मुंबई : (Mumbai Mayor Ritu Tawde) मुंबई महानगरात सुरू असलेल्या मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर आणि दुपारी २:५० वाजता समुद्राला तब्बल ४.२६ मीटर उंच भरती आल्याने निर्माण झालेल्या परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी मुंबईच्या महापौर रितू तावडे यांनी शनिवारी (४ जुलै) धर्मवीर, स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराज किनारी रस्ता (दक्षिण) परिसराला भेट देऊन पाहणी केली.
पाहणीदरम्यान महापौरांनी संबंधित अधिकाऱ्यांकडून परिस्थितीची माहिती घेतली तसेच सुरक्षेच्या उपाययोजनांचा आढावा घेतला. मुसळधार पाऊस आणि उंच भरतीमुळे समुद्रकिनारी धोकादायक परिस्थिती निर्माण झालेली असतानाही वरळी परिसरात काही नागरिक समुद्रकिनारी तसेच संरक्षण कठड्यांवर बसलेले दिसून आले. (Mumbai Mayor Ritu Tawde)
यावेळी महापौर रितू तावडे यांनी नागरिकांशी संवाद साधत तातडीने सुरक्षित स्थळी जाण्याचे आवाहन केले. महानगरपालिका आणि पोलिस प्रशासनाने वारंवार दिलेल्या इशाऱ्यांकडे दुर्लक्ष करू नये, असे सांगत त्यांनी मुसळधार पावसात अनावश्यक घराबाहेर पडू नये आणि समुद्रकिनाऱ्यापासून दूर राहावे, असे स्पष्ट केले. (Mumbai Mayor Ritu Tawde)
"समुद्राच्या प्रचंड लाटा धडकत असताना किनाऱ्यावर जाणे किंवा कठड्यांवर बसून समुद्र पाहणे अत्यंत धोकादायक आहे. नागरिकांनी स्वतःच्या आणि कुटुंबाच्या सुरक्षिततेला प्राधान्य द्यावे," असे आवाहन महापौरांनी केले. (Mumbai Mayor Ritu Tawde)