सातासमुद्रापार पंडवानी लोककला पोहोचवणाऱ्या डॉ. तीजन बाई यांचे निधन

    05-Jul-2026
Dr. Teejan Bai Passes Away
 
मुंबई : (Dr. Teejan Bai Passes Away) छत्तीसगडची पारंपारिक लोककला 'पंडवानी'ला जगभरात नवी ओळख मिळवून देणाऱ्या ज्येष्ठ गायिका पद्मविभूषण डॉ. तीजन बाई यांचे रविवार दि. ५ जुलैच्या पहाटे निधन झाले. वयाच्या ७० व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. रायपूर येथील एम्मस हॉस्पीटलमध्ये त्यांच्यावर उपचार सुरु होते. उपचारादरम्यान त्यांचे निधन झाल्याची माहिती डॉक्टरांनी दिली.
 
१९५६ मध्ये छत्तीसगडच्या दुर्ग जिल्ह्यातील गनियारी गावात तीजन बाईंचा जन्म झाला. वयाच्या अवघ्या १३ व्या वर्षी पंडवानी सादरीकरणाला सुरुवात केली. तीजन बाईंनी महाभारतातील कथा, विशेषतः 'भीम' या पात्राचे शौर्य आपल्या अनोख्या कापालिक शैलीत आणि पहाडी आवाजात जिवंत केले. सादरीकरण करताना त्यांच्या हातातील 'तंबोरा' हा केवळ एक वाद्य न राहता कधी भीमाची गदा, कधी अर्जुनाचा धनुष्य तर कधी द्रौपदीचे केस बनायचा. त्यांच्या या अद्वितीय अभिनय आणि सादरीकरण कौशल्याने जगभरातील रसिकांना भुरळ घातली होती. श्याम बेनेगल यांच्या 'भारत एक खोज' या प्रसिद्ध दूरदर्शन मालिकेतही त्यांनी आपल्या कलेची छाप सोडली होती. तीजन बाई यांच्या निधनानंतर संपूर्ण देशभरात हळहळ व्यक्त केली जात आहे.(Dr. Teejan Bai Passes Away)
 
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोशल मीडियावर भावना व्यक्त करत त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे. एक्सवर पोस्ट करत त्यांनी लिहिले, "सुप्रसिद्ध पंडवानी गायिका तीजन बाई यांच्या निधनाने मला खूप दुःख झाले आहे. त्यांनी छत्तीसगढच्या या लोककलेला त्यांच्या भव्य सादरीकरणातून जगभरात एक वेगळी ओळख मिळवून दिली. त्यांच्या निधनानंतर कला व संस्कृतीच्या क्षेत्रात एक पोकळी निर्माण झाली आहे. त्यांचे जाण्याने कला व संस्कृतीच्या क्षेत्रातील जे नुकसान झाले आहे, ते नुकसान कधीही निघणार नाही", असे म्हणत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी तीजन बाईंना श्रद्धांजली वाहिली. भारतीय लोककलेतील त्यांच्या योगदानासाठी भारत सरकारने त्यांना विविध पुरस्कारांनी सन्मानित केले होते. त्यांना भारत सरकारकडून १९८७ मध्ये पद्मश्री, २००३ मध्ये पद्मभूषण आणि २०१९ मध्ये 'पद्मविभूषण' या सर्वोच्च नागरी पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले होते.(Dr. Teejan Bai Passes Away)
 
 




संबंधित मजकूर