मानखुर्द इमारत दुर्घनेत 6 जणांचा मृत्यू; मृतांच्या वारसांना 5 लाखांची आर्थिक मदत

दोन जणांना अटक, काही दिवसांपासून इमारत धोकादायक

Mankhurd Building Collapse
 
मुंबई : (Mankhurd Building Collapse) मुंबईतील मानखुर्द भागात एका तीन मजली चाळीचा भाग कोसळल्याने मोठी दुर्घटना घडली. धोकादायक असलेली ही चाळ रिकामी करण्यासाठी घरातील सामान आवरत असतानाच अचानक पावसाने घात केला आणि संपूर्ण घर कोसळले. रविवार, दि.५ रोजी रात्री घडलेल्या या घटनेत ढिगाऱ्याखाली गाडले गेल्यामुळे 5 निष्पाप लहान मुले आणि एका महिलेसह 6 जणांचा जागीच मृत्यू झाला आहे.
 
रविवार, दि. 5 जुलै रोजी रात्री सुमारे 8.30 वाजता जनता नगर, न्यू मंडाळा, मानखुर्द येथे इमारत कोसळल्याची घटना घडली. या घटनेची माहिती मिळताच राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल, मुंबई अग्निशमन दल, स्थानिक पोलीस, महानगरपालिकेचे विभाग कार्यालयातील कर्मचारी आणि 108 रुग्णवाहिका तत्काळ घटनास्थळी दाखल झाले. युद्धपातळीवर बचावकार्य सुरू करून ढिगाऱ्याखाली अडकलेल्या लोकांना बाहेर काढण्यात आले आणि तातडीने जवळच्या रुग्णालयांमध्ये रवाना करण्यात आले. यावेळी स्थानिक नगरसेवक नवनाथ बन यांनी स्वतः घटनास्थळी उपस्थित राहून बचावकार्याचे समन्वयन केले. मंत्री गिरीश महाजन यांनीही रात्री घटनास्थळी भेट देत परिस्थितीचा आढावा घेतला.(Mankhurd Building Collapse)
 
दरम्यान, या घटनेप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून दोन जणांना अटक करण्यात आली आहे. मानखुर्द पोलीस ठाण्यात गु.र.क्र. 425/2026 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फिर्यादीच्या तक्रारीनुसार, आवश्यक सुरक्षिततेचे नियम न पाळता अनधिकृत चार मजली इमारतीचे बांधकाम करण्यात आले होते. इमारत काही दिवसांपासून धोकादायक अवस्थेत असल्याची माहिती असूनही त्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करण्यात आले. ही इमारत कोसळून शेजारील झोपडीवर पडल्याने सहा जणांचा मृत्यू झाला आहे. इमारतीचे मालक, बांधकामाशी संबंधित कंत्राटदार, झोपडी मालक तसेच अनधिकृत बांधकामास प्रोत्साहन देणाऱ्या संबंधित खाजगी व शासकीय व्यक्तींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी दोघांना अटक केली आहे. पुढील तपास मानखुर्द पोलीस करत आहेत.(Mankhurd Building Collapse)
 
मृतांच्या वारसांना 5 लाख रुपये आर्थिक मदत
 
मुंबईतील मानखुर्द भागात एक घर कोसळून झालेल्या दुर्घटनेत 6 जणांचा मृत्यू झाल्याच्या घटनेबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तीव्र दुःख व्यक्त केले असून मृतांना श्रद्धांजली अर्पण केली आहे. या प्रसंगात त्यांच्या कुटुंबियांच्या दुःखात आम्ही सहभागी आहोत, असेही त्यांनी म्हटले असून मृतांच्या वारसांना 5 लाख रुपये आर्थिक मदत त्यांनी जाहीर केली आहे.(Mankhurd Building Collapse)
 
 




गायत्री श्रीगोंदेकर

मूळची अहिल्यानगर येथील. 'राज्यशास्त्र' विषयातील पदवी. रानडे इन्स्टिट्यूट मधून (सा.फु.पुणे विद्यापीठ) 'एमजेएमसी' विषयात पदव्युत्तर शिक्षण. २०१९मध्ये मुंबई तरुण भारतमध्ये 'मंत्रालय प्रतिनिधी' या पदावर रुजू. सद्यस्थितीत 'इन्फ्रास्ट्रक्चर आणि डेव्हलपमेंट' विशेष प्रतिनिधी म्हणून कार्यरत. राज्यातील पायाभूत सुविधांविषयी फिल्ड रिपोर्ट आणि लेखनात रस.
संबंधित मजकूर