मुंबई : (BEST Electric Bus Accident) कुर्ला बेस्ट डेपोमध्ये शनिवारी मोठी दुर्घटना टळली. बंद पडलेली इलेक्ट्रिक बस सुरू करण्याचा प्रयत्न सुरू असताना ती अचानक उतारावरून घसरत डेपोबाहेर एलबीएस मार्गावर आली आणि तेथे पार्किंगमध्ये उभ्या असलेल्या दोन दुचाकींना धडकली. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी किंवा दुखापत झाली नाही.
मिळालेल्या माहितीनुसार, मार्ग क्रमांक ४१५/५८ वर धावणारी स्विच मोबिलिटी कंपनीची बस (क्रमांक १०४३९) कुर्ला डेपोच्या प्रवेशद्वाराजवळ उभी होती. बस सुरू होत नसल्याने पीएमआय (देखभाल) विभागातील कर्मचाऱ्यांनी आणि बसचालकाने तिला धक्का देऊन सुरू करण्याचा प्रयत्न केला. मात्र, याचवेळी बसवरील नियंत्रण सुटले आणि ती उतारावरून घसरत डेपोबाहेर एलबीएस मार्गावर पोहोचली. (BEST Electric Bus Accident)
यानंतर बसने पार्किंगमध्ये उभ्या असलेल्या दोन दुचाकींना धडक दिली. या धडकेत दोन्ही दुचाकींचे किरकोळ नुकसान झाले. घटनेनंतर टोईंग वाहनाच्या मदतीने बस पुन्हा डेपोमध्ये आणून उभी करण्यात आली.
या प्रकरणी दुचाकी मालकांनी कोणतीही पोलिस तक्रार दाखल केलेली नसल्याने पोलिसांकडूनही कोणतीही कारवाई करण्यात आलेली नाही. (BEST Electric Bus Accident)