हार कर जीतने वाले को बाज़ीगर कहते हैं| शहारूखचा हा हिट डायलॉग केप व्हर्डेच्या खेळाडूंना माहीत असण्याचे कारण नाही. पण, शहारूखच्या शब्दांत केप व्हर्डे फुटबॉल वर्ल्डकपची बादफेरीतील मॅच विद्यमान जगजेत्या अर्जेंटिनाविरुद्ध हरले खरे; पण हरूनसुद्धा ते माझ्याच नव्हे; तर जगभरातील फुटबॉलप्रेमींसाठी बाजीगर होते. फार कमी वेळा असे होते की, हरणार्या टीमसाठी आपण टाळ्या वाजवतो. ‘मायमी’च्या त्या स्टेडियमवर केप व्हर्डेच्या खेळाडूंना मॅच हरल्यानंतर अवघ्या जगाने टाळ्यांच्या कडकडाटात मानवंदना दिली. त्यात एक टाळी माझीही होती.
‘मायामी’च्या त्या रात्री अर्जेंटिनाने सामना ३-२ ने जिंकला. पण, मैदान सोडताना टाळ्या कोणासाठी वाजत होत्या? पत्रकार परिषदेत उभ्या असलेल्या प्रशिक्षकासाठी, डोळ्यांत पाणी असलेल्या खेळाडूंसाठी आणि जगाच्या नकाशावर अनेकांना शोधावे लागणार्या एका छोट्याशा देशासाठी - केप व्हर्डेसाठी!
समोर होता जगातील सर्वांत महान फुटबॉलपटू, लिओनेल मेस्सी. त्याचा तो अप्रतिम पहिला टच, गोलकिपरला चकवणारा सहज फिनिश आणि नेहमीप्रमाणे दोन्ही हात पसरून केलेला जल्लोष... हे दृश्य जगाने शेकडो वेळा पाहिले आहे.
पण, काल मेस्सीपेक्षाही गुडघ्यावर कोसळलेला केप व्हर्डेचा ४० वर्षीय गोलरक्षक वोझिन्हा जगाला अधिक भावला. त्याच्या डोळ्यांत तरळलेले अश्रू वेदनेचे नव्हते, तर अभिमानाची साक्ष देत होते.
कारण, त्याची कहाणी आकड्यांच्या भाषेत लिहिली जाऊच शकत नाही. डोळ्यांतील अश्रूंमागील भावना त्या स्कोअरबोर्डवरील आकड्यांपेक्षा अमूल्य होत्या.
पोर्तुगालच्या ‘ब’ श्रेणीतील ‘फुटबॉल लीग’मध्ये ‘गिल व्हिसेंट लब’कडून खेळणार्या केप व्हर्डेच्या या गोलरक्षकाने गेल्या वर्षभरात जितके पैसे कमावले, त्यापेक्षा जास्त रक्कम मेस्सीने ‘इंटर मायामी’कडून अवघ्या पाच मिनिटांत कमावली होती. एका बाजूला अब्जाधीश सुपरस्टार; दुसर्या बाजूला स्वप्नांवर जगणारा सामान्य फुटबॉलपटू. पण, काल ‘मायामी’च्या मैदानावर त्या दोघांची किंमत एकच होती- ९० मिनिटे. या ९० मिनिटांसहीत अतिरिक्त ३० अशा एकूण १२० मिनिटांत केप व्हर्डे सामना हरला. पण, त्यांनी जगजेत्या अर्जेंटिनाला अक्षरशः घाम फोडला.
डेरॉय डुआर्टेने आयुष्यातील पहिला आंतरराष्ट्रीय गोल करत सामना बरोबरीत आणला. अतिरिक्त वेळेत पुन्हा पिछाडीवर पडूनही त्यांनी हार मानली नाही. सिडनी लोप्स काब्रालने ठोकलेला सणसणीत गोल आजही स्पर्धेतील सर्वोत्तम गोलांपैकी एक म्हणून आठवला जाईल.शेवटी अर्जेंटिनाला विजय मिळवण्यासाठी आत्मघातकी गोलाची मदत घ्यावी लागली.
पराभव झाला... पण तो गुडघे टेकून नव्हे; तर डोळ्यांत डोळे घालून लढला.
केप व्हर्डेचा इतिहास पाहिला, तर हा प्रवास आणखी थक्क करणारा वाटतो.
१९८६ पर्यंत ‘फिफा’ची अधिकृत मान्यता नव्हती. देशाची लोकसंख्या अवघी पाच लाख. आपल्या भारतात लोकसभेच्या मतदारसंघातही यापेक्षा जास्त मतदार असतात. स्वतःची मोठी व्यावसायिक ‘लीग’ नाही. जगभर विखुरलेल्या आपल्या वंशाच्या खेळाडूंना एकत्र करून हा संघ उभा राहिला आणि त्याच संघाने विद्यमान विश्वविजेत्या अर्जेंटिनाला अतिरिक्त वेळ खेळायला भाग पाडले. फुटबॉलमध्ये पैशांचा, प्रसिद्धीचा आणि ताकदीचा कितीही डंका असला, तरी स्वप्नांची किंमत अजूनही जास्त असते, हे त्यांनी सिद्ध केले.
केप व्हर्डेचा बचावपटू पिको लोप्स म्हणाला होता, "या स्पर्धेनंतर आता कोणी विचारत नाही की, केप व्हर्डे कुठे आहे. आता लोकांना आमचा देश नकाशावर सापडतो.”
एका वाक्यात त्यांनी संपूर्ण विश्वचषक जिंकला.
त्या रात्री ‘मायामी’ स्टेडियममध्ये हजारो अर्जेंटिनाचे चाहते होते. मेस्सीच्या जर्सी, मॅराडोनाचे झेंडे, निळ्या-पांढर्या रंगाचा महासागर... आणि एका कोपर्यात अवघे काही हजार केप व्हर्डेचे चाहते.पण, सामना संपल्यानंतर स्टेडियमबाहेर जे घडले, तेच या खेळाचे खरे सौंदर्य होते.
अर्जेंटिनाचे आणि केप व्हर्डेचे चाहते एकमेकांना मिठ्या मारत होते. काहींच्या डोळ्यांत आनंदाश्रू होते, तर काहींच्या डोळ्यांत अभिमानाचे अश्रू. कारण, दोघांनाही माहीत होते... त्या रात्री त्यांनी केवळ सामना पाहिला नव्हता त्यांनी इतिहास घडताना पाहिला होता.
विश्वचषक केवळ ट्रॉफी जिंकण्यासाठी नसतो. तो छोट्या देशांना मोठी स्वप्ने पाहण्याचे धाडस देण्यासाठी असतो. कधी कधी विजेते कप उचलतात... आणि पराभूत जगाची मने जिंकतात. ‘मायामी’च्या त्या रात्री अर्जेंटिनाने पुढची फेरी गाठली. पण, केप व्हर्डेने फुटबॉलच्या इतिहासात आपल्या पुराणातल्या ध्रुवबाळासारखी आपली हक्काची जागा पटकावली.