
मुंबई : मानखुर्दमध्ये तीन मजली बांधकाम कोसळून सहा जणांचा मृत्यू झाला असून
या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे. पोलीस प्रशासन, अग्निशामक दल आणि मुंबई
महापालिकेचे कर्मचारी दाखल झाले असून घटनास्थळी बचावकार्य सुरु आहे.
जेसीबीच्या सहाय्याने ढिगारा उपसण्याचे काम सुरू आहे.
एनडीआरएफची टीम देखील घटनास्थळी पोहोचली आहे. ढिगाऱ्याखाली अडकलेल्या
नागरिकांना काढण्यासाठी बचावकार्य सुरू आहे. दुर्घटना मोठी असल्याने
प्रशासनाचं मोठं पथक घटनास्थळी दाखल झाले आहे. स्थानिक नागरिकांच्या मदतीने
ढिगाऱ्याखाली अडकलेल्यांना बाहेर काढलं जात आहे. जखमींना तातडीने
रुग्णवाहिकेतून रुग्णालयात नेलं जात आहे.
युद्ध पातळीवर बचावकार्य सुरु, 6 जणांचा मृत्यू
घटनेची माहिती मिळताच पोलीस, अग्निशामक दलाचे जवान, एनडीआरएफचे पथक आणि मुंबई
महापालिकेचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. घटनास्थळी रुग्णवाहिका देखील झाली.
घटनेचं गांभीर्य ओळखून प्रशासनाचे कर्मचारी घटनास्थळी मोठ्या संख्येने दाखल
झाले. युद्ध पातळीवर शोध मोहीम राबवण्यास सुरुवात झाली. या दुर्घटनेत
एकामागेएक अशा आतापर्यंत सहा जखमींना बाहेर काढण्यात आलं आहे. सर्व सहा जणांचा
मृत्यू झाल्याची माहिती आहे.
पावसामुळे बचावकार्यास अडचणी
घटनेतील जखमींना मुंबईतील शताब्दी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. पण
डॉक्टरांनी तपासल्यानंतर सहा जणांचा मृत्यू झाल्याची घोषणा केली. शताब्दी
रुग्णालयाचे AMO डॉक्टर पटेल यांनी अधिकृतपणे याबाबत माहिती दिली आहे. अजूनही
बचावकार्य सुरु आहे. पण सध्या मुसळधार पाऊस सुरु असल्याने बचावकार्यास अडचणी
येत आहे.