मुंबई : (Mohan Bhagwat on Youth Loneliness) नव्या पिढीमध्ये वाढत चाललेला एकाकीपणा आणि मानसिक अस्थिरता रोखण्यासाठी कुटुंबात संवाद वाढविणे अत्यंत आवश्यक आहे. आज मूल रडले की त्याच्या हातात मोबाईल दिला जातो; परंतु त्याऐवजी त्यांच्याशी अर्थपूर्ण आणि सुसंवादी संवाद साधण्याची गरज आहे. असे प्रतिपादन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत यांनी केले.
नागपूर येथे नुकत्याच पार पडलेल्या समर्पण वेलनेस सेंटरच्या लोकार्पण कार्यक्रमात ते बोलत होते. याप्रसंगी त्यांनी मानसिक आरोग्य, भारतीय मानसशास्त्र आणि कुटुंबाच्या भूमिकेबाबत आपले विचार मांडले.
उपस्थितांना संबोधित करताना सरसंघचालक म्हणाले, पूर्वी ग्रंथवाचन आणि कुटुंबात गोष्टी सांगण्याची-सांगून ऐकविण्याची परंपरा होती. त्यामुळे मुलांमध्ये मानसिक बळ निर्माण होत असे. आज बारावीच्या परीक्षेत अपयश येणे किंवा घरात रागावले जाणे अशा छोट्या घटनांमुळेही अनेक तरुण आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उचलताना दिसतात. पूर्वी आजी-आजोबा मुलांना गोष्टी सांगत असत; मात्र आता एकत्र कुटुंबपद्धती कमी होत चालली आहे. आई-वडीलही अनेकदा मुलांना टीव्ही किंवा ‘गुगल बाबा’च्या भरोशावर सोडून देतात. मूल रडू लागले की अगदी लहानपणापासूनच त्याच्या हातात मोबाईल दिला जातो. त्यामुळे जीवनातील आव्हानांना धैर्याने सामोरे जाणारे मन नव्या पिढीत विकसित करण्याची आवश्यकता आहे. यासाठी कुटुंब आणि समाज या दोघांनीही एकत्रितपणे प्रयत्न करणे आवश्यक आहे. मुलांमध्ये आणि तरुणांमध्ये एकाकीपणा निर्माण होऊ न देणे आणि त्यांच्याशी सातत्याने संवाद साधणे ही आजच्या काळाची गरज आहे.(Mohan Bhagwat on Youth Loneliness)
निरोगी जीवनासाठी केवळ शरीर निरोगी असणे पुरेसे नाही, तर मनाचे स्वास्थ्यही तितकेच महत्त्वाचे असते; यावर भर देत सरसंघचालक म्हणाले, शरीर आजारी पडले की त्याचा परिणाम मनावरही होतो आणि व्यक्ती मानसिकदृष्ट्याही दुर्बल बनते. अस्वस्थ व्यक्तीला लवकर रागही येतो. मन हेच मनुष्याच्या बंधनाचे आणि मुक्तीचे कारण आहे. मनुष्य अथवा कोणत्याही सजीवाच्या जन्माबरोबर मनाची जडणघडण सुरू होते. अनुभवांच्या आधारे मन घडत जाते. चांगले अनुभव मिळाले तर मन सकारात्मक बनते; तर नकारात्मक अनुभव आणि विचार मनाला कमकुवत करतात. त्यामुळे मनुष्याच्या सर्वांगीण विकासात प्रारंभापासून अखेरपर्यंत मनाची भूमिका अत्यंत महत्त्वाची आहे.(Mohan Bhagwat on Youth Loneliness)
पुढे ते म्हणाले की, भारतात मनाच्या चिकित्सेची आणि त्याच्या अभ्यासाची समृद्ध परंपरा आहे. त्या परंपरेचा सखोल अभ्यास होणे आवश्यक आहे. कोणत्याही शास्त्राचा विकास आणि त्यातील परिपूर्णता ही मानव कल्याणासाठी उपयुक्त ठरते. ज्ञान सर्वांगपूर्ण झाले, तरच समाजाचे व्यापक हित साध्य होऊ शकते.(Mohan Bhagwat on Youth Loneliness)
'मास मीडिया' या विषयातून पदवीपर्यंतचे शिक्षण पूर्ण.'कम्युनिकेशन ॲण्ड जर्नालिझम' विषयातून पदव्युत्तरपर्यंतचे शिक्षण पूर्ण. सध्या दै.'मुंबई तरुण भारत'मध्ये वेब उपसंपादक म्हणून कार्यरत. लिखाण, संगीत, वाचन, फोटोग्राफी, इ.ची आवड.लिवोग्राफी भाषाशैलीत विशेष प्रावीण्य.बालपणापासून रा.स्व.संघाचा स्वयंसेवक