मुंबई : (Maharashtra Heavy Rain) राज्यात अतिमुसळधार पाऊस सुरु असून पुढील 48 तास हे राज्यासाठी महत्वपूर्ण असणार आहे. राज्याच्या अनेक भागात अतिमुसळधार ते ढगफुटीसदृश्य पाऊस होण्याची शक्यता आहे. तसेच, धरण क्षेत्रातही अतिमुसळधार पाऊस असल्याने आता येत्या काही तासांत धरणांतून विसर्ग सोडण्यात येईल. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्य आपत्कालीन कक्षाला भेट देत परिस्थितीचा आढावा घेतला. सर्व अधिकारी आणि राज्य शासनाच्या यंत्रणांना अलर्ट मोडवर राहण्याचे आदेश मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिला आहे.
नाशिक जिल्ह्याला ढगफुटीची सूचना
नाशिक आणि त्रंबकेश्वरच्या काही भागामध्ये आज ढगफुटी संभावित आहे. राज्य आपत्ती व्यवस्थापन विभागाच्या बैठकीत याबाबतचे निर्देश प्राप्त झालेले आहेत. ही ढगफुटी मोठी ढगफुटी असू शकते. जवळपास 300 मिलीमीटर इतका पाऊस या सगळ्या भागांमध्ये होऊ शकतो. नाशिकच्या बऱ्याच मोठ्या भागांमध्ये पाऊस होईल. त्या दृष्टीने जिल्हा प्रशासनाने मोठ्या प्रमाणात तयारी केलेली आहे. मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, "नाशिक शहर आणि नाशिक जिल्हा या ठिकाणी ढगफुटीमुळे जी परिस्थिती येऊ शकते त्याचे अँटीिसिपेशन करून बऱ्याचशा उपाय योजना त्या ठिकाणी करण्यात आलेल्या आहेत. पण याच्यावर अतिशय करडी नजर आपल्याला ठेवावी लागेल. कारण हा एक मेजर इन्सिडन्स असेल, जो या ठिकाणी आपल्याला संभावित आहे. दि. 8 तारखेपर्यंत सातत्याने आपल्याला हे सगळे अलर्ट्स आहेत", अशी माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली.(Maharashtra Heavy Rain)
पालघर जिल्हा सर्वाधिक प्रभावित
गेल्या चार पाच दिवसांमध्ये पालघर जिल्हा हा सर्वाधिक प्रभावित अशा प्रकारचा जिल्हा आहे. वसई -विराचा, पालघर शहराचा भाग भागात मोठ्या प्रमाणावर पाणी भरले आहे. याठिकाणी रस्ते बंद आहेत. विशेषत: गुजरात मधून येणाऱ्या रेल्वे आधीच रस्त्यात थांबलेल्या आहेत. या रेल्वेतून बाहेर काढत रस्ते मार्गे आणण्याचा प्रयत्न चाललेला आहे. अहमदाबाद-मुंबई नवीन हायवेच्या काही भागांमध्ये मोठ्या प्रमाणात काम चालू असल्यामुळे पाणी साठलेले पाहायला मिळते आहे. तिथे रस्ता बंद झालेला आहे तोही रस्ता रिकामा करण्याच काम हे चाललेल आहे. पालघर जिल्ह्यामध्ये साडेचार वाजता पुन्हा भरती आहे. पाऊस आता थांबलाय, पण तो पुन्हा सुरु होणार आहे. त्यामुळे भरतीवर आपल्याला नजर ठेवावी लागेल. कारण पुन्हा पाणी साठण्याच्या घटना पुन्हा दिसू शकतील, असेही मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले.
पालघर जिल्ह्यामध्ये एक छोटे धरण आहे. त्याच्या काही भागांमध्ये पिचिंग निघून गेले आहे. त्यामुळे त्या धरणाला कदाचित धोका निर्माण होऊ शकतो म्हणून त्याभागातील खालची गाव रिकामी करण्यात येत आहेत. तिथल्या काही लोकांना सुरक्षित ठिकाणी नेण्याचे काम चालले आणि समांतरपणे धरणाला धोका निर्माण होऊ नये यादृष्टीने जे काही इमर्जन्सी उपाय करता येतात ते उपाय दुरुस्तीचे ते करणेही सुरु असल्याचे फडणवीसांनी नमूद केले.(Maharashtra Heavy Rain)
रायगड जिल्ह्यातही पावसाचा जोर वाढला
रायगडमध्ये खूप मोठ्या प्रमाणात पाऊस आहे. रायगडच्या पश्चिमी घाटाच्या भागामध्ये मोठ्या प्रमाणात पाऊस आहे. महाबळेश्वर, लोणावाळ्याच्या सगळ्या भागामध्ये प्रचंड मोठा पाऊस आहे. सरासरीपेक्षा कितीतरी पट जास्त पाऊस याभागात झालेला आहे. सावित्री नदीने धोक्याची पातळी ओलांडली आहे, पण सुदैवाने त्याचे डिसिल्टिंग झाल्यामुळे धोक्याची पातळी ओलांडल्यानंतरही अजून शहरांमध्ये पाणी शिरलेलं नाही किंवा ते आपण थांबवू शकलेलो आहोत. पण अजूनही त्याच्याकडे लक्ष आहे. जवळपास चार ज्या महत्त्वाच्या नद्या आहेत त्या चारही नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडली आहे त्यामुळे अनेक आव्हाने समोर आहेत. त्या दूर करण्याच्या दृष्टीने मोठ्या प्रमाणात त्याच्याकडे लक्ष देणं हे चाललेल आहे.(Maharashtra Heavy Rain)
मुंबई- गोवा हायवे
आपल्याला कल्पना आहे की, मुंबई-गोवा हायवेवर कशेडीला मोठी दरड कोसळली आहे. जवळपास एक डोंगरच पूर्ण कोसळून तो खाली आला आहे. हा मलबा काढण्याचे काम सुरु आहे. या हायवेवर आठ ठिकाणी अनपेक्षित अशा प्रकारच्या दरडी कोसळल्या आहेत. पण आता जवळजवळ सगळे क्लियर करणे चाललेल आहे. आता हाय-वे कसा सुरू करता येईल याचाही विचार सुरु आहे.
साताऱ्यातही मुसळधार
साताऱ्यामध्ये घाटाच्या भागामध्ये आणि विशेषतः पश्चिमी घाटामध्ये मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी झालेली आहे. याठिकाणी काळजी घेतली जाते आहे. कोल्हापूरमध्येही पाण्याची वाटचाल आता हळूहळू धोक्याच्या पातळीकडे चाललेली आहे. मात्र अजून लो लाईंग एरियामध्ये मोठ्या प्रमाणात पाणी शिरलेलं नाही. तिथे आपण लक्ष ठेवून आहोत आणि तिथे पुराचा धोका होऊ नये अशा पद्धतीने देखील प्रयत्न सुरु आहे, अशी माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली.
वारकरी पुण्यामध्ये आले तर अधिक सोयीचे
खूप मोठ्या प्रमाणात अतिवृष्टीमुळे इंद्रायणीवरचे चारही पूल पाण्याखाली चाललेले आहेत. त्यामुळे वारकऱ्यांना विनंती आहे की, आता वारी 10 तारखेला पुण्यात पोहोचते आहे. आळंदी आणि देहूवरुन ती वारी येते. पण वारकऱ्यांनी आता तिथे न जाता पुण्यामध्येच आले पाहिजे कारण तिथे जाणे धोक्याचे आहे. त्यामुळे सगळ्या वारकऱ्यांना ही विनंती आहे की, मोठ्या प्रमाणात देहू आणि आळंदीला जमा न होता ते जर पुण्यामध्ये ते आले तर अधिक सोयीचे होईल. त्यातून कुठलीही आपत्ती निर्माण होणार नाही. बाकी वारीसाठी ज्या आवश्यक व्यवस्था करायच्या आहेत, त्या मोठ्या प्रमाणात केल्या आहेत. आता पावसाची परिस्थिती पाहून जास्तीत जास्त जर्मन हँगर्सच्या (मजबूत, मॉड्यूलर आणि तात्पुरत्या स्वरूपात उभारले जाणारे हाय-टेक शेड किंवा मंडप असतात) माध्यमातून वारकऱ्यांची व्यवस्था झाली पाहिजे आणि कुठेही त्रास होऊ नये या दृष्टीने देखील जी काही व्यवस्था करायची ती राज्य शासनाने केलेली आहे, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.(Maharashtra Heavy Rain)
मूळची अहिल्यानगर येथील. 'राज्यशास्त्र' विषयातील पदवी. रानडे इन्स्टिट्यूट मधून (सा.फु.पुणे विद्यापीठ) 'एमजेएमसी' विषयात पदव्युत्तर शिक्षण. २०१९मध्ये मुंबई तरुण भारतमध्ये 'मंत्रालय प्रतिनिधी' या पदावर रुजू. सद्यस्थितीत 'इन्फ्रास्ट्रक्चर आणि डेव्हलपमेंट' विशेष प्रतिनिधी म्हणून कार्यरत. राज्यातील पायाभूत सुविधांविषयी फिल्ड रिपोर्ट आणि लेखनात रस.