भांडुप पश्चिम येथे रस्ता खचला, महापौर रितू तावडे यांनी घटनास्थळी केली पाहणी

    05-Jul-2026
 
Bhandup West Road Cave-In
 
मुंबई : (Bhandup West Road Cave-In) भांडुप (पश्चिम) येथे लालबहादूर शास्त्री मार्गावर एशियन पेंटजवळ सुरू असलेल्या बांधकामालगतचा रस्ता खचल्याची घटना दि ४ जुलै दुपारी घडली. या घटनास्थळी मुंबईच्या महापौर रितू तावडे यांनी आज भेट देऊन परिसराची पाहणी केली. यावेळी एस व टी प्रभाग समिती अध्यक्ष साक्षी दळवी, सहायक आयुक्त समरीन सय्यद आणि इतर संबंधित अधिकारी उपस्थित होते.
 
सदर ठिकाणी सुमारे १०० x १०० चौरस फूट क्षेत्रफळाचा रस्ता खचल्यामुळे तेथील झाडे कोसळली आणि खोदकाम सुरू असलेल्या ठिकाणी एक वाहनही खड्ड्यात कोसळले. या दुर्घटनेत सुदैवाने कोणतीही जीवितहानी झालेली नाही. या घटनेनंतर एस विभाग कार्यालय, मुंबई अग्निशमन दल, पोलिस यांनी परिसरात बॅरिकेड्स लावले आणि परिसर सुरक्षित केला. (Bhandup West Road Cave-In)
 
घटनास्थळी पाहणी केल्यानंतर रितू तावडे म्हणाल्या की, भर पावसात या ठिकाणी सुरू असलेल्या पाया भरणी कामामुळे माती सैल होऊन रस्ता खचला, असा स्थानिक रहिवाशांचा आरोप आहे. या प्रकरणी संपूर्ण चौकशी केली जाईल. स्थानिक प्रशासनाने नोटीस बजावून देखील बांधकाम सुरू ठेवण्यात आले होते, अशी माहिती प्रशासनाने दिली आहे. चौकशी अंती जे तथ्य आणि सत्य समोर येईल, त्यानुसार योग्य कारवाई केली जाईल, असे महापौरांनी स्पष्ट केले. (Bhandup West Road Cave-In)
 
दरम्यान, महापौर रितू तावडे यांनी घाटकोपर (पूर्व) येथे जय अंबे नगर भागात भेट देऊन सोमय्या नाल्याची पाहणी केली. मुसळधार पावसामुळे सोमय्या नाल्यातील पाणी पातळी वाढल्याने येथील परिसरातील परिस्थितीची माहिती महापौरांनी अधिकाऱ्यांकडून जाणून घेतली. परिसरात पाणी साचले नसून पाण्याचा निचरा होत आहे, अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली. (Bhandup West Road Cave-In)
 
 




संबंधित मजकूर