उन्मादाचा विळखा!

    06-Jul-2026   

Football World Cup domestic violence
 
जगावर सध्या फुटबॉल विश्वचषकाची मोहिनी पसरली आहे. आपल्या संघाने विजय खेचून आणावा, या ईर्षेने खेळाडूंबरोबरचच त्यांचे चाहतेही पेटलेले आहेत. मानवी जीवनाच्या सर्व मर्यादांवर मात करण्यासाठी, खेळच आपल्याला मदत करतात. काळाच्या ओघात या खेळाचे रूपांतर, एका मोठ्या सोहळ्यात होते. असा खेळ केवळ कुठल्याही संघाचा न राहाता, तो जनसंवेदनांचाही होतो. ही संवेदना जर मानवी मनाला उत्तेजित करणारी, दिशा देणारी असेल, तर तिचे स्वागतच. मात्र, ही संवेदना ज्यावेळी घरगुती हिंसाचारास कारणीभूत ठरते, त्यावेळी या जागतिक खेळाची दुखरी बाजू लक्षात येते.
 
अलीकडील काही सर्वेक्षणांनुसार, फुटबॉल सामन्यांच्या निकालांचा आणि कौटुंबिक हिंसाचाराचा अतिशय जवळचा संबंध असल्याचे सिद्ध झाले. या विषयावर ब्रिटनमधील ‘लँकेस्टर युनिव्हर्सिटी’चे संशोधन आणि २०२५-२०२६चे ताजे अहवाल अंगावर काटा आणणारे आहेत. यातील निष्कर्षांनुसार, जेव्हा एखादा प्रमुख संघ सामना हरल्यावर, कौटुंबिक हिंसाचाराच्या घटना तब्बल ३८ टक्क्यांनी वाढतात.
 
धक्कादायक म्हणजे, जेव्हा संघ सामना जिंकतो किंवा ‘ड्रॉ’ होतो, तेव्हा या हिंसाचारात २६ टक्क्यांनी वाढ होते. तसेच, सामना संपल्यानंतरच्या दुसर्‍या दिवशी, या घटनांचे प्रमाण नेहमीपेक्षा ११ टक्क्यांनी जास्त असते. याचाच अर्थ असा की, सामन्याचा निकाल काहीही लागला, तरी घरातील महिला आणि मुलांसाठी तो काळ अत्यंत धोक्याचाच ठरतो.
 
पोलिसांच्या डेटावरून असे दिसून आले आहे की, ९० मिनिटांचा सामना सुरू असतो, तेव्हा कौटुंबिक हिंसाचाराच्या तक्रारी पाच टक्क्यांनी कमी होतात. कारण, अत्याचार करणारी व्यक्ती सामना पाहण्यात मग्न असते. मात्र, सामना संपल्यानंतर साधारण दहा ते १२ तासांच्या आत, हिंसाचाराचा हा आलेख अचानक अत्यंत वेगाने वर जातो. यामध्ये मद्यपान हेच सर्वांत मोठे कारण ठरते. फुटबॉल सामन्यांच्या दिवशी सकाळपासून किंवा दुपारपासूनच मोठ्या प्रमाणात दारू पिणे, सामन्याचा ताण आणि शरीरातील वाढलेले ‘ड्रिनालिन’ यांचे एकत्र मिश्रण होऊन, माणसाचा स्वतःवरील ताबा सुटतो. त्यातच जर एखाद्या मजबूत संघाचा अनपेक्षितपणे दुबळ्या संघाकडून पराभव झाला, तर हा राग अधिक भयानक रूप धारण करतो. अर्थातच, तज्ज्ञ एका गोष्टीवर ठाम आहेत की फुटबॉल खेळामुळे हिंसाचार पसरत नाही, तर ज्यांची प्रवृत्ती आधीपासूनच हिंसक किंवा वर्चस्व गाजवणारी असते, त्यांच्यासाठी फुटबॉलचा सामना हे केवळ एक निमित्त ठरते. सध्या २०२६चा विश्वचषक सुरू असताना, जगभरातील अनेक देशांच्या सरकारांनी आणि सामाजिक संस्थांनी ‘गिव्ह डोमेस्टिक अब्युज द रेड कार्ड’सारख्या मोहिमा राबवून, पोलिसांची गस्त वाढवली आहे.
 
फुटबॉल सामने आणि कौटुंबिक हिंसाचाराचा संबंध केवळ युरोपपुरता मर्यादित नसून, इतर देशांमध्येही अशीच काहीशी परिस्थिती आहे. ब्राझीलमध्ये यावर संशोधन झाले होते. तिथल्या ताज्या अहवालानुसार, जेव्हा स्थानिक लीग किंवा आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये एखाद्या मोठ्या संघाचा अनपेक्षित पराभव होतो, तेव्हा कौटुंबिक हिंसाचाराच्या तक्रारींमध्ये ७.६ टक्क्यांनी थेट वाढ होते. ब्राझीलमध्ये फुटबॉल हा लोकांच्या अस्मितेचा विषय असल्याने, तिथला भावनिक उद्रेक घरातल्या महिलांवर निघतो.
 
काही महिन्यांपूर्वी फ्रान्सचा नामांकित फुटबॉल लब पॅरिस सेंट-जर्मनने जेव्हा जेतेपद जिंकले, तेव्हा पॅरिस आणि फ्रान्समधील इतर शहरांमध्ये मोठ्या प्रमाणावर दंगली, जाळपोळ आणि हिंसाचाराच्या घटना घडल्या आहेत. फुटबॉल सामन्यांच्या अतिउत्साहाचे रूपांतर सामाजिक अराजकतेमध्ये कसे होते, याचे हे एक मोठेच उदाहरण आहे. घरात चार भिंतींच्या आड होणारा छुप्या स्वरूपातील कौटुंबिक हिंसाचार असो, वा पॅरिससारख्या शहरात रस्त्यावर उघडपणे होणारी जाळपोळ आणि दंगली असोत; या दोन्ही गोष्टी एकाच विकृत मानसिकतेची दोन टोके आहेत. खेळाचा अतिरेकी अभिमान, गर्दीचा उन्माद आणि व्यसनाधीनता यांमुळे जेव्हा माणसाचा स्वतःवरील ताबा सुटतो, तेव्हाच खेळाचा मूळ उद्देशच नष्ट होतो. फुटबॉलचा हा थरार कोणाच्याही नाशाचे कारण बनू नये, यासाठी खेळाकडे केवळ एक खेळ म्हणून पाहण्याची सुजाण प्रवृत्ती आज संपूर्ण जगात निर्माण होणे, अत्यंत गरजेचे आहे.




मुकुल आव्हाड

मुंबईच्या डी.जी. रुपारेल महाविद्यालयातून इतिहास आणि राज्यशास्त्र विषयात पदवी प्राप्त.
राज्यशास्त्र विषयात पदव्युत्तर शिक्षण. आकाशवाणीच्या युवा वाणी साठी विविध विषयांवर कार्यक्रम सादर केले.वाचनाची आवड. कथाकथन, काव्य वाचन,कथा लेखन यात विशेष रुची तसेच पुरस्कार प्राप्त. महाविद्यालयात असताना, नाटकात काम केले त्याच सोबत नाट्यलेखनाचा अनुभव.
संबंधित मजकूर