मुंबई : (Mahabaleshwar Landslide) सातारा जिल्ह्यातील महाबळेश्वर तालुक्यात नावली गावातील वरच्या बाजूचा काही भाग शनिवार दि.४ रोजी सकाळी झालेल्या अतिवृष्टीमुळे खचला. झाडासह काही भाग रस्त्यावर वाहून मलबा रस्त्यावर आला आहे. मलबा हटवण्याचे काम सुरू आहे, प्रशासन सर्व बाबतीत बारकाईने लक्ष ठेवून कार्यवाही करीत आहे. गावाला कोणत्याही प्रकारचा धोका नाही.
याबाबत वृत्तवाहिनीवर प्रसारित झालेल्या वृत्तामुळे राज्य आपत्ती व्यवस्थापन विभागाने वस्तुस्थिती असणारी माहिती पाठवली आहे.प्रशासन सर्व बाबींवर लक्ष ठेवून असून कोणीही अफवा पसरू नये तसेच नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.
नावली गावातील वरच्या बाजूस असणारा जमिनीचा काही भाग झाडासह अतिवृष्टीमुळे खचून त्याचा मलबा थेट रस्त्यावर वाहून आला. त्या बाजूस सदर गावची पाण्याची टाकी आहे. या घटनेनंतर प्रशासन अलर्ट मोडवर असून तात्काळ या ठिकाणचा मलबा हटवण्याचे काम सुरू आहे.
जिल्हाधिकारी संतोष पाटील यांच्या निर्देशानुसार पाण्याच्या टाकीची सार्वजनिक बांधकाम विभाग आणि ग्रामीण पाणीपुरवठा विभागाचे अभियंते प्रत्यक्ष पाहणी करत आहेत, सुरक्षिततेच्या दृष्टीने पुढील योग्य ती कारवाई करण्याबाबत त्यांना निर्देशित करण्यात आले आहे.(Mahabaleshwar Landslide)
प्रशासकीय यंत्रणा घटनास्थळी दाखल असून या विभागाचे प्रांताधिकारी डॉ योगेश खरमाटे यांनीही येथे भेट देऊन पाहणी केली आहे व आवश्यक सूचना दिलेले आहेत.(Mahabaleshwar Landslide)
या ठिकाणापासून जवळच चार घरे असून एक घर पूर्णतः बंद आहे. तर तीन घरातील लोकांना समजावून त्यांना सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित करण्यात येत आहे. तसेच नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये, तहसीलदार सचिन मस्के यांनी सांगितले आहे.(Mahabaleshwar Landslide)