गाथा बलिदानाची : ज्ञात-अज्ञात क्रांतिकारकांचे शौर्यस्मरण

    05-Jul-2026
 
Gatha Balidanachi Book Review
 
क्रांतिकारकांचे जीवन हे मवाळ पद्धतीने लढा देणार्‍या देशभक्त लोकांहून कित्येक पटीने हलाखीचे होते. सततची पाळत, तुरुंगवास, सश्रम कारावास, समाजाने वाळीत टाकणे, दोन वेळच्या अन्नाची भ्रांत आणि मृत्युदंड अशा काटेरी वाटेवर ही माणसे चालली. मातृभूमी या जोखडातून शीघ्र मुक्त व्हावी, हा प्रामाणिक आणि त्वेषाने उमटलेला विचार त्यामागे होता. परंतु, अशा क्रांतिवीरांची घोर उपेक्षा झाली. समाजही ही बलिदाने विसरला. तेव्हा, आजच्या पिढीला या क्रांतिकारकांच्या शौर्याचे परिचय करुन देणारे डॉ. गिरीश पिंपळे लिखित छोटेखानी पुस्तक ‘गाथा बलिदानाची’ हे निश्चितच मार्गदर्शक ठरेल, यात शंका नाही.
 
कीं घेतले व्रत न हें आम्हीं अंधतेने
लब्धप्रकाश-इतिहास-निसर्ग-मानें
जें दिव्य दाहक म्हणूनी असावयाचें
बुद्ध्याचि वाण धरिले करिं हें सतीचें
 
स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकरांच्या सिद्धहस्त लेखणीतून अवतरलेल्या या प्रेरक ओळी. या ओळींतून हजारो ज्ञात-अज्ञात क्रांतिकारकांच्या जीवनाचे ध्येय आणि त्या ध्येयामागील अनन्यसाधारण इच्छाशक्ती दिसून येते. क्रांतिकार्य करणार्‍या वीरांनी स्वातंत्र्यपूर्व काळात जे भोगले, ते सामान्य माणसाच्या कल्पनेच्या पल्याडचे आहे. दुर्दैवाने तशीच उपेक्षा स्वातंत्र्योत्तर काळातही त्यांना भोगावी लागली. ते हाहा म्हणता विस्मृतीत गेले, दुर्लक्षिले गेले आणि तसे प्रयत्नही झाले हे उघड आहे.
 
भारतात क्रांतिकार्याची पहिली ठिणगी महाराष्ट्र राज्यात पडली. आद्यक्रांतिकारक वासुदेव बळवंत फडके यांनी रामोशी आणि इतर समाजातील लढाऊ तरुणांना एकत्र करून ब्रिटिशांविरुद्ध पहिले सशस्त्र बंड पुकारले. त्यानंतर पुण्यात चापेकर बंधूंनी (दामोदर, बाळकृष्ण आणि वासुदेव) लोकांवर जुलमी अत्याचार करणार्‍या प्लेग कमिशनर रँडची हत्या करून अन्यायाचा प्रतिकार केला. ‘अनुशीलन समिती’ (१९०२), ‘अभिनव भारत समाज’ (१९०४ ), ‘गदर पार्टी’ (१९१३) आणि ‘हिंदुस्तान सोशलिस्ट रिपब्लिकन असोसिएशन’ (१९२८) अशा अनेक क्रांतिकारी संघटनांनी इंग्रजी सत्तेला सशक्त आव्हान देत समाजमनात चेतना जागवली. अशा ज्ञात-अज्ञात क्रांतिकारकांच्या कार्याची ओळख होणे, त्याप्रति कृतज्ञ असणे ही कोणत्याही सजग, राष्ट्राभिमानी आणि संवेदनशील समाजासाठीची पूर्वअट असली पाहिजे. डॉ. गिरीश पिंपळे यांच्या ‘गाथा बलिदानाची’ या लेखसंग्रहातून अनेक क्रांतिकारकांच्या साहसी आणि करुण कहाण्या आपल्याला वाचायला मिळतात.
 
या १०० पानांच्या छोटेखानी पुस्तकातून डॉ. पिंपळे यांनी बर्‍याच विषयांचा परामर्श घेतला आहे. स्वा. सावरकरांवरील प्रमुख चरित्रांचा यात धांडोळा घेण्यात आला आहे. यात प्रसिद्ध चरित्रकार धनंजय कीर, वि. स. वाळिंबे, डॉ. प्र. ल. गावडे आणि बाळाराव सावरकर यांनी लिहिलेले चार खंडी चरित्र यांचा उल्लेख आणि त्याबाबतची माहिती वाचावयास मिळते. यांसह विविध क्रांतिकारक आणि त्यांच्या क्रांतिकार्याचे प्रेरणाशील वर्णन करणारे लेखक म्हणून ख्यातकीर्त असणारे वि. श्री. जोशी यांच्या ग्रंथसंपदेचे अवलोकन यातील लेखांमधून करण्यात आले आहे. ‘मृत्युंजयांचा आत्मयज्ञ’, ‘वणवा हिंद देशीचा’, ‘अग्निपथावरील परागंदा’ आणि ‘पूर्णाहुती‘ आणि ‘वाताहत’ अशा व इतर ग्रंथांमधून क्रांतिकारकांची देदीप्यमान; परंतु तितकीच करुण कथा प्रभावीपणे मांडण्यात आली आहे.
 
सावरकरांचे समस्त कुटुंबच स्वातंत्र्याच्या या वेदीत समिधा म्हणून पडले होते. त्यात त्यांचे ज्येष्ठ बंधू बाबाराव सावरकर आणि कनिष्ठ बंधू डॉ. नारायणराव सावरकर यांचेही भरीव योगदान राहिलेले आहे. त्यांच्या कार्याची दखल घेणार्‍या ग्रंथासंदर्भात यात दोन लेख आलेले आहेत. यांसह सावरकर कुटुंबातील स्त्रिया म्हणजे यशोदाबाई, यमुनाबाई आणि शांताबाई सावरकर यांनी केलेला संघर्ष ‘सावरकर परिवारातील तीन तेजस्वी स्त्रिया’ या लेखत्रयीतून समजतो.
 
‘स्वा. सावरकरांची प्रभावळ‘ या विशेष लेखमालेत सावरकरांचे अनुयायी असलेल्या विविध मान्यवरांची ओळख करून देण्यात आली आहे. श्रीधर रघुनाथ वर्तक यांनी लिहिलेल्या ग्रंथाच्या संदर्भाने हे लेख येतात. कृष्णाजी महाबळ, कृष्णाजी कर्वे, विनायक देशपांडे आणि इतर अनेकांची छोटेखानी चरित्रे या ग्रंथाद्वारे समोर येतात. महाबळ यांना ‘जॅसन-वधा’वेळी झालेली अटक, बॉम्ब बनवण्याचा उद्योग करणारे कृष्णाजी खरे, सक्तमजुरी भोगलेले वि. म. भट आणि इतर तरुण क्रांतिकारकांची माहिती यातून मिळते.
 
भारतातील क्रांतिकार्य चिरडून टाकण्यासाठी इंग्रजी सत्तेने नाना प्रयत्न केले. ‘अंदमानातील क्रांतिकारक’ अशी एक लेखमालिका या पुस्तकात येते, ज्याद्वारे अनेक महत्त्वाच्या क्रांतिकारकांचा आणि त्यांच्या साहसी कार्याचा धांडोळा घेता येतो. देशभक्त क्रांतिकारकांना मातृभूमीपासून दूर ठेवण्यासाठी ‘सेल्युलर जेल‘ उभारले. १८५७ पासून इथे राजबंदी डांबून ठेवण्याची प्रथा सुरू झाली. पुढे बंगालमधील शेकडो क्रांतिकारक इथे सजा भोगत होते. ‘काळ्या पाण्याची शिक्षा’ हा एक अघोरी प्रकार होता. ती जणू मगरमिठी होती. अंदमानातील राजबंद्यांची आणि त्यांनी सोसलेल्या हालअपेष्टांची ओळख करून देणारे काही महत्त्वाचे. परंतु, छोटेखानी लेख या पुस्तकात आले आहेत. तिथले एकंदर वातावरण, शिक्षांचे अघोरी प्रकार आणि क्रांतिकारकांनी खचून जावे अशी व्यवस्था यांचे चित्रण आपल्याला वाचता येते. सर्वांत कडवट आणि धोकादायक वाटणार्‍या क्रांतिकारकांना, राजबंद्यांना अंदमानच्या सेल्युलर कारागृहात ठेवण्यात येत असे. तिथे देशभरातील क्रांतिकारक ठेवण्यात आले होते. नानी गोपाळ, इंदुभूषण रॉय आणि उल्हासकर दत्त यांच्या हालअपेष्टांची चर्चा करणारा लेख या पुस्तकातला एक महत्त्वाचा लेख आहे. परंतु, तो अधिक विस्ताराने यायला हवा होता, असे निश्चितपणाने वाटत राहते. अंदमानातील अज्ञात क्रांतिकारक, शूर वनवासी क्रांतिकारकांचा परिचय यांमुळे या पुस्तकाचे मूल्य विशेष वाढते, यात शंका नाही.
 
क्रांतिकारकांचे जीवन हे मवाळ पद्धतीने लढा देणार्‍या देशभक्त लोकांहून कित्येक पटीने हलाखीचे होते. सततची पाळत, तुरुंगवास, सश्रम कारावास, समाजाने वाळीत टाकणे, दोन वेळच्या अन्नाची भ्रांत आणि मृत्युदंड अशा काटेरी वाटेवर ही माणसे चालली. मातृभूमी या जोखडातून शीघ्र मुक्त व्हावी, हा प्रामाणिक आणि त्वेषाने उमटलेला विचार त्यामागे होता. परंतु, अशा क्रांतिवीरांची घोर उपेक्षा झाली. समाजही ही बलिदाने विसरला आणि हे दुर्दैवी आहे. भारतीय क्रांतिकार्यात आयुष्य झोकून दिलेल्या; परंतु दुर्लक्षित, अपरिचित राहिलेल्या क्रांतिवीरांची प्राथमिक ओळख होण्यासाठी हे पुस्तक उपयोगी ठरू शकेल.
 
पुस्तकाचे नाव : गाथा बलिदानाची
लेखक : डॉ. गिरीश पिंपळे
प्रकाशक : परममित्र प्रकाशन
पृष्ठसंख्या : १०८
मूल्य : २००/-
 
-सौरभ सद्योजात 




संबंधित मजकूर