मुंबई : (Taj Mahal Tejo Mahalaya Petition) आग्रा येथील ताजमहाल हा प्रत्यक्षात भगवान शिवांना समर्पित ‘तेजो महालय’ असल्याचा दावा करत इलाहाबाद उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली आहे. याचिकाकर्त्यांनी ताजमहाल हा ‘तेजो महालय’ असल्याच्या समर्थनार्थ १०९ हिंदू प्रतीके असल्याचा दावा न्यायालयासमोर मांडला आहे. तसेच, ताजमहालातील कथित हिंदू प्रतीकांची तपासणी करण्यासाठी सर्वेक्षण करण्यास नकार देणाऱ्या आग्रा येथील कनिष्ठ न्यायालयाच्या आदेशालाही या याचिकेत आव्हान देण्यात आले आहे.
ही याचिका भगवान श्री अग्रेश्वर महादेव नागनाथेश्वर विराजमान यांच्या वतीने अॅड. हरिशंकर जैन, रंजना अग्निहोत्री यांच्यासह पाच जणांनी दाखल केली. अॅड. हरिशंकर जैन हे वाराणसीतील ज्ञानवापी मशिदीशी संबंधित प्रकरणात हिंदू पक्षाची बाजू मांडल्यामुळे परिचित आहेत. या प्रकरणाची सुरुवात २०१५ मध्ये झाली होती. त्यावेळी आग्रा येथील दिवाणी न्यायालयात दावा दाखल करून ताजमहाल परिसर हा प्रत्यक्षात ‘तेजो महालय’ अथवा तेजोलिंग महादेव मंदिर असून तेथे भगवान महादेव नागनाथेश्वर विराजमान असल्याचा दावा करण्यात आला होता. तसेच हिंदूंना ताजमहाल परिसरात पूजा करण्याची परवानगी द्यावी, अशी मागणीही करण्यात आली होती.(Taj Mahal Tejo Mahalaya Petition)
त्यानंतर २०१९ मध्ये याचिकाकर्त्यांनी पुन्हा अर्ज दाखल करून ताजमहालाची प्रत्यक्ष पाहणी करण्यासाठी तसेच त्याच्या रचनेचे छायाचित्रण आणि व्हिडिओ चित्रण करण्यासाठी न्यायालयाने ॲडव्होकेट कमिशनर नियुक्त करावा, अशी मागणी केली होती. मात्र, ताजमहालाची ओळख सिद्ध करणारे महसूल अभिलेख (रेव्हेन्यू रेकॉर्ड) सादर करण्यात याचिकाकर्ते अपयशी ठरल्याचे नमूद करत न्यायालयाने ही मागणी फेटाळून लावली होती.(Taj Mahal Tejo Mahalaya Petition)
'मास मीडिया' या विषयातून पदवीपर्यंतचे शिक्षण पूर्ण.'कम्युनिकेशन ॲण्ड जर्नालिझम' विषयातून पदव्युत्तरपर्यंतचे शिक्षण पूर्ण. सध्या दै.'मुंबई तरुण भारत'मध्ये वेब उपसंपादक म्हणून कार्यरत. लिखाण, संगीत, वाचन, फोटोग्राफी, इ.ची आवड.लिवोग्राफी भाषाशैलीत विशेष प्रावीण्य.बालपणापासून रा.स्व.संघाचा स्वयंसेवक