शैलीदार नाट्यदिग्दर्शिका : विजया मेहता

    05-Jul-2026
 
 
Vijaya Mehta
 
मराठी आणि हिंदी नाट्य-चित्रपटसृष्टीतील सिद्धहस्त दिग्दर्शिका विजया मेहता यांनी तमाशा, दशावतारसारख्या लोककलांनाही रंगभूमीवर मानाचे पान मिळवून दिले. बाईंनी दिग्दर्शित केलेल्या ‘अजब न्याय वर्तुळाचा’, ‘नागमंडल’ आणि ‘हयवदन’ यांसारख्या नाटकांतून मराठी रंगभूमीवर लोकरंगभूमीचा कलाविष्कार सादर झाला. ‘अपना उत्सव’च्या निमित्ताने बाईंशी ८०च्या दशकात परिचय झालेल्या प्रा. डॉ. प्रकाश खांडगे यांनी लोककलांना रंगभूमीशी एकरुप करणार्‍या विजया मेहता यांच्या कलाक्षेत्रातील योगदानाचा घेतलेला हा मागोवा...
 
मराठी रंगभूमीच्या, तसेच चित्रपटांच्या इतिहासात एक प्रतिभावान आणि शैलीदार नाट्य व चित्रपट दिग्दर्शिका म्हणून विजया मेहता यांनी आपला स्वतंत्र ठसा उमटविला. ‘बाई’ या नामाभिधानाने प्रसिद्ध असलेल्या विजयाबाई नाना पाटेकर, विक्रम गोखले, नीना कुलकर्णी, दिलीप कुलकर्णी, चित्रा पालेकर, भारती आचरेकर, मंगेश कुलकर्णी अशा अनेकांच्या मार्गदर्शक होत्या. विजयाबाईंशी माझा प्रत्यक्ष परिचय ८०च्या दशकात झाला, जेव्हा देशात ‘भारत महोत्सव’ आणि ‘अपना उत्सव’चे वारे वाहू लागले होते.
 
त्या उत्सवाच्या सर्जनशील संचालिका आणि दिग्दर्शिका खुद्द विजयाबाई होत्या. त्यानिमित्ताने ‘टाटा थिएटर्स’मध्ये अनेक बैठकांचे आयोजन होत असे. मी आणि अशोक परांजपे आम्ही दोघे लोककलांच्या संदर्भातील मार्गदर्शन करीत होतो, तर दक्षिण मध्य सांस्कृतिक केंद्राचे संचालक म्हणून प्राध्यापक कमलाकर सोनटक्के कार्यरत होते. तो काळ लोककलांच्या आणि लोककलावंतांच्या राष्ट्रीय जागृतीचा आणि पुनरुत्थानाचा काळ होता.
 
विजयाबाई ‘गेटवे ऑफ इंडिया’वर लोककलावंतांच्या कार्यक्रमांच्या तालमी घेत असत आणि त्यांना चित्रा पालेकर साहाय्य करीत. त्यावेळी लोककला मूळच्या म्हणजेच, ‘रस्टिक’ (ग्रामीण/कच्च्या) स्वरूपात सादर व्हाव्यात, असा माझा आणि अशोक यांचा आग्रह असे. मात्र, विजयाबाईंचे मत थोडे वेगळे होते. अभिजन वर्गातील व नागरी समाजातील मंडळींना या ‘अपना उत्सव’च्या निमित्ताने पारंपरिक लोककलांचा प्रथमच परिचय होत आहे. त्यामुळे त्या जशाच्या तशा मांडण्याऐवजी नेत्रसुखद आणि प्रेक्षणीय झाल्या पाहिजेत, असा विजयाबाईंचा आग्रह असे. त्या आपल्या निर्णयावर ठाम असत. त्या हसत-हसत माझ्या खांद्यावर हात ठेवून सांगत, "खांडगेजी, मी सांगते तसंच करूया.”त्यांनी आपल्या प्रतिभेने आणि शैलीदार नाट्यकौशल्याने लोककलांना कमालीचे दर्शनीय व नेत्रसुखद केले आणि सर्व मुंबईकरांनी त्याचा मनमुराद आनंद लुटला.
 
मुरबाड तालुयातील राजन वैद्य यांच्या नेतृत्वाखालील आदिवासींचे ढोल नृत्य, तारपा नृत्य आणि टाकळा नृत्य विजयाबाईंनी अत्यंत शिस्तीत बसवून घेतले. रांगोळीला आकार द्यावा, तसा आकार त्यांनी या नृत्यांना दिला. वर्तुळाकार, अर्धवर्तुळाकार आणि एकमेकांच्या कमरेत हात घातलेले आदिवासी बांधव जणू काही फुलांची रांगोळीच! विजयाबाईंनी ही ‘रांगोळी’ ‘अपना उत्सव’च्या मुख्य समारंभात उभी केली. आकाराम कोळेकर आणि सय्यप्पा तातोबा बंडगर यांचे ‘धनगरी गजे ढोल नृत्य’देखील विजयाबाईंनी अतिशय दिमाखदार पद्धतीने सादर केले. रणशिंगवाल्यांची तालीम तर विजयाबाई दिवस-दिवसभर घेत असत. त्यांनी या कामाला अक्षरशः स्वतःला झोकून दिले होते. त्यावेळी त्यांची रंगभूमी आणि लोकरंगभूमीवरील निष्ठा मी प्रत्यक्ष अनुभवली.
 
‘अपना उत्सव’च्या या भव्य समारंभाचे मुंबई दूरदर्शनवरून थेट प्रक्षेपण झाले होते. त्याचे हिंदीतून वार्तांकन करण्याचे भाग्य विश्वनाथ सचदेव यांना, इंग्रजीतून प्रताप शर्मा यांना, तर मराठीतून मला लाभले होते. त्यावेळी आम्ही मुक्तकंठाने विजयाबाईंची प्रशंसा केली होती. राजस्थानचा कोहिनूर ‘लांगा’ गायकी, छत्तीसगढच्या तीजनबाई, महाराष्ट्रातील गोंधळमहर्षी राजारामबापू कदम, तसेच भांगडा, छाऊ, बिहू अशा अनेक लोकनृत्यांना नयनरम्य करण्याचे अतिशय मोठे काम दिग्दर्शिका म्हणून विजयाबाईंनी केले. मराठी आणि हिंदी नाट्य-चित्रपटसृष्टीत सिद्धहस्त दिग्दर्शिका असणार्‍या विजयाबाईंचा हा ‘परिसस्पर्श’ भारतीय लोककलांना लाभला.
 
‘अपना उत्सव’च्या आधी, म्हणजेच ७०-८०च्या दशकात एकूणच भारतीय रंगभूमीवर लोककलांच्या पुनरुत्थानाचे आणि त्यांच्या रंगमंचीय उपयोजनाचे वारे वाहू लागले होते. ईशान्य भारतातील आंतरराष्ट्रीय कीर्तीचे नाट्यदिग्दर्शक रतन थियाम, कर्नाटकातील डॉ. गिरीश कर्नाड, डॉ. चंद्रशेखर कंबार, पश्चिम बंगालमधील शंभू मित्र, छत्तीसगढचे हबीब तन्वीर आणि महाराष्ट्रातील डॉ. जब्बार पटेल, डॉ. सतीश आळेकर, डॉ. विजया मेहता, अशोक परांजपे, प्राध्यापक कमलाकर सोनटक्के व पुरुषोत्तम बेर्डे अशा दिग्गज मंडळींनी लोककलांचा चपखल वापर करून भारतीय रंगमंचाला एक वेगळीच समृद्धी प्राप्त करून दिली. त्यात विजयाबाईंचे योगदान खूप मोठे होते.
 
विजयाबाईंनी दिग्दर्शित केलेल्या ‘अजब न्याय वर्तुळाचा’, ‘नागमंडल’ आणि ‘हयवदन’ या नाटकांनी मराठी रंगभूमीवर लोकरंगभूमीचे एक समृद्ध युग निर्माण केले. ‘घाशीराम कोतवाल’, ‘महानिर्वाण’, ‘आयएनटी’चे सुरेश चिखले आणि अशोक परांजपे यांचे ‘खंडोबाचं लगीन’ व ‘जांभूळ आख्यान’ आदी नाटकांनी ७०च्या दशकापासून ९०च्या दशकापर्यंत एक स्वतंत्र कालखंड निर्माण केला. यात रत्नाकर मतकरी यांच्या ‘लोककथा ७८’ या नाटकाचाही प्रामुख्याने उल्लेख करावा लागेल.
 
विजयाबाईंवर जर्मन नाट्यदिग्दर्शक बर्टोल्ड ब्रेख्त (Bertolt Brecht) यांचा मोठा प्रभाव होता. कारण ब्रेख्त यांनी ‘विलगवाद’(Alienation Effect) आणि ‘समग्र रंगभूमी’(Total Theatre) हे दोन महत्त्वाचे सिद्धांत जागतिक रंगभूमीला दिले. हाच संस्कार विजयाबाईंवर होता. त्यांचे ‘अजब न्याय वर्तुळाचा’ हे नाटक महाराष्ट्राच्या ‘तमाशा’ या लोककलेवर आधारित होते. तमाशातील मुक्तपणाचा स्वीकार त्यांनी या नाटकात केला.
 
जन्म देणारी आई श्रेष्ठ की, पालनपोषण करणारी आई श्रेष्ठ? या चक्रव्यूहावर आधारित चिं. त्र्यं. खानोलकर यांच्या नाट्यलेखनातील बारकावे शोधून विजयाबाईंनी हे नाटक केवळ भारतातच नव्हे, तर परदेशातही लोकप्रिय केले. ब्रेख्त यांच्या ‘कॉकेशियन चॉक सर्कल’ (The Caucasian Chalk Circle) या मध्यवर्ती कल्पनेतून ‘अजब न्याय वर्तुळाचा’ उभे राहिले.
 
नाट्याशयावर शैली स्वार झाल्यावर मूळ आशयाचा आत्मा हरवतो का? हा प्रश्न ‘अजब न्याय’च्या निर्मितीच्या वेळी विचारला गेला; पण यासंदर्भात प्रत्येक प्रतिभावान नाट्यदिग्दर्शकाचे किंवा दिग्दर्शिकेचे मत वेगळे असू शकते. प्रत्यक्ष कला आणि कलाकुसर हे दोन्हीही व्यक्तिसापेक्ष व प्रतिभासापेक्ष विषय आहेत. नाट्याशयासाठी लोककलांचे उपयोजन हे अपरिहार्य असावे लागते आणि ती अपरिहार्यता सिद्धही व्हावी लागते.
 
जर्मन दिग्दर्शक फ्रिट्झ बेनेविट्झ (Fritz Bennewitz) आणि विजयाबाई यांनी ‘अजब न्याय’वर एकत्र काम केले होते. या नाटकाची मांडणी एखाद्या लोककथेसारखी म्हणजेच, ‘एक होतं आटपाट नगर...’ अशी होती.
 
नाटकाची कथा : एकदा एका राज्यात बंड होते. जीवाच्या भीतीने घाबरलेली राणी आपल्या तान्ह्या बाळाला मागे सोडून पळून जाते. तिची दासी त्या राजपुत्राला लपवून दूर आपल्या गावी घेऊन जाते आणि त्याचे पालनपोषण करते. पुढे बंड संपते, राणी राज्यात परत येते आणि आपले बाळ परत मागते. एका फिरत्या न्यायालयाचा न्यायाधीश याचा निवाडा करतो आणि निर्णय देतो की, जिने बाळाची अहोरात्र निगराणी करून त्याला वाढवले, तीच त्याची खरी आई! बाळ अखेर त्या दासीला मिळते. ‘कसेल त्याची जमीन’ या साम्यवादी तत्त्वज्ञानाशी या नाटकाची नाळ जुळते.
 
या नाटकाला लागणारी अभिनयशैली लोकनाट्याच्या अंगाला पोषक असणार्‍या शैलीची मागणी करते. या अभिनयशैलीतून जसे वास्तवाचे दर्शन घडविले जाते, तसेच वास्तवाच्या पलीकडे असलेल्या ‘अतिवास्तवाला’ (Surrealism) स्पर्श करण्याचे सामर्थ्यही मिळते. ‘अजब न्याय वर्तुळाचा’ हे नाटक कधी ‘रिअलिस्टिक’ (वास्तवादी), तर कधी ‘नॉन-रिअलिस्टिक‘ (अवास्तवादी) शैलीची मागणी करते आणि ते विजयाबाईंनी अचूक साध्य केले आहे. एकाच शैलीतून हे नाटक अनुभवविश्व रंगमंचावर साकारण्यास असमर्थ ठरले असते, म्हणूनच त्यात ‘शैलीबाहुल्य’ आले आहे. हे नाटक समग्र रंगभूमी आणि परात्मभाव रंगभूमीचे (Epic Theatre) एक उत्तम उदाहरण आहे.
 
विजयाबाईंचे दुसरे मैलाचा दगड ठरलेले नाटक म्हणजे ‘हयवदन’. ‘हयवदन’मध्ये तळकोकणातील ‘दशावतार’ या लोककलेतील पूर्वरंगातील पालखीचा उत्तम उपयोग केला गेला आहे. त्यासाठी विजयाबाईंनी तुळशी बेहरे या दशावतारी अभ्यासकाची मदत घेतली होती. हे नाटक मुळात कन्नड भाषेतील असून, गिरीश कर्नाड यांनी ते लिहिले आहे. या नाटकाचा मराठी अनुवाद १९७३ मध्ये प्रसिद्ध झाला आणि पुढे १९८४ मध्ये विजयाबाईंनी ‘हयवदन’ दिग्दर्शित केले.
 
कर्नाड यांच्या ‘हयवदन’ची मूळ शैली कर्नाटकातील ‘यक्षगान’ या लोककलेची आहे. ‘हयवदन’ म्हणजे अश्वमुखी प्राणी (घोड्याचे तोंड असलेला माणूस). ‘कथासरित्सागर’ आणि ‘वेताळपंचविशी’ हा या नाटकाचा मूळ कथाधार आहे. हे नाटक म्हणजे शक्ती आणि बुद्धी यांच्यातील द्वंद्व आहे. कथेचे वातावरण ऐतिहासिक आणि वास्तव यांच्या सीमारेषेवर रेंगाळत ठेवले आहे. ‘हयवदन’ अखेर कालीमातेच्या आशीर्वादाने पूर्ण घोडा बनतो. या नाटकात पारंपरिक मूल्यांना मान्यता दिलेली असली, तरी त्याचबरोबर त्या मूल्यांविषयी प्रश्नही उपस्थित केलेले दिसतात.
 
नाटकाच्या प्रारंभी ‘दशावतारा’तील पालखी निघते. ताशा आणि झांजांच्या आवाजात संपूर्ण वातावरण ऊर्जापूर्ण होते. ‘दशावतारा’च्या पालखीतील ‘गंगा, सिंधू, सरस्वती’ या मंगलाष्टकांनी वातावरण भारून जाते. बी. व्ही. कारंथ यांनी दिग्दर्शित केलेल्या ‘हयवदन’शी या मराठी ‘हयवदन’ची तुलना करण्याचा प्रयत्नही काहींनी केला; पण विजयाबाईंच्या प्रतिभेवर रसिकांचा ठाम विश्वास कायम राहिला आणि मराठी ‘हयवदन’ला प्रचंड यश लाभले.
 
डॉ. प्रभाकर मांडे यांनी संपादित केलेल्या ‘लोककला आणि नागरी रंगभूमी’ या पुस्तकात डॉक्टर तारा भवाळकर यांनी ‘हयवदन’बद्दल मांडलेले मत अत्यंत महत्त्वाचे आहे. विजयाबाईंनी आणि सतीश आळेकरांनी हे प्रांजळपणे मान्य केले आहे की, "आम्ही शहरी वातावरणातले आहोत, त्यामुळे लोकशैली उचलताना त्यात ‘सोफिस्टिकेशन’ (नागरी सुसंस्कृतपणा/अभिजातता) येणे स्वाभाविक आहे.”
 
एकूणच, विजयाबाईंनी लोकशैलींचा अतिशय चपखल आणि प्रभावी वापर आपल्या नाट्यकृतींमध्ये केला. त्यादृष्टीने केवळ मराठीच नव्हे, तर भारतीय रंगभूमी आणि लोकरंगभूमीच्या इतिहासात विजयाबाईंचे योगदान निर्विवादपणे मैलाचा दगड ठरले. त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली!
 
-प्रा. डॉ. प्रकाश खांडगे 




संबंधित मजकूर