एमओसी कॅन्सर केअरचा ‘विजेता’ उपक्रम; कॅन्सर सर्व्हायव्हर्सच्या जिद्दीचा गौरव

    06-Jul-2026


मुंबई, दि. ५ : प्रतिनिधी
धैर्य, जिद्द आणि आशावादाचा प्रेरणादायी उत्सव साजरा करत एमओसी कॅन्सर केअर अँड रिसर्च सेंटर यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या ‘विजेता – स्ट्राँग माइंड्स अगेंस्ट कॅन्सर’ या विशेष उपक्रमात २५० हून अधिक कॅन्सरशी झुंज देऊन बरे झालेले रुग्ण एकत्र आले. कॅन्सरचे निदान झाल्यानंतरही जीवनाकडे सकारात्मक दृष्टीने पाहत नव्या उमेदीने पुढे वाटचाल करणाऱ्या व्यक्तींचा सन्मान करण्यासाठी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

एमओसी कॅन्सर केअर, मुंबई यांनी आपल्या कॅन्सर सर्व्हायव्हर्स, त्यांच्या काळजीवाहक (केअरगिव्हर्स) आणि ऑन्कोलॉजिस्ट यांना एका व्यासपीठावर आणत मनमोकळ्या संवादाचे, प्रेरणादायी वैयक्तिक अनुभवांचे आणि अर्थपूर्ण चर्चांचे आयोजन केले. कॅन्सर हा व्यक्तीच्या आयुष्यातील प्रवासाचा एक भाग असू शकतो, मात्र तो त्या व्यक्तीची ओळख, उद्दिष्ट किंवा भविष्य निश्चित करत नाही, हा महत्त्वाचा संदेश या कार्यक्रमातून देण्यात आला. कार्यक्रमात ऑन्कोलॉजिस्ट आणि विशेष पाहुण्यांसोबत संवादात्मक सत्रांचे आयोजन करण्यात आले होते. यामुळे सर्व्हायव्हर्सना एकमेकांशी संवाद साधण्याची, अनुभवांची देवाणघेवाण करण्याची आणि परस्परांकडून प्रेरणा व मानसिक बळ मिळवण्याची संधी मिळाली. या कार्यक्रमाला विशेष अतिथी म्हणून उपस्थित राहिलेल्या प्रसिद्ध अभिनेत्री गिरिजा ओक यांनी कॅन्सर सर्व्हायव्हर्सच्या जिद्दीचे आणि सकारात्मक दृष्टिकोनाचे कौतुक करत त्यांच्या प्रेरणादायी प्रवासातून इतरांनाही प्रेरित करत राहण्याचे आवाहन केले.

एमओसी कॅन्सर केअर अँड रिसर्च सेंटरचे संचालक आणि सहसंस्थापक डॉ. प्रीतम काळसकर म्हणाले, "एमओसीमध्ये आम्ही तज्ज्ञ ऑन्कोलॉजिस्ट, प्रशिक्षित पॅरामेडिक्स, पुराव्यावर आधारित उपचारपद्धती आणि मजबूत सुरक्षा प्रोटोकॉल यांच्या माध्यमातून परवडणाऱ्या खर्चात व सहज उपलब्ध ठिकाणी कॅन्सर उपचारांचा प्रवास अधिक सुलभ करण्यासाठी कटिबद्ध आहोत. यासोबतच 'विजेता'सारखे व्यासपीठ उभारणेही तितकेच महत्त्वाचे आहे, जिथे रुग्ण आपले अनुभव एकमेकांशी शेअर करू शकतील, परस्परांकडून शिकू शकतील आणि एक समुदाय म्हणून सामूहिक बळ मिळवू शकतील.

एमओसी कॅन्सर केअर अँड रिसर्च सेंटरचे संचालक आणि सहसंस्थापक डॉ. क्षितिज जोशी म्हणाले की, "'विजेता' हा देशव्यापी सहाय्य आणि जनजागृतीचा उपक्रम बनावा, अशी आमची इच्छा आहे. कॅन्सरविषयीची चर्चा केवळ आजारापुरती मर्यादित न राहता सर्व्हायव्हरशिप, जिद्द आणि मानवी मनाच्या विलक्षण सामर्थ्यावर केंद्रित व्हावी, हा आमचा प्रयत्न आहे. जागतिक संशोधन सातत्याने दर्शवते की सर्व्हायव्हरशिप सपोर्ट ग्रुप्समुळे रुग्णांची प्रेरणा, उपचारांचे पालन आणि एकूणच जीवनमानामध्ये लक्षणीय सुधारणा होते."

यावेळी कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुण्या अभिनेत्री गिरिजा ओक म्हणाल्या की, "या प्रेरणादायी व्यक्तींना भेटण्याचा अनुभव माझ्यासाठी अत्यंत नम्र करणारा ठरला. त्यांच्या आयुष्याचा प्रवास आपल्याला शिकवतो की, खरे सामर्थ्य हे अडचणी नसण्यात नसून, त्या प्रत्येक दिवशी धैर्याने सामोरे जाण्यात असते."






संबंधित मजकूर