मुंबई : (Mumbai Bullet Train Tunnel) मुंबई–अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पाच्या उभारणीत महत्त्वाचा टप्पा गाठत विक्रोळी येथून देशातील रेल्वे बोगदा बांधकामासाठी वापरण्यात येणाऱ्या सर्वात मोठ्या टनेल बोरिंग मशीन (टीबीएम)द्वारे भुयारी बोगद्याच्या उत्खननास सुरुवात झाली. रविवार दिनांक 5 जुलै रोजी या कामात सुरुवात करण्यात आली.
अत्याधुनिक मिक्सशिल्ड तंत्रज्ञानावर आधारित हे यंत्र मुंबईतील दाट लोकवस्ती, बहुमजली इमारती, रस्ते आणि मिठी नदीखालून सुरक्षितपणे बोगदा खोदणार असून प्रकल्पाच्या अंमलबजावणीला मोठी गती मिळणार आहे. मुंबईतील सावली (घणसोली) ते वांद्रे-कुर्ला कॉम्प्लेक्स (बीकेसी) दरम्यानच्या 21 किमी भूमिगत बोगद्यापैकी 16 किमी लांबीचा भाग टीबीएमद्वारे तयार केला जाणार आहे. विक्रोळी येथून सुरू झालेले हे यंत्र बुलेट ट्रेनच्या अप आणि डाउन मार्गासाठी 6 किमी लांबीच्या सिंगल ट्यूब आकाराच्या बोगद्याचे उत्खनन करणार आहे.
13.6 मीटर व्यास, 3,100 टन वजन आणि 96 मीटर लांबीचे हे टीबीएम भारतातील रेल्वे बोगदा बांधकामासाठी वापरण्यात आलेल्या सर्वात मोठ्या यंत्रांपैकी एक आहे. या यंत्राचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे उत्खननासोबतच काँक्रीट सेगमेंट रिंगची बसवणीही एकाच वेळी केली जाते. त्यामुळे बोगद्याची सुरक्षितता वाढते आणि कामाचा वेगही लक्षणीयरीत्या वाढतो.
या प्रकल्पासाठी 77 हजार काँक्रीट सेगमेंट्सच्या साहाय्याने 7,700 टनेल रिंग तयार केल्या जात असून संपूर्ण बोगदा जलरोधक राहील, यासाठी अत्याधुनिक सीलिंग तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला आहे. (Mumbai Bullet Train Tunnel)
बोगदा खोदकामादरम्यान सुरक्षितता सुनिश्चित करण्यासाठी जमिनीतील हालचाल, कंपन आणि संरचनांवरील परिणामांचे रिअल-टाइम निरीक्षण करणारी अत्याधुनिक मॉनिटरिंग प्रणालीही कार्यान्वित करण्यात आली आहे. त्यामुळे मुंबई–अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पाच्या सर्वात आव्हानात्मक टप्प्याला आता प्रत्यक्ष वेग मिळाला आहे. (Mumbai Bullet Train Tunnel)
मूळची अहिल्यानगर येथील. 'राज्यशास्त्र' विषयातील पदवी. रानडे इन्स्टिट्यूट मधून (सा.फु.पुणे विद्यापीठ) 'एमजेएमसी' विषयात पदव्युत्तर शिक्षण. २०१९मध्ये मुंबई तरुण भारतमध्ये 'मंत्रालय प्रतिनिधी' या पदावर रुजू. सद्यस्थितीत 'इन्फ्रास्ट्रक्चर आणि डेव्हलपमेंट' विशेष प्रतिनिधी म्हणून कार्यरत. राज्यातील पायाभूत सुविधांविषयी फिल्ड रिपोर्ट आणि लेखनात रस.