मुख्यमंत्रीपदाच्या हव्यासात उद्धव ठाकरेंनी पक्ष गमावला - नवनाथ बन

    05-Jul-2026
 
Navnath Ban on Uddhav Thackeray
 
मुंबई : (Navnath Ban on Uddhav Thackeray) भाजपचे प्रदेश मुख्य प्रवक्ते नवनाथ बन यांनी उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांच्यावर टीका करताना म्हटले की," संजय राऊत यांनी सांगितलेली म्हाताऱ्याची कथा ही उद्धव ठाकरे यांच्यासाठी तंतोतंत लागू होते. मुख्यमंत्रीपदाच्या हव्यासापोटी उद्धव ठाकरे यांनी हिंदुत्वाचा त्याग केला, बाळासाहेब ठाकरे यांचे विचार सोडले आणि शेवटी त्यांच्या हाती काहीच लागले नाही.या राजकीय निर्णयांमुळे पक्षातील खासदार, आमदार आणि नगरसेवक मोठ्या प्रमाणावर दूर गेले असून पक्षाची मोठी हानी झाली आहे. मुख्यमंत्रीपदासाठी केलेल्या राजकारणाचा परिणाम म्हणून उद्धव ठाकरे यांच्याकडे आज केवळ राजकीय नुकसानच उरले आहे."
 
रविवार दि.५ रोजी आयोजित पत्रकार परिषदेत बन बोलत होते.
 
" राम मंदिराशी संबंधित प्रकरणात जे कोणी दोषी असतील त्यांच्यावर कठोर कारवाई होईल आणि प्रत्येक पैशाचा हिशोब घेतला जाईल. भारतीय जनता पक्षाचा या प्रकरणाशी कोणताही संबंध नाही. संजय राऊत यांनी भाजपवर आरोप करण्याऐवजी स्वतःच्या राजकीय इतिहासाचा आढावा घ्यावा. रामरक्षा आंदोलन करण्यापेक्षा पक्षरक्षा, आमदाररक्षा आणि उद्धवजी रक्षा आंदोलन करा, त्याचीच तुम्हाला अधिक गरज आहे." असेही बन म्हणाले.
 
नवनाथ बन यांनी संजय राऊत यांच्या वक्तव्यांवर टीका करत, प्रभू श्रीराम आणि सीतामातेबाबत बोलण्याचा नैतिक अधिकार त्यांना नसल्याचा आरोप केला.
" ज्या काँग्रेसने प्रभू श्रीरामांच्या अस्तित्वावर प्रश्न उपस्थित केले, त्याच काँग्रेससोबत राजकीय भूमिका घेतल्यानंतर रामभक्तीचा आव आणणे योग्य नाही. महाराष्ट्रातील जनतेने त्यांचे राजकारण वारंवार नाकारले असून येणाऱ्या काळातही जनता अशाच प्रकारे योग्य निर्णय देईल." असा विश्वासही बन यांनी व्यक्त केला.(Navnath Ban on Uddhav Thackeray)
 
"महाभारतातील पात्रांचा उल्लेख करून राजकीय टीका करण्यापेक्षा स्वतःच्या भूमिकेचे राऊत यांनी आत्मपरीक्षण करावे. महाराष्ट्रातील जनतेने अनेक निवडणुकांमधून त्यांना योग्य उत्तर दिले असून भविष्यातही जनता लोकशाही मार्गानेच निर्णय देईल." असा विश्वास बन यांनी व्यक्त केला.(Navnath Ban on Uddhav Thackeray)
 
 
 




संबंधित मजकूर