मुंबई : (Dhruv Rathee Video Case) दिल्ली उच्च न्यायालयाने शुक्रवारी यूट्यूबर ध्रुव राठी याच्या वादग्रस्त व्हिडिओ हटविण्याच्या प्रकरणात केंद्र सरकारच्या तक्रार अपीलीय समितीला १५ दिवसांच्या आत निर्णय घेण्याचे निर्देश दिले. न्यायमूर्ती स्वर्ण कांता शर्मा यांच्या एकलपीठाने हा निर्णय न्यायालयाच्या निदर्शनास आणून देण्याचेही आदेश दिले. तसेच या आदेशाची कोणत्याही प्रकारे अवहेलना झाल्यास ती गांभीर्याने घेतली जाईल, असा इशाराही न्यायालयाने दिला.
याचिकाकर्त्यांच्या वकिलांनी दाखल केलेल्या याचिकेत म्हटले आहे की, २१ मार्च २०२६ रोजी ध्रुव राठी याच्या यूट्यूब चॅनेलवर अपलोड करण्यात आलेला 'क्या हिंदू बीफ खा सकते हैं?' हा व्हिडिओ अत्यंत आक्षेपार्ह आहे. या व्हिडिओमध्ये प्रभू श्रीराम, माता सीता आणि भगवान श्रीकृष्ण यांसारख्या पूजनीय व्यक्तिमत्त्वांना मांस आणि मद्याचे सेवन करणारे म्हणून दाखविण्यात आले असून, त्यामुळे हिंदू श्रद्धांचा अपमान झाला आहे आणि भाविकांच्या धार्मिक भावना दुखावल्या गेल्या आहेत, असा आरोप याचिकेत करण्यात आला आहे. याचिकाकर्त्या अमिता सचदेवा यांनी हा व्हिडिओ भडकाऊ, अपमानास्पद आणि सांप्रदायिकदृष्ट्या संवेदनशील असल्याचे म्हटले आहे. (Dhruv Rathee Video Case)
सुनावणीदरम्यान केंद्र सरकारनेही याचिकेला पाठिंबा दिला. केंद्र सरकारतर्फे अतिरिक्त सॉलिसिटर जनरल चेतन शर्मा यांनी न्यायालयाला सांगितले की, यूट्यूबनेही यांनी आवश्यक ती दक्षता घेत अशा प्रकारची सामग्री स्वतःहून हटवायला हवी होती. त्यांनी हा व्हिडिओ समाजात फूट पाडणारा आणि हानिकारक असल्याचेही नमूद केले. (Dhruv Rathee Video Case)
गुगलतर्फे उपस्थित वकिलांनी न्यायालयाला सांगितले की, कंपनीने याचिकाकर्त्याला उत्तर दिले असून, या प्रकरणात तक्रार अपीलीय समितीकडे आधीच अपील दाखल करण्यात आले आहे. त्यानंतर न्यायालयाने जॅकला १५ दिवसांच्या आत त्या अपीलावर निर्णय घेण्याचे निर्देश दिले. याचिकेत असा आरोपही करण्यात आला आहे की, ध्रुव राठी याने जाणूनबुजून हिंदू धर्मग्रंथांचा विपर्यास केला, सनातन धर्माच्या पवित्रतेची खिल्ली उडवली आणि खानपानाच्या सवयींना जात व राजकारणाशी जोडून सांप्रदायिक तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केला. (Dhruv Rathee Video Case)
'मास मीडिया' या विषयातून पदवीपर्यंतचे शिक्षण पूर्ण.'कम्युनिकेशन ॲण्ड जर्नालिझम' विषयातून पदव्युत्तरपर्यंतचे शिक्षण पूर्ण. सध्या दै.'मुंबई तरुण भारत'मध्ये वेब उपसंपादक म्हणून कार्यरत. लिखाण, संगीत, वाचन, फोटोग्राफी, इ.ची आवड.लिवोग्राफी भाषाशैलीत विशेष प्रावीण्य.बालपणापासून रा.स्व.संघाचा स्वयंसेवक