उरण तालुक्याला मुसळधार पावसाने झोडपले ; चिरनेरमध्ये पूर सदृश्य परिस्थिती

शेकडो घरांना शिरले पुराचे पाणी, जीवनवश्यक वस्तूंचे अतोनात नुकसान

    04-Jul-2026
 
Uran Heavy Rain
 
उरण : (Uran Heavy Rain) 3 जूनच्या रात्री पासून ते 4 जून दुपार पर्यंत कोसळत असलेल्या मुसळधार पावसाच्या पाण्यामुळे उरण तालुक्याला अक्षरशः झोडपून काढले आहे. चिरनेर गावात दोन वर्षानंतर डोंगराच्या वेगाने येणाऱ्या पाण्यामुळे पूर सदृश्य परिस्थिती निर्माण झाली होती. पुन्हा एकदा पुराच्या पाण्याचा जोरदार फटका बसला असून, शेकडो नागरिकांच्या घरात पुराचे पाणी घुसून जिवनावश्यक वस्तूंचे अतोनात नुकसान झाले आहे. संसार उपयोगी सामानाबरोबर चीज वस्तूंचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून, येथील नागरिक भयभीत झाले आहेत. चिरनेर विविध गोदामांसह उभारण्यात आलेल्या अन्य गोदामांच्या भरावामुळे आणि बांधकामामुळे व नव्याने सुरू असलेल्या मातीच्या भरावांच्या कामांमुळे पावसाचे पाणी जाण्याचे नैसर्गिक मार्ग बंद झाले आहेत.
 
त्यामुळे पुन्हा एकदा चिरनेर गावावर पुराचे संकट ओढावले आहे. येथील शेतजमीनी देखील पाण्याखाली आल्या असून, पाणी निचरा होण्याचे नैसर्गिक मार्ग बंद झाल्यामुळे शेतीजमिनी पाण्याखाली आल्या आहेत. पाण्याचा निचरा होत नसल्यामुळे येथील शेतकऱ्यांची भात शेती पूर्णता पाण्याखाली आली असून, शेतकऱ्यांनी आताच टाकलेले भाताचे बियाणे गेले चार दिवस पुराच्या पाण्यात बुडून गेले आहे. नवीन मातीचे भराव आणि गोदामामुळे पाण्याचा निचरा होण्यास मोठा अडथळा येत आहे. शनिवारी सकाळपासून जोर धरलेल्या पावसात चिरनेर गावातील अनेक नागरिकांच्या घरात पाणी घुसून, मोठ्या प्रमाणावर आर्थिक नुकसान झाले आहे.
 
वाऱ्यासह शुक्रवारी रात्री पासून मुसळधार कोसळणाऱ्या पावसाने सर्वांचीच झोपच उडाली. संपूर्ण चिरनेर गावातील नागरिक, महिला भयभीत झाले होते. दरम्यान कळंबुसरे, मोठीजुई, विंधणे, दिघोडे, वेश्वी पाले आदी गावांनाही पुराचा फटका बसला आहे. तर चिरनेर मधिल मुख्यत्वे कातळपाडा, मधीलपाडा, रांजणपाडा चिंचपाडा, मुळपाडा, येथे रहिवाशांच्या घरात पाणी शिरून मोठे नुकसान झाले आहे. कातळपाडा हद्दीत येणारी माथेरान ही नवीन वसाहत देखील जलमय होऊन, येथील रहिवाशांच्या घरात पाणी शिरून घरांची तळी झाली आहेत. (Uran Heavy Rain)
 
तीन वर्षापूर्वीही चिरनेर गावात पुराचे पाणी शिरून अनेकांच्या घरांना पाणी शिरून मोठ्या प्रमाणात जीवनावश्यक वस्तूंचे नुकसान झाले हॊते.त्यावेळी पुराच्या परिस्थितीतून नागरिकांची सुटका करण्यासाठी येथील एकही पुढारी पुढे धजावला नाही. मात्र उरण तालुका दैनिक पत्रकार संघाने तात्काळ सार्वजनिक बांधकाम खात्याचे कार्यकारी अभियंता पनवेल यांना पाणी निचारा होण्यासाठी एका निवेदनाद्वारे मागणी करून पाठपुरावा करण्यात आला होता. त्याची सार्वजनिक बांधकाम खात्याने दखल घेत चिरनेर हायवे रोडला एक स्लॅपड्रिन आणि तीन मोऱ्या बांधण्याचे काम पूर्णत्वास नेले.मात्र भातशेतीत उभारलेली गोदामे आणि गावातील वाढती अतिक्रमणे यामुळे कचऱ्याच्या नियोजनाचा अभाव यामुळे ही सदृश्य पूरस्थिती निर्माण झाली आहे. (Uran Heavy Rain)
 
 




संबंधित मजकूर