उन्हाळाभर जमिनीखाली सुप्तावस्थेत राहणारा भुईकांदा पहिल्या पावसाबरोबर पुन्हा नवजीवन धारण करतो. पानांच्या टोकावरच नवीन कंद तयार करून स्वतःचा वंश वाढविण्याची त्याची विलक्षण पद्धत, बदलत्या हवामानाशी जुळवून घेण्याची क्षमता आणि औषधी गुणधर्म यांमुळे ही वनस्पती निसर्गातील उत्क्रांती आणि अस्तित्वाच्या संघर्षाचे प्रेरणादायी उदाहरण ठरते.
निसर्गात अशा अनेक गोष्टी असतात, ज्या कधीकधी आपल्याला माहीतही नसतात. माणसांप्रमाणेच निसर्गातील प्रत्येक सजीव आपले अस्तित्व टिकवण्यासाठी स्वतःमध्ये बदल घडवून आणत असतो. असाच काहीसा विलक्षण बदल भुईकांदा (Ledebouriarevoluta) या वनस्पतीतही पाहायला मिळतो. यातील Ledebouria हे नाव कार्ल फ्रिड्रिख फॉन लेडेबूर या वनस्पती-शास्त्रज्ञांच्या नावावरून ठेवले गेले. त्यांनी रशियाच्या पहिल्या संपूर्ण वनस्पती-ग्रंथाचे प्रकाशन केले होते. भुईकांदा ही Asparagaceae कुलातील बहुवर्षायु कंदयुक्त वनस्पती असून, भारत, श्रीलंका, तसेच आफ्रिकेतील अनेक देशांमध्ये नैसर्गिकरीत्या आढळते. भारतात ही वनस्पतीIndian Squill किंवा जंगली कांदा (Wild Onion) म्हणूनही ओळखली जाते. ती विशेषतः पश्चिम घाट, कोकण, दख्खन पठार आणि कोरड्या पानगळीच्या जंगलांमध्ये पावसाळ्याच्या सुरुवातीला दिसून येते. ही एक भू-सुप्त(geophyte) वनस्पती आहे. उन्हाळ्यात संपूर्ण वनस्पती जमिनीखालील कंदाच्या स्वरूपात सुप्तावस्थेत राहते आणि पहिल्या पावसाबरोबर पुन्हा नव्याने उगवते. पावसाळ्याच्या सुरुवातीला जमिनीत दडलेले कंद पुन्हा जागृत होतात. त्यातून हिरवीगार, जाडसर आणि लिलीच्या पानांसारखी लांबट पाने बाहेर येतात. उन्हाळ्यात या वनस्पतीचा मागमूसही दिसत नाही; मात्र पहिल्या पावसाबरोबर ती नवजीवन धारण करते.
साधारण महिन्याभरातच या हिरव्या पानांसोबत फिकट गुलाबी रंगाचे लांब तुरे उमलू लागतात. तुर्याच्या शेंड्यावर पाच-सहा फुले एकत्र फुलतात, तर उर्वरित देठावर एकामागून एक अशा अनेक फुलांची सुंदर आरास पाहायला मिळते. या नाजूक फुलांभोवती मधमाश्या व इतर परागसिंचन करणारे कीटक आकर्षित होतात. त्यामुळे या वनस्पतीचा स्थानिक परिसंस्थेतील परागीभवन प्रक्रियेतही महत्त्वाचा वाटा असतो. हिरव्या पानांच्या सोबतीने या झुलत्या फुलांच्या माळा वार्यासवे डोलू लागतात. मात्र, या वनस्पतीला अर्थ प्राप्त होतो, ते तिच्या पुनरुत्पादन करण्याच्या क्षमतेमुळे. फुलोरा संपल्यानंतर प्रत्येक पानाच्या टोकावर गडद गुलाबी रंगाचे लहान कंद (bulbils) तयार होतात. या वनस्पतीमध्ये बियांची निर्मिती अत्यल्प असल्याने ती प्रामुख्याने शाखीय पुनरुत्पादन(Vegetative Reproduction) करते. परिपक्व झालेले कंद जमिनीवर पडतात आणि पुढील पावसाळ्यात त्यांच्यापासून नवीन रोपे उगवतात. त्यामुळे कमी कालावधीत तिचा प्रसार प्रभावीपणे होतो.
भुईकांदा ही केवळ सुंदर वनस्पती नसून पारंपरिक औषधीदृष्ट्याही महत्त्वाची मानली जाते. दक्षिण आफ्रिकेतील काही आदिवासी समुदाय या वनस्पतीचे कंद अन्न म्हणून वापरतात.आयुर्वेद आणि लोकवैद्यकात तिच्या कंदांचा उपयोग संधिवात, त्वचारोग, खोकला, दमा, जंतनाशक आणि हृदयविकारांशी संबंधित काही उपचारांमध्ये केला जात असल्याचे उल्लेख आढळतात. आधुनिक संशोधनात तिच्या कंदांमध्ये प्रतिजैविक (antimicrobial), प्रतिऑक्सिडंट (antioxidant) आणि जैवसक्रिय संयुगे आढळली असून औषधनिर्मितीच्या दृष्टीने तिच्यावर संशोधन सुरू आहे.
या वनस्पतीमध्ये जनुकीय बदलांचे प्रमाण तुलनेने अधिक आढळते. बदलत्या हवामानाशी जुळवून घेण्याची क्षमता, सुप्तावस्थेत टिकून राहण्याची सवय आणि शाखीय पुनरुत्पादनाची अनोखी पद्धत यांमुळे भुईकांद्याने आपले अस्तित्व हजारो वर्षे टिकवून ठेवले आहे. निसर्गातील प्रत्येक सजीव जगण्याची नवी दिशा दाखवतो, भुईकांदा त्याचेच एक सुंदर आणि प्रेरणादायी उदाहरण आहे.
परेश गुरव
(लेखक रत्नागिरीच्या गोगटे जोगळेकर महाविद्यालयामध्ये वनस्पतीशास्त्र विभागात साहा. प्राध्यापक म्हणून कार्यरत आहेत.)
७४४७३७६९९७