संघविचारांचे ‘एन्सायक्लोपीडिया’; राष्ट्रविचारांचे ऋषितुल्य साधक

    05-Jul-2026

Baburao Vaidya
 
संघाच्या विचारपरंपरेला आपल्या लेखणीची धार, बुद्धीची प्रखरता आणि जीवनातील अखंड आचरण यांची जोड देणार्‍या काही निवडक व्यक्तिमत्त्वांचे स्मरण अपरिहार्य ठरते. अशीच एक ऋषितुल्य विभूती म्हणजे कै. माधव गोविंद वैद्य तथा बाबूराव वैद्य. संघविचार केवळ मांडणारे नव्हे, तर तो स्वतःच्या जीवनातून जगणारे, विचाराला तर्काची बैठक, संस्कारांना आचरणाची जोड आणि संघकार्याला वैचारिक अधिष्ठान देणारे ते एक असामान्य व्यक्तिमत्त्व होते.
 
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या विचारसरणीला आपल्या लेखनातून, कार्यातून आणि प्रत्यक्ष जीवनातून समाजापर्यंत पोहोचवणारे ऋषितुल्य व्यक्तिमत्त्व म्हणजे कै. माधव गोविंद वैद्य तथा बाबूराव वैद्य. वयाच्या ९७व्या वर्षी त्यांचे निधन झाले. सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत यांनी त्यांचा ‘एन्सायलोपीडिया’ आणि ‘संघविचारांचा सजीव, पारदर्शी व सतत प्रवाही झरा’ अशा शब्दांत गौरव केला होता. आद्य सरसंघचालक डॉ. हेडगेवार यांच्यापासून ते विद्यमान सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत यांच्यापर्यंत संघाच्या सहाही सरसंघचालकांसोबत कार्य करण्याचे दुर्मीळ भाग्य लाभलेले ते एकमेव वरिष्ठ कार्यकर्ते होते.
 
दि. ११ मार्च १९२३ रोजी जन्मलेल्या माधव गोविंद वैद्य यांचे संपूर्ण आयुष्य राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्याशी एकरूप झाले होते. १९३१ मध्ये शिक्षणासाठी नागपूरला आलेले बाबूराव अवघ्या आठव्या वर्षी संघाचे स्वयंसेवक झाले. वयाच्या १५व्या वर्षापासून ते ९५व्या वर्षापर्यंत त्यांनी नियमित दैनंदिन शाखेत उपस्थिती लावली. त्यांची बुद्धिमत्ता विलक्षण होती; दहावीपासून ते पदव्युत्तर शिक्षणापर्यंतच्या सर्व परीक्षा त्यांनी प्रथम श्रेणीत उत्तीर्ण केल्या. १९४८ मध्ये गांधीहत्येनंतर जेव्हा संघावर बंदी आली, तेव्हा त्यांनी भूमिगत राहून कार्य केले. त्याकाळात पोलिसांचा संशय टाळण्यासाठी ते छान शर्ट, पॅन्ट आणि टाय लावून वावरत असत.
नागपूरच्या ‘हिस्लॉप’ या ख्रिश्चन मिशनरी महाविद्यालयात अध्यापन करत असतानाही त्यांनी आपली संघनिष्ठा कधी लपवली नाही. १९५४-५५ मध्ये ‘प्राध्यापकांनी कोणत्याही राजकीय पक्षाशी बांधिलकी ठेवू नये किंवा निवडणुकीत भाग घेऊ नये’ या सरकारी फतव्यावर स्वाक्षरी करण्यास त्यांनी बाणेदारपणे नकार दिला.
 
१९६६ मध्ये बाबूराव वैद्य ‘तरुण भारत’ या मराठी वृत्तपत्रात दाखल झाले आणि पुढे संपादक बनले. देशात लागू झालेल्या आणीबाणीच्या काळात ‘सेन्सॉरशिप’ असतानाही त्यांनी लिहिलेले अग्रलेख प्रचंड गाजले. एक उत्कृष्ट पत्रकार असण्यासोबतच त्यांनी राजकीय जबाबदार्‍याही सांभाळल्या. जनसंघातील कार्य आणि १९७८ मध्ये महाराष्ट्र विधान परिषदेचे सदस्य म्हणून झालेली त्यांची निवड, त्यांच्या अष्टपैलू नेतृत्वाची साक्ष देते.
 
बाबूराव यांनी संघाचे अखिल भारतीय बौद्धिक प्रमुख आणि पहिले प्रचारप्रमुख म्हणून जबाबदारी सांभाळली. अयोध्येत १९९४ मध्ये वादग्रस्त ‘बाबरी ढाँचा’ पाडल्यानंतर निर्माण झालेल्या गैरसमजांना तोंड देण्यासाठी संघाने माध्यमांच्या प्रश्नांना उत्तर देण्याकरिता महत्त्वाची जबाबदारी बाबूराव वैद्य यांच्यावर सोपवली. विरोधकांचे दररोजचे आरोप आणि माध्यमांच्या तीक्ष्ण प्रश्नांना बाबूराव अत्यंत संतुलित, सखोल आणि तर्कशुद्ध उत्तरे देत असत. त्यांची मांडणी वादाकडून संवादाकडे आणि संवादातून सहमतीकडे जाणारा मार्ग मोकळा करत असे.
 
आद्य सरसंघचालक डॉ. हेडगेवार यांच्या मते, गृहस्थाश्रमात राहून सामाजिक आणि राष्ट्रीय दायित्व पाळणे, ही एक मोठी तपश्चर्या आहे. बाबूराव याचे उत्तम उदाहरण होते. कौटुंबिक आणि सामाजिक जबाबदार्‍यांमध्ये संतुलन राखत त्यांनी आपले संपूर्ण जीवन समाज आणि मानवतेसाठी समर्पित केले. म्हणूनच, ते मनाने खरे संन्यासी होते. बाबूराव वैद्य प्रचारक नव्हते; ते गृहस्थ कार्यकर्ते होते. तरीही, त्यांचे संपूर्ण आयुष्य प्रचारकाच्या समर्पणानेच व्यतित झाले. त्यांनी केवळ स्वतःचेच जीवन संघकार्याला अर्पण केले नाही, तर आपल्या आठ अपत्यांपैकी दोघांना (डॉ. मनमोहनजी वैद्य आणि रामजी वैद्य) संघाच्या प्रचारक परंपरेचा भाग बनवले.
सार्वजनिक जीवनात व्यस्त असूनही बाबूराव अत्यंत कुटुंबवत्सल होते. सुट्ट्यांमध्ये मुलांसोबत पत्ते खेळणे आणि नातेवाईकांच्या सुख-दुःखात सहभागी होणे त्यांना आवडायचे. वयाची पन्नाशी पूर्ण झाल्यावर त्यांनी एक कौटुंबिक नियम केला. चातुर्मासात दररोज रात्री ९ ते १० यावेळेत संपूर्ण कुटुंबाने एकत्र बसून स्तोत्र, ‘भगवद्गीता’ पठण आणि सामूहिक वाचन करायचे. या नियमासाठी त्यांनी स्वतः रात्री ९ नंतरचे सार्वजनिक कार्यक्रम घेणे बंद केले होते. याशिवाय, ते एक प्रगतिशील शेतकरी होते. त्यांना शेती आणि बैलांची उत्तम पारख होती. चांगल्या बैलजोड्या खरेदी करण्यासाठी ते थेट तेलंगणपर्यंत जात आणि गावातील इतर शेतकर्‍यांनाही मदत करत. गावातील शेती विकल्यानंतरही ‘पोळा’ सणाला गावी जाऊन सर्वोत्तम बैलजोडीला पुरस्कार देण्याचा त्यांचा शिरस्ता कायम होता.
 
वयाच्या ९५व्या वर्षापर्यंत ते नियमित आणि त्यानंतर ‘कोरोना’ काळात आलेल्या ‘लॉकडाऊन’पर्यंत आठवड्यातून एकदा शाखेत जात होते. ‘संघशरणता’ ही केवळ विचारातून नव्हे, तर नियमित शाखेतूनच घडते, हा त्यांचा दृढ विश्वास होता. वेळेचे काटेकोर नियोजन, आर्थिक व साधनशुचिता आणि मृत्यूचेही त्यांनी केलेले नियोजन विशेष उल्लेखनीय होते. दि. ११ मार्च २०१८ रोजी नागपूर येथील अखिल भारतीय प्रतिनिधी सभेच्या बैठकीत त्यांच्या ९५व्या वाढदिवसानिमित्त सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला. बाबूराव व्हीलचेअरवर असल्याने सरसंघचालक स्वतः व्यासपीठावरून खाली उतरून आले. त्यावेळी ९५ वर्षांच्या बाबूराव यांनी ६८ वर्षांच्या सरसंघचालकांना अभिवादन करण्याचा प्रयत्न केला. परंतु, सरसंघचालकांनी त्यांना थांबवले. यावर बाबूराव आपल्या भाषणात म्हणाले, "पूजनीय सरसंघचालकांनी मला त्यांना प्रणाम करू दिला नाही; म्हणून मी मनोमन त्यांच्या चरणी वंदन करतो.” हे ऐकून संपूर्ण सभागृह भावूक झाले होते. आपल्या पाच मिनिटांच्या भाषणात त्यांनी एक अत्यंत मार्मिक विचार मांडला, "संघ समजून घेणे सोपे नाही. संघ समजून घ्यायचा असेल, तर प्रथम ‘ईशावास्योपनिषद’ समजून घ्यावे लागेल.”
 
कै. बाबूराव वैद्य यांच्या निधनाने संघपरिवाराने एक ज्येष्ठ मार्गदर्शक, संस्कृतचा गाढा अभ्यासक आणि श्रेष्ठ साहित्यिक गमावला आहे. त्यांचा अभ्यासू स्वभाव, चिंतनशीलता, प्रभावी वक्तृत्व आणि संयमित वर्तन आजच्या तरुण पिढीसाठी अत्यंत प्रेरणादायी आहे. ते शरीराने आपल्यात नसले, तरी त्यांचे राष्ट्रीय व सांस्कृतिक विचार भावी पिढ्यांना सदैव मार्गदर्शक ठरतील.




संबंधित मजकूर