मुंबई : (Madhya Pradesh Waqf Board) मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री डॉ. मोहन यादव यांच्या निर्देशानुसार मध्य प्रदेशात नव्या वक्फ मंडळाची स्थापना करण्यात आली असून, राज्य सरकारने यासंदर्भातील अधिसूचना राजपत्रात प्रसिद्ध केली आहे. वक्फ अधिनियम, १९९५ (सुधारित-२०२५) अंतर्गत नव्या वक्फ मंडळाचे पुनर्गठन करणारे मध्य प्रदेश हे देशातील पहिले राज्य ठरले आहे. तसेच, मध्य प्रदेश वक्फ मंडळावर प्रथमच दोन हिंदू सदस्यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
राज्य सरकारने वक्फ अधिनियम, १९९५ (सुधारित-२०२५) मधील कलम १३ आणि कलम १४ मधील तरतुदींनुसार या मंडळाची स्थापना केली आहे. नव्या मध्य प्रदेश वक्फ मंडळाचे अध्यक्ष म्हणून सनवर पटेल यांची नियुक्ती करण्यात आली आहे. ते यापूर्वीच्या मंडळाचेही अध्यक्ष होते. मंडळात एकूण १० सदस्यांचा समावेश करण्यात आला आहे. यामध्ये प्रथमच दोन हिंदू सदस्य म्हणून मनोज मालपानी आणि अनिमेष भार्गव यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
राज्य सरकारने स्पष्ट केले की, नजमा हेपतुल्ला यांची निवड २०२३ मध्ये वक्फ अधिनियमांतर्गत करण्यात आली होती आणि त्यांचा कार्यकाळ १८ एप्रिल २०२८ पर्यंत आहे. त्यामुळे उर्वरित कार्यकाळासाठी त्यांना नव्या वक्फ मंडळातही सदस्य म्हणून कायम ठेवण्यात आले आहे. या नव्या स्थापनेमुळे सुधारित वक्फ कायदा-२०२५ अंतर्गत वक्फ मंडळाचे पुनर्गठन करणारे मध्य प्रदेश हे देशातील पहिले राज्य ठरले आहे.(Madhya Pradesh Waqf Board)
यापूर्वी वक्फ अधिनियम, १९९५ लागू होता. त्या कायद्यानुसार वक्फ मंडळातील सर्व सदस्य मुस्लिम असणे बंधनकारक होते. सरकारकडून नामनिर्देशित करण्यात येणारे सदस्यही मुस्लिम समाजातीलच असत. मात्र, वक्फ अधिनियम-२०२५ मधील नव्या तरतुदीनुसार आता प्रत्येक राज्यातील वक्फ मंडळावर किमान दोन गैर-मुस्लिम सदस्यांचा समावेश अनिवार्य करण्यात आला आहे.
नव्या वक्फ मंडळातील सदस्यांमध्ये नजमा हेपतुल्ला (नवी दिल्ली), आमदार आतिफ अकील (भोपाळ उत्तर), फैजान खान (उज्जैन), बहीण फातेमा चौधरी (इंदूर), शाइस्ता सुल्तान (नगरसेविका, बैरसिया), शबाना खान (नगरसेविका, रतलाम), मनोज मालपानी (इंदूर), अनिमेष भार्गव (राघौगढ, गुना) तसेच मागासवर्गीय व अल्पसंख्याक कल्याण विभागाचे आयुक्त यांचा सदस्य म्हणून समावेश करण्यात आला आहे.
उपलब्ध माहितीनुसार, मध्य प्रदेश वक्फ मंडळाकडे १४,८६३ नोंदणीकृत वक्फ इस्टेट असून त्यांच्याशी संबंधित २३,११८ वक्फ मालमत्तांची नोंद आहे. यामध्ये प्रामुख्याने मशिदी, दर्गे, कब्रस्ताने, मदरसे, ईदगाह, दुकाने, घरे, शेतीजमिनी तसेच इतर धार्मिक आणि व्यावसायिक मालमत्तांचा समावेश आहे.(Madhya Pradesh Waqf Board)
वक्फ मंडळाची भूमिका
मध्य प्रदेश वक्फ मंडळ ही वक्फ अधिनियम, १९९५ अंतर्गत स्थापन करण्यात आलेली एक वैधानिक संस्था असून तिचे मुख्यालय भोपाळ येथे आहे. वक्फ मालमत्तांचे व्यवस्थापन, संरक्षण आणि त्यातून मिळणाऱ्या उत्पन्नाचा योग्य उपयोग सुनिश्चित करणे हे मंडळाचे प्रमुख कार्य आहे. तसेच राज्यातील सर्व नोंदणीकृत वक्फ मालमत्तांची नोंद ठेवणे, अतिक्रमणापासून त्यांचे संरक्षण करणे, वाद निर्माण झाल्यास कायदेशीर कारवाई करणे आणि त्या मालमत्तांमधून मिळणारे उत्पन्न धार्मिक, शैक्षणिक व सामाजिक कल्याणासाठी वापरले जाईल याची खात्री करणे हीही मंडळाची जबाबदारी आहे.
कोण आहेत मनोज मालपानी आणि अनिमेष भार्गव?
मनोज मालपानी हे इंदूर येथील रहिवासी असून ते अनेक वर्षांपासून सामाजिक तसेच सार्वजनिक क्षेत्रात सक्रिय आहेत. विविध सामाजिक संस्थांमध्ये त्यांनी सक्रिय भूमिका बजावली असून धार्मिक आणि जनसेवेशी संबंधित अनेक उपक्रमांमध्येही त्यांचा सहभाग राहिला आहे. त्यांच्या अनुभवाचा विचार करून राज्य सरकारने त्यांची वक्फ मंडळाच्या सदस्यपदी नियुक्ती केली आहे.
अनिमेष भार्गव हे गुना जिल्ह्यातील राघौगढ येथील रहिवासी आहेत. तेही सामाजिक आणि सार्वजनिक कार्यात सक्रिय असून स्थानिक पातळीवर त्यांची ओळख सामाजिक कार्यकर्ते म्हणून आहे. जनहिताच्या विविध प्रश्नांवर त्यांनी सातत्याने काम केले असून त्यांच्या कार्यानुभवाची दखल घेत त्यांनाही वक्फ मंडळाचे सदस्य म्हणून नियुक्त करण्यात आले आहे.(Madhya Pradesh Waqf Board)
'मास मीडिया' या विषयातून पदवीपर्यंतचे शिक्षण पूर्ण.'कम्युनिकेशन ॲण्ड जर्नालिझम' विषयातून पदव्युत्तरपर्यंतचे शिक्षण पूर्ण. सध्या दै.'मुंबई तरुण भारत'मध्ये वेब उपसंपादक म्हणून कार्यरत. लिखाण, संगीत, वाचन, फोटोग्राफी, इ.ची आवड.लिवोग्राफी भाषाशैलीत विशेष प्रावीण्य.बालपणापासून रा.स्व.संघाचा स्वयंसेवक