मेक्सिको सिटीपासून साधारण ५९ किमी ईशान्येला थिओतीहुकान ही प्राचीन देवभूमी आहे. इसवी सनपूर्व शतकांमध्ये येथे उभारले गेलेले ‘सन आणि मून पिरॅमिड’ आजही जगाला अचंबित करतात. समुद्रसपाटीपासून तब्बल दोन हजार, २४० मीटर उंचीवर वसलेल्या या नगरीबद्दल स्थानिकांची श्रद्धा अशी की, देवांनी पृथ्वीवर अवतार घेण्यासाठी हीच भूमी निवडली होती.
फिफा विश्वचषकाच्या निमित्ताने मेक्सिकोत पोहोचल्यानंतर मी आवर्जून या जागेला भेट दिली. ‘सन पिरॅमिड’वर आता पर्यटकांना चढण्याची परवानगी नाही. पण ‘मून पिरॅमिड’च्या तब्बल २०० पायर्या चढण्याचा मोह मी आवरू शकलो नाही. आणि टोकावर पोहोचताच, मला अक्षरशः स्वर्ग आठवला!
धाप इतकी लागली होती की, काही क्षण श्वासच सावरत नव्हता. छातीत धडधड, श्वासासाठी सुरू झालेली धडपड आणि डोक्यात आलेली एकच भावना, उंचीचा खरा अर्थ आज समजला! गाईडने शांत राहण्याचा सल्ला दिला, श्वासोच्छ्वास नियंत्रित करण्यास सांगितले आणि काही मिनिटांनी जीव भांड्यात पडला. आपल्या भारताची समुद्रसपाटीपासूनची उंची आहे, फक्त १६० मीटर! पिरॅमिड उतरताना हाच आकडा मेंदूत भणभणत होता.
ही माझी वैयक्तिक गोष्ट सांगण्यामागे कारण आहे. कारण आता विश्वचषकाच्या राऊंड ऑफ १६ मध्ये इंग्लंडला याच मेक्सिको सिटीत यजमान मेक्सिकोविरुद्ध खेळायचे आहे. वरकरणी हा सामना दोन तुल्यबळ संघांमधील वाटतो. पण प्रत्यक्षात इंग्लंडला आधी सामना करावा लागणार आहे, तो मेक्सिकोच्या खेळाडूंशी नव्हे, तर मेक्सिकोच्या उंचीशी.
भूगोलाच्या पुस्तकात आपण समुद्रसपाटीपासूनची उंची शिकतो. त्यावेळी कदाचित त्याचे महत्त्व जाणवत नाही. पण आज तेच इंग्लंडसाठी सर्वांत मोठे आव्हान ठरले आहे. इंग्लंडची समुद्रसपाटीपासूनची सरासरी उंची अवघी ५० ते ५५ मीटर. थंड हवामान, दाट हवा आणि भरपूर ऑक्सिजन याची सवय असलेला हा संघ आता खेळणार आहे, मेक्सिको सिटीतील अझ्टेका स्टेडियमवर, ज्याची समुद्रसपाटीपासूनची उंची आहे, तब्बल दोन हजार, २४० मीटर!
सोप्या भाषेत सांगायचे, तर जणू काही तळमजल्यावर राहणार्या माणसाला अचानक ७०० मजली इमारतीच्या टोकावर नेऊन, आता ९० मिनिटे सतत धावत राहा, असे सांगण्यासारखी ही परिस्थिती आहे. जसजसे उंच जातो, तसतसे हवेतला ऑक्सिजन कमी होत जातो. श्वास जड होतो. हृदयाला अधिक मेहनत घ्यावी लागते. काही पावले चालल्यानंतरही धाप लागते. आणि फुटबॉल तर असा खेळ आहे की, ९० मिनिटे क्षणाक्षणाला धावावे लागते. अशा वेळी छाताड फुटेल की काय, अशी अवस्था होणे, स्वाभाविक आहे.
म्हणूनच इंग्लंडचा अनुभवी खेळाडू जॉर्डन हेंडरसन म्हणाला, विमानातून उतरल्यापासूनच फरक जाणवू लागला. हॉटेलमध्ये चालतानाही तो जाणवत होता. सरावाच्या पहिल्या काही मिनिटांत तर त्याचा अधिक त्रास झाला.
याच पार्श्वभूमीवर एक वेगळीच चर्चा सुरू झाली आहे, व्हायग्राची! उच्च उंचीवर शरीरात ऑक्सिजनचे वहन सुधारण्यासाठी आणि फुप्फुसांवरील ताण कमी करण्यासाठी काही संशोधनांमध्ये सिल्डेनाफिल (व्हायग्रा) उपयोगी ठरू शकते, असे आढळले आहे. त्यामुळे इंग्लंडच्या खेळाडूंनी व्हायग्राचा वापर केल्याच्या चर्चांना उधाण आले. असेही उत्तेजक चाचणीतून व्हायग्राला वगळण्यात आले आहे. अर्थात, याबाबत कोणतीही अधिकृत पुष्टी नाही. पण या चर्चेने एवढे मात्र स्पष्ट केले की, इंग्लंडसमोरचा खरा प्रतिस्पर्धी फक्त मेक्सिकोचा संघ नाही; तर मेक्सिको सिटीची विरळ हवा, उंची आणि शरीराची परीक्षा घेणारे वातावरणही आहे.
फुटबॉलमध्ये प्रत्येक सामना फक्त दोन संघांमध्ये खेळला जात नाही; कधी तो इतिहासाशी खेळला जातो, कधी हवामानाशी, कधी प्रेक्षकांच्या गर्जनेशी आणि कधी स्वतःच्या श्वासाशीही!
मेक्सिको विरुद्ध इंग्लंड ही लढत अशीच आहे. एका बाजूला स्वतःच्या भूमीवर खेळणारा, उंचीशी मैत्री केलेला मेक्सिको; तर दुसर्या बाजूला जगातील बलाढ्य संघांपैकी एक असलेला इंग्लंड, ज्याला सर्वप्रथम जिंकावे लागणार आहे, स्वतःचा श्वास!