्यात आले आहेत. याशिवाय भारताविरुद्ध युद्ध छेडणे आणि सीमापार दहशतवादी कट रचणे यांसंदर्भातील तरतुदींचाही समावेश करण्यात आला आहे. यापूर्वी एनआयएने दाखल केलेल्या आरोपपत्रात पहलगाम हल्ला करणाऱ्या तीन पाकिस्तानी दहशतवाद्यांची ओळख पटविण्यात आली होती. त्यापैकी एका दहशतवाद्याचा नंतर सुरक्षा दलांच्या कारवाईत खात्मा करण्यात आला.(Pahalgam Terror Attack)
तपासादरम्यान लष्कर-ए-तोयबाचा हँडलर साजिद सैफुल्लाह जट्ट तसेच दोन स्थानिक आरोपींची भूमिकाही समोर आली होती. एनआयएच्या म्हणण्यानुसार, जप्त करण्यात आलेली डिजिटल उपकरणे, मोबाईलवरील संदेश, लोकेशन डेटा आणि इतर इलेक्ट्रॉनिक पुराव्यांमधून पाकिस्तानातील हँडलर दहशतवाद्यांना सातत्याने सूचना देत असल्याचे स्पष्ट झाले आहे. तसेच हल्ल्यापूर्वी दहशतवाद्यांच्या स्थानिक निवास, भोजन आणि इतर आवश्यक सुविधांची व्यवस्था करण्यात आल्याचेही तपासातून निष्पन्न झाले आहे.(Pahalgam Terror Attack)
संपूर्ण दहशतवादी जाळ्याचा पर्दाफाश करण्यावर भर
एनआयएने स्पष्ट केले की या प्रकरणाचा तपास अद्याप सुरू असून, पाकिस्तानातून संचालित संपूर्ण दहशतवादी नेटवर्क उघड करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. तपास संस्थेच्या मते, उपलब्ध पुराव्यांवरून लष्कर-ए-तोयबा आणि द रेसिस्टन्स फ्रंट यांनी अत्यंत सुनियोजित पद्धतीने या हल्ल्याचा कट रचला. दहशतवाद्यांची घुसखोरी, त्यांची हालचाल, शस्त्रास्त्रांचा पुरवठा आणि संपर्कव्यवस्थेचे संचालनही सीमापार बसलेल्या सूत्रधारांकडून करण्यात आले. एनआयएचा ठाम निष्कर्ष असा आहे की, पहलगाम हल्ला हा पाकिस्तानपुरस्कृत दहशतवादाचा एक भाग असून, त्यामागे पाकिस्तानात बसलेल्या दहशतवादी सूत्रधारांची थेट भूमिका होती.(Pahalgam Terror Attack)
'मास मीडिया' या विषयातून पदवीपर्यंतचे शिक्षण पूर्ण.'कम्युनिकेशन ॲण्ड जर्नालिझम' विषयातून पदव्युत्तरपर्यंतचे शिक्षण पूर्ण. सध्या दै.'मुंबई तरुण भारत'मध्ये वेब उपसंपादक म्हणून कार्यरत. लिखाण, संगीत, वाचन, फोटोग्राफी, इ.ची आवड.लिवोग्राफी भाषाशैलीत विशेष प्रावीण्य.बालपणापासून रा.स्व.संघाचा स्वयंसेवक