अयोध्येच्या राम मंदिर देणगीतील भ्रष्टाचार प्रकरणी आज उद्धव ठाकरे दादरच्या हनुमान मंदिराबाहेर ‘रामरक्षा आंदोलन’ करणार आहेत. त्यामुळे हिंदुत्वाचा कधीच त्याग केलेल्या उद्धव ठाकरेंची गत म्हणजे ‘करून करून भागले आणि देवपूजेला लागले’ अशीच!
'करून करून भागले आणि देवपूजेला लागले’ अशी मराठीतील एक उक्ती आहे. उद्धव ठाकरे यांना ही उक्ती तंतोतंत लागू पडते. मुंबईत ‘मातोश्री’वर पत्रकार परिषद घेऊन ते म्हणाले, "राममंदिराच्या आंदोलनासाठी कारसेवकांनी सोसलेले अत्याचार, रक्त आणि कष्टाचे भांडवल करून अमर्याद सत्ता भोगणार्या भाजपच्या काळात थेट प्रभू श्रीरामाच्या मंदिरातच दरोडा टाकला जात आहे. हिंदुत्वाचा बुरखा घालून राम मंदिर लुटणार्यांचा पैसा इतर राजकीय पक्ष आणि आमदार-खासदार फोडण्यासाठी वापरला जात आहे. अब हिंदू माफ नहीं करेगा|”
प्रभू श्रीरामाविषयी सर्व भारतीयांच्या मनात प्रचंड श्रद्धा आहे. केवळ हिंदूंच्या मनात आहे, असे नाही. रामानंद सागर यांची ‘रामायण’ मालिका जेव्हा चालू होती, तेव्हा मुस्लीम मोहल्ल्यातील रस्तेदेखील सामसूम असत. म्हणून प्रभू राम म्हणजे भारत, म्हणजे भारतीय प्रजा. सर्व भारतीयांच्या हृदयात ‘राम’ आहे. हिंदूंमधून अन्य धर्मात गेलेले या रामाला प्रगट करीत नाहीत, हिंदू प्रगट करतात, एवढाच फरक आहे. ‘रामकथा’ आवडत नाहीत, असे म्हणणारा माणूस शोधून काढणे कठीण.
प्रभू रामचंद्रांवर अनेक स्तोत्रे लिहिली गेली आहेत. कौशिक ॠषींचे ‘रामरक्षा’ स्तोत्र हे अतिशय प्रसिद्ध आहे. सर्व सुसंस्कारित घरांत त्याचे पठण होते आणि लहानपणी पाठ केलेले जन्मभर लक्षात राहते. उद्धव ठाकरे ‘रामरक्षा’ स्तोत्र म्हणणार आहेत. बालपणी त्यांनी पाठ केले असेल, तर चांगली गोष्ट आहे आणि आता पुस्तक हातात घेऊन म्हणणार असतील, तरीही चांगली गोष्ट आहे. रामाचे स्मरण पुण्यदायीच असते. आपली अशी श्रद्धा आहे की, अंतकाळी रामाचे नाव घ्यावे, त्याने स्वर्गप्राप्ती होते. महात्मा गांधींनी शेवटचा श्वास घेताना ‘हे राम’ म्हटले, असे सांगितले जाते. उद्धव सेनेचा शेवट होत असताना ‘तारक रामनामा’चा नक्कीच उपयोग होईल.
श्रीराम यांची महती सांगणारे अनेक तारक मंत्र आहेत. त्यातील एक तारक मंत्र असा आहे -
राम राम राम राम, नाम तारकम्|
राम कृष्ण वासुदेव, भक्ति मुक्ति दायकम्॥
त्याचा अर्थ होतो, रामाचे नाव भवसागर पार करण्यासाठी तारक आहे. राम, कृष्ण, वासुदेव ही नावे भक्ती-मुक्ती दायक आहेत. रामनामाचा महिमा वर्णन करताना राष्ट्रकवी रामधारी सिंह ‘दिनकर’ यांची कविता लगेचच समोर येते. ती अशी-
राम, तुम्हारा नाम कंठ में रहें,
हृदय, जो कुछ भेजो, वह सहे,
दुख से त्राण नहीं माँगूँ|
माँगू केवल शक्ति दुख सहने की,
दुर्दिन को भी मान तुम्हारी दया
अकातर ध्यानमग्न रहने की|
श्रीरामाचा जन्म अयोध्येत झाला. जन्मस्थानाचे मंदिर पाडून आक्रमक बाबराने त्यावर मशीद बांधली. ‘श्रीराम जन्मभूमी मुक्ती आंदोलना’च्या शेवटच्या टप्प्यात रामभक्त अयोध्येत आले आणि दि. ६ डिसेंबर १९९२ रोजी त्यांनी तो ‘ढाँचा’ उद्ध्वस्त करून टाकला. आता त्या जन्मस्थानावर भव्य राम मंदिर उभे आहे. वर्षभरात करोडो लोक रामललाच्या दर्शनासाठी जातात. अत्यंत श्रद्धेने भक्तिभावाने दान करतात. तेथील सेवकांनी त्याची चोरी केली. ते सर्व पकडले गेले. कायदेशीर प्रक्रिया पूर्ण होऊन त्यांना शासन होईल. चोरी मग घरातील असो वा मंदिरातील असो, ती चोरीच असते किंवा तो अपराधच असतो.
एवढा सरळ-सोपा विषय विकृत राजकारण्यांनी जर स्वीकारला, तर ते राजकारणी कसले? आरोपाचे हवेतील मजले बांधायला त्यांनी सुरुवात केलेली आहे. ‘रामजन्मभूमी न्यासा’चे चंपतराय यांच्यावर गलिच्छ आरोप ठोकले आहेत. का? कारण, ते संघाचे जीवनव्रती प्रचारक आहेत. प्रचारकाचा संसार नसतो. बँक अकाऊंट नसते, स्वत:च्या नावावर शून्य मालमत्ता असते. तो माया, मोह, लोभ, धन याच्या पलीकडे गेलेला असतो. अशा ॠषितुल्य माणसावर आरोप करणे हा अधमपणा आहे. अजूनतरी तो उद्धव ठाकरे यांनी केला नाही, म्हणून त्यांचे कौतुक केले पाहिजे.
उद्धव ठाकरे यांनी भाजपला शत्रुस्थानी मानले आहे. म्हणून, भाजप जे-जे करेल, त्याचा विरोध करायचा हे त्यांचे राजकारण आहे. वाचकांना आठवत असेल की, उद्धव ठाकरे म्हणाले होते की, "जिकडे तिकडे ‘जय श्रीराम, जय श्रीराम’ चाललेले आहे, रामराम नाही; मी त्यांना हरामखोर म्हणतो.” त्यांचे चेले संजय राऊत म्हणाले, "महाराष्ट्रात ‘जय श्रीराम’ नाही चालणार, ‘जय महाराष्ट्र’ चालेल.” राम मंदिराच्या लोकार्पण कार्यक्रमाचे निमंत्रण उद्धव ठाकरे यांना होते; पण ते गेले नाहीत. अजूनही अयोध्येला गेलेले नाहीत. आता आंदोलन करून जाणार आहेत, असे म्हणतात. म्हणून सुरुवातीला जे म्हटले, ‘करून करून भागले आणि राम दर्शनाला लागले’ असे आता म्हटले पाहिजे.
भाजपचा कडवा विरोध करता-करता उद्धव ठाकरे रामभक्त होत चालले आहेत, हेही काही कमी नाही. मध्यंतरी डोक्यावर घातलेल्या गोल टोपीचा कलंक त्यामुळे काहीशा प्रमाणात धुतला जाण्याची शक्यता आहे. रामाची भक्ती दोन प्रकारे करता येते. आपले भक्तिवाङ्मय सांगते की, एक भक्ती सकारात्मक आहे आणि दुसरी नकारात्मक. रावणाची रामभक्ती ही नकारात्मक भक्ती आहे; पण त्यालाही रामाच्या हातूनच मुक्ती मिळाली. म्हणजे तो नरकात गेला नाही, तो स्वर्गात गेला. ‘मारीचा’ने सुवर्ण मृगाचे रूप घेतले आणि रामाला तो खूप दूरवर घेऊन गेला. शेवटी, रामाच्या हातून त्याला मुक्ती मिळाली. आपली परंपरा इतकी महान आहे की, या सर्वांचा आपण आदरच करतो. कोणाचाही द्वेष करीत नाही आणि म्हणतो की, प्रत्येक जण आपापल्या कर्माची फळे भोगत असतो.
उद्धव ठाकरे यांनी २०१९ सालापासून जे कर्म केले, त्याची फळे ते आता भोगत आहेत आणि ‘कर्मफळापासून कोणालाही सुटका नाही,’ हे ‘गीते’चे सांगणे आहे. आता ते रामनाम घेऊन रामाला वंदन करण्यासाठी बाहेर पडणार असतील, तर चांगलीच गोष्ट आहे. अपेक्षा फक्त एवढीच आहे की, एकदा घेतलेले रामनाम मधेच त्यांनी ‘अल्ला-महम्मद’साठी सोडू नये. रामसेवक हनुमंताला रामगद्दारी सहन होत नाही. त्याची गदा कधी डोयावर पडेल, हे सांगता येत नाही.
अयोध्येतील राम मंदिर दानचोरीमध्ये भाजपला गुंतवणे, हे हास्यास्पद आहे. सत्तेवर असलेला कोणताही राजकीय पक्ष असले पाप अजिबात करणार नाही. उद्धव ज्या शिवसेनेत होते, त्या शिवसेनेची ख्याती वसुली, खंडणी, कटमनी अशी आहे. एखाद्या दारुड्याला शांत बसलेला माणूसदेखील दारू पिऊन शांत बसला आहे, असेच वाटते; तसे उद्धव यांचे झाले आहे. स्वत:वरून भाजपची परीक्षा करू नये. भाजपचा वारसा डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी, पंडित दीनदयाळ उपाध्याय, नानाजी देशमुख, कुशाभाऊ ठाकरे, सुंदरसिंग भंडारी, अटल बिहारी वाजपेयी, लालकृष्ण अडवाणी, मनोहर पर्रिकर, रामभाऊ म्हाळगी अशा महान चारित्र्यसंपन्न नेत्यांचा आहे. स्वत:चे जीवन समर्पित करून राष्ट्रकार्य करणे, हा भाजपचा वसा आहे. त्यांच्यावर मंदिरातील धन अपहरण करण्याचा आरोप करणे, याला नाकारण्यासाठी मराठीत योग्य प्रतिशब्द मला सापडत नाही. अधमपणा, नीचपणा वगैरे वगैरे शब्द तोकडे पडतात. उद्धव यांनी हे लक्षात ठेवले पाहिजे.
लोकाभिरामं रणरंगधीरं राजीवनेत्रं रघुवंशनाथम्| (‘रामरक्षा’तील ही ओळ आहे.) असा राम उद्धव यांना योग्य ती बुद्धी देवो, अशी प्रार्थना करूया!
९८६९२०६१०१