मुसळधार पावसाने प्रशासन सतर्क; मंत्री गिरीश महाजनांची आपत्ती नियंत्रण कक्षाला भेट

आपत्ती यंत्रणांना सतर्कतेच्या सूचना

    05-Jul-2026
 
Heavy Rain
 
मुंबई : (Heavy Rain) राज्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर आणि हवामान विभागाने मुंबई, ठाणे, पालघर, रायगड, पुणे आदी जिल्ह्यांसाठी रेड अलर्ट जारी केल्यानंतर आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन यांनी शनिवार, दि.४ जुलै रोजी मंत्रालयातील राज्य आपत्ती व्यवस्थापन कक्ष तसेच मुंबई महानगरपालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन नियंत्रण कक्षाला भेट देऊन परिस्थितीचा सविस्तर आढावा घेतला. नागरिकांच्या सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य देत सर्व यंत्रणांनी पूर्ण क्षमतेने सज्ज राहून कोणत्याही आपत्कालीन परिस्थितीत तात्काळ आणि प्रभावी प्रतिसाद द्यावा, अशा स्पष्ट सूचना त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या.
 
मंत्रालयातील राज्य आपत्ती व्यवस्थापन कक्षात झालेल्या बैठकीत मंत्री महाजन यांनी राज्यभरातील पावसाची सद्यस्थिती, पुढील काही दिवसांचा हवामानाचा अंदाज, संभाव्य धोके तसेच जिल्हास्तरावरील प्रशासनाने केलेल्या तयारीचा आढावा घेतला. विशेषतः हवामान विभागाने रेड अलर्ट घोषित केलेल्या मुंबई, पालघर, ठाणे, रायगड आणि पुणे जिल्ह्यांतील परिस्थितीची सविस्तर माहिती त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांकडून जाणून घेतली.
 
यावेळी मंत्री महाजन यांनी पालघर जिल्हाधिकारी डॉ. इंदु राणी जाखड़ यांच्याशी दूरध्वनीद्वारे संवाद साधला. पालघर जिल्ह्यात सुरू असलेल्या पावसाची स्थिती, नदी-नाल्यांची पाणीपातळी, संवेदनशील भागांतील परिस्थिती, नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी करण्यात आलेल्या उपाययोजना, आवश्यक स्थलांतराची तयारी तसेच आपत्कालीन यंत्रणांची सज्जता याबाबत त्यांनी माहिती घेतली. जिल्हा प्रशासनाने सर्व संबंधित विभागांमध्ये समन्वय ठेवून परिस्थितीवर सातत्याने लक्ष ठेवावे आणि गरज भासल्यास तातडीने मदतकार्य सुरू करावे, असे निर्देशही त्यांनी दिले. (Heavy Rain)
 
त्यानंतर मंत्री महाजन यांनी मुंबई महानगरपालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन नियंत्रण कक्षाला भेट देऊन मुंबई शहर आणि उपनगरांमध्ये सुरू असलेल्या संततधार पावसाच्या पार्श्वभूमीवर विविध यंत्रणांच्या तयारीचा आढावा घेतला. महानगरपालिका, अग्निशमन दल, पोलीस, आरोग्य विभाग, जलनिस्सारण विभाग तसेच इतर आपत्कालीन यंत्रणांमधील समन्वयाची माहिती त्यांनी अधिकाऱ्यांकडून घेतली.
 
या पाहणीदरम्यान मुंबई महानगरपालिकेच्या आयुक्त अश्विनी भिडे तसेच महानगरपालिकेचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. पावसामुळे निर्माण होणाऱ्या पूरस्थिती, पाणी साचण्याच्या घटना, वाहतूक व्यवस्थापन, झाडे कोसळण्याच्या घटना तसेच नागरिकांना तातडीची मदत पुरविण्यासाठी नियंत्रण कक्ष आणि संबंधित विभागांनी २४ तास कार्यरत राहण्याच्या सूचना मंत्री महाजन यांनी दिल्या. (Heavy Rain)
 
नागरिकांच्या सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य देत कोणतीही आपत्कालीन परिस्थिती उद्भवल्यास तत्काळ प्रतिसाद देण्यासाठी सर्व यंत्रणांनी सतर्क राहावे, समन्वयाने काम करावे आणि आवश्यक मनुष्यबळ व यंत्रसामग्री सज्ज ठेवावी, असे निर्देशही त्यांनी दिले. (Heavy Rain)
 
 




संबंधित मजकूर