मुंबई : (Mumbai Weather Alert) मुंबई महानगर क्षेत्रात भारतीय हवामान विभागाने (आयएमडी) अतिवृष्टीचा तीव्र इशारा (रेड अलर्ट) जारी केला असून, शहरात ताशी ८० ते ९० किलोमीटर वेगाने वादळी वारे वाहण्याची शक्यता वर्तवली आहे. मुंबईवर ओढवलेल्या या नैसर्गिक संकटाच्या काळात नेहमीचे राजकीय मतभेद आणि वाद बाजूला सारून मुंबईकरांच्या सुरक्षेसाठी सत्ताधारी आणि विरोधक एकत्र आल्याचे दिलासादायक चित्र आज पाहायला मिळाले. मुंबईच्या महापौर रितू तावडे आणि पालिकेच्या विरोधी पक्षनेत्या किशोरी पेडणेकर यांनी संयुक्तपणे महानगरपालिका मुख्यालयातील आपत्कालीन नियंत्रण कक्षाला भेट देऊन शहरात सुरू असलेल्या मदतकार्याचा आणि पालिका यंत्रणेच्या सज्जतेचा सविस्तर आढावा घेतला.
संकट काळात राजकारण न करता प्रशासनाला बळ देण्यासाठी आणि नागरिकांना धीर देण्यासाठी दोन्ही नेत्यांनी नियंत्रण कक्षात एकत्र उपस्थित राहून मुंबईतील आपत्कालीन परिस्थितीवर बारीक लक्ष ठेवले आहे.
या महत्त्वपूर्ण आढावा बैठकीदरम्यान, आपत्कालीन व्यवस्थापन विभागाचे संचालक महेश नार्वेकर यांनी महापौर रितू तावडे आणि विरोधी पक्षनेत्या किशोरी पेडणेकर यांना मुंबईतील पाऊस, सखल भागांतील पाणी साचण्याची सद्यस्थिती आणि नियंत्रण कक्षात येणाऱ्या नागरिकांच्या तक्रारींची सविस्तर माहिती दिली. पालिकेच्या अत्याधुनिक सीसीटीव्ही यंत्रणेच्या माध्यमातून मुंबईतील प्रमुख रस्ते, रेल्वे ट्रॅक आणि संवेदनशील ठिकाणांवर कशा प्रकारे २४ तास बारीक लक्ष ठेवले जात आहे, याचे थेट सादरीकरणही यावेळी दोन्ही नेत्यांना करण्यात आले.(Mumbai Weather Alert)
शहरातील विविध यंत्रणांमधील समन्वय आणि ऑन-ग्राउंड सुरू असलेल्या उपाययोजनांची माहिती घेऊन दोन्ही नेत्यांनी समाधान व्यक्त केले आणि पालिका कर्मचाऱ्यांचे कौतुक केले.(Mumbai Weather Alert)
मुंबईकरांच्या सुरक्षेसाठी महानगरपालिकेसह सर्व संबंधित बचाव, मदत आणि अग्निशामक दलाची यंत्रणा 'ऑन ग्राउंड' अहोरात्र कार्यरत आहे. कोणत्याही आपत्कालीन किंवा कठीण परिस्थितीला तोंड देण्यासाठी पालिका प्रशासन पूर्ण ताकदीने सज्ज असून नागरिकांनी घाबरून न जाण्याचे आवाहन यावेळी करण्यात आले.
परिस्थितीची पाहणी केल्यानंतर महापौर रितू तावडे आणि विरोधी पक्षनेत्या किशोरी पेडणेकर यांनी मुंबईकरांना सतर्क आणि सुरक्षित राहण्याचेआवाहन केले आहे.हवामानाची गंभीर स्थिती पाहता, नागरिकांनी अत्यंत अत्यावश्यक काम असल्याशिवाय घराबाहेर पडू नये.सोशल मीडिया किंवा इतर अनधिकृत माध्यमांतून पसरणाऱ्या कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नका. केवळ पालिका आणि प्रशासनाकडून वेळोवेळी जारी करण्यात येणाऱ्या अधिकृत सूचनांचेच पालन करावे.कोणत्याही आपत्कालीन किंवा अडचणीच्या परिस्थितीत तातडीच्या मदतीसाठी नागरिकांनी त्वरित पालिकेच्या १९१६ या आपत्ती व्यवस्थापन हेल्पलाइन क्रमांकावर संपर्क साधावा.(Mumbai Weather Alert)