गेली अनेक वर्षे धारावीत व्यसनमुक्तीच्या चळवळीत अविरतपणे कार्यरत असणार्या सामाजिक कार्यकर्ते अरुण कुंचिकोर यांच्याविषयी...
धारावी म्हटलं की, आपल्या डोळ्यांसमोर दाट लोकवस्ती, संघर्ष आणि विविध सामाजिक समस्या उभ्या राहतात. या समस्यांमध्ये, तरुणांमधील वाढत चाललेले अमली पदार्थांचे व्यसन ही सर्वाधिक चिंतेची बाब. मात्र, या अंधारात अनेक वर्षांपासून आशेचा दिवा पेटवून, हजारो तरुणांचे आयुष्य बदलण्याचे काम करणारे व्यक्तिमत्त्व म्हणजे अरुण कुंचिकोर. ‘अरुणोदय फाऊंडेशन’च्या माध्यमातून त्यांनी व्यसनमुक्तीचा लढा उभारला असून, आज हजारो कुटुंबांसाठी ते आधारवड ठरले आहेत.
सन २०१७ पासून अरुण कुंचिकोर धारावी परिसरात, व्यसनमुक्तीसाठी सातत्याने कार्यरत आहेत. त्यांना आलेल्या अनुभवातून ते सांगतात की, "आज व्यसनाचे प्रमाण चिंताजनकरीत्या वाढले असून, अनेक तरुण अवघ्या १२ ते २२ वयोगटातच अमली पदार्थांच्या विळख्यात अडकत आहेत. ही परिस्थिती केवळ एका व्यक्तीची किंवा एका कुटुंबाची समस्या नसून, संपूर्ण समाजासाठीच धोक्याची घंटा आहे. त्यामुळे केवळ व्यसनाविरोधात बोलण्यापेक्षा, त्यातून बाहेर पडण्याचा मार्ग दाखवणे अधिक महत्त्वाचे आहे.”
यातूनच त्यांनी ‘अरुणोदय फाऊंडेशन’ची स्थापना करून, व्यसनाधीन युवकांना समुपदेशन, उपचार आणि पुनर्वसनाची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. विरार येथील व्यसनमुक्ती केंद्रामध्ये व्यसनाधीन युवकांना दाखल करून, त्यांच्यावर उपचार केले जातात. उपचारानंतर त्यांना नव्याने आयुष्य जगण्याची प्रेरणा देत, समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्याचे कामही केले जाते. आजपर्यंत सात ते आठ हजारांहून अधिक व्यसनाधीन युवकांना, अरुण यांच्या या कार्याचा लाभ झाला आहे. त्यांच्या या कार्यामुळे, अनेकांचे संसार पुन्हा उभे राहिले आहेत.
अरुण यांचे वैशिष्ट्य म्हणजे, ते स्वतः व्यसनाच्या गर्तेतून बाहेर पडलेले असल्याने, त्यांच्या शब्दांमागे अनुभवाची शक्ती आहे. यामुळेच व्यसनाधीन तरुणांशी सहज संवाद साधणे त्यांना शक्य होते. ते तरुणांना नेहमीच सांगतात की, "व्यसनातून बाहेर पडणे अशक्य नाही. योग्य इच्छाशक्ती, कुटुंबाचा आधार आणि योग्य उपचार मिळाले, तर कोणताही युवक नव्याने आयुष्य सुरू करू शकतो.
व्यसनमुक्तीच्या या लढ्यात कुटुंबाची भूमिकाही अत्यंत महत्त्वाची आहे,” असे ते म्हणतात. अनेकदा व्यसनाधीन युवक स्वतःहून मदतीसाठी पुढे येत नाहीत. अशा वेळी त्यांच्या कुटुंबीयांकडून तक्रार केली जाते. पोलीस ठाण्यातूनही अनेक युवकांना, त्यांच्याकडे समुपदेशनासाठी पाठवले जाते. अशा युवकांच्या समुपदेशन, उपचार आणि पुनर्वसनाची संपूर्ण जबाबदारी ‘अरुणोदय फाऊंडेशन’ स्वीकारते. गेल्या काही वर्षांत धारावी पोलिसांसोबत, अरुण यांचा उत्तम समन्वय निर्माण झाला आहे. पोलीस प्रशासनाकडून व्यसनाधीन युवकांची माहिती मिळाल्यानंतर, त्यांना उपचारासाठी अरुण यांच्याकडे पाठवले जाते. या समन्वयामुळेच, आज अनेक युवक गुन्हेगारीच्या मार्गावर जाण्यापासून वाचले आहेत. व्यसन आणि गुन्हेगारी यांचा थेट संबंध असल्याने, समाजातील गुन्हेगारी कमी करण्यासाठीही अरुण यांचे मोठे योगदान असल्याचे म्हणता येते.
अरुण यांचे आणखी एक यश म्हणजे, त्यांच्या केंद्रातून उपचार घेऊन बरे झालेले अनेक युवक, आज स्वतःही व्यसनमुक्तीच्या मोहिमेत सहभागी झाले आहेत. पूर्वी व्यसनाच्या आहारी गेलेले हेच युवक, आता इतरांना समुपदेशन करत, नवीन रुग्णांना आधार देत आणि समाजात जनजागृतीचे काम करत आहेत. हीच खरी कमाई आणि सर्वांत मोठी भेट असल्याचे, अरुण मानतात.
व्यसनातून मिळालेला पैसा कधीच सुख देत नसल्याचे, अरुण युवकांना सांगतात. तसेच, वाममार्गाने आलेला पैसा, कुटुंबालाच उद्ध्वस्त करत असल्याचे मार्गदर्शनही ते युवकांना करतात. त्यामुळे कोणत्याही परिस्थितीत ड्रग्सच्या व्यवसायाकडे किंवा व्यसनाच्या मार्गाकडे वळू नका, हा संदेश ते समाजातील प्रत्येक घटकाला देतात.
व्यसनमुक्तीबरोबर जनजागृतीवरही अरुण यांचा विशेष भर आहे. धारावीमध्ये पोलीस प्रशासनाच्या सहकार्याने रॅली, शाळांमध्ये मार्गदर्शन सत्रे, महिलांसाठी बैठका, पथनाट्य, युवक मेळावे आणि विविध जनजागृती कार्यक्रमांचे आयोजन नियमितपणे केले जाते. व्यसनी होण्यापूर्वी प्रतिबंध करणे, हेच या मोहिमेचे प्रमुख उद्दिष्ट आहे.
अरुण यांचे कार्य हे केवळ व्यसनमुक्तीपुरते मर्यादित नसून, ते एका संपूर्ण पिढीला नवी दिशा देणारे कार्य आहे. त्यांनी हजारो युवकांना नवजीवन दिले, अनेक कुटुंबांचे तुटलेले संसार पुन्हा उभे केले आणि समाजात सकारात्मक बदलही घडवून आणला. आज त्यांच्या अथक प्रयत्नांमुळेच अनेक तरुण शिक्षण, रोजगार आणि सन्मानाचे जीवन जगत आहेत.
धारावीसारख्या आव्हानात्मक परिसरात व्यसनमुक्त समाज घडवण्याचे स्वप्न उराशी बाळगून, अरुण कुंचिकोर गेली अनेक वर्षे निःस्वार्थपणे अविरत कार्य करत आहेत. त्यांची जिद्द, सामाजिक बांधिलकी आणि सेवाभावांमुळे, ते हजारो युवकांचे आज प्रेरणास्थान आहेत. निर्व्यसनी, निरोगी आणि सक्षम तरुणाई घडविण्याचा त्यांचा हा प्रयत्न समाजासाठी आशादायी असून, त्यांच्या कार्यामध्ये अधिकाधिक लोकांचा सहभाग आणि पाठिंबा मिळणे, हीच काळाची गरज आहे. तरुणाई ही आपल्या देशाचे आणि राज्याचे भविष्य आहे. हे भविष्य सुरक्षित करण्याचे राष्ट्रकार्य करणार्या अरुण कुंचिकोर यांना, भविष्यातील वाटचालीसाठी दै. ’मुंबई तरुण भारत’कडून शुभेच्छा!